,©® विवेक चंद्रकांत......
1) सकाळी पेपरवाला मुलगा घरी पेपर टाकून जातो. त्या पेपरची घडी संध्याकाळपर्यंत तशीच असते. संध्याकाळी opd ला जातांना मी तो पेपर घेऊन जातो कारण गल्लीत राहणारा एक म्हातारा माणूस तोच पेपर वाचण्यासाठी माझ्या दवाखान्यात आतुरतेने बसलेला असतो.....
2) आमची कामवाली कधीकधी सोबत तिच्या चौथीत जाणाऱ्या मुलीला घेऊन येते. मुलगी हुशार आहे. मला अचानक आठवते माझ्या लहानपणी आजोबांनी. मला वाचायला दिलेली अनेक पुस्तके मी जपून ठेवली आहेत.जादूची अंगठी आणी राजकन्या, किल्ल्यावरचा राक्षस, राजा विक्रमदित्य. मी धावत जातो आणी त्यातली 2-4 पुस्तके तिला देण्यासाठी आणतो.
"ती वाचत नाही दादा पुस्तके.मोबाईल दिला तरच ती गुपचूप बसते." आमची बाई निर्विकारपणे सांगते.
3) माझा एक लेख स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला म्हणून मी आवर्जून तो मुलाला दाखवायला आणला.
"वाचलंय पप्पा. तुम्ही fb वर पण टाकला आहे ना?" मुलगा पेपर हातात पण घेत नाही.
4) मला झोप येत नसते. मोबाईल पाहून कंटाळतो. मी बेडरूम च्या बाहेर येऊन एक नावाजलेल्या लेखकाचे पुस्तकं वाचायला घेतो. काही वर्षांपूर्वी पुस्तक उघडले की मी वाचतांना इतका तल्लीन होऊन जायचो की आजूबाजूचे भान नसायचे. आज मात्र मी जास्त वाचू शकत नाही.
हॉलमध्ये येऊन टीव्ही लावतो उत्तान नाच असणारा आणी एकटा हिरो पन्नास लोकांना मारतो असा तद्दन टुकार चित्रपट चालू असतो. तो पाहण्यात मी रंगून जातो.
5) गोष्ट माझ्या लहानपणीची आमच्या जुन्या घराच्या मागच्या गल्लीत राहणारे डॉक्टर वृद्धापकाळाने वारले. त्यांची सगळी मेडिकल ची पुस्तके त्यांचा मुलगा रद्दीत विकायला काढतोय हे समजताच माझे वडील त्यांच्या घरी जातात आणी चांगल्या कंडिशन मध्ये असलेली सगळी मेडिकलची पुस्तके आणतात.
वडील गेले खूप वर्षे झाली. मीही आता उतारवयाला लागलोय. घराचे रंगकाम काढलं आहे. वडिलांनी मागून आणलेली, त्यांची स्वतः ची आणी माझी अशी सगळी पुस्तके मी रद्दीत काढली आहे. त्याअगोदर मी सगळ्या लोकांना कल्पना दिलेली असते. कोणाला हवी असेल तर फुकट घेऊन जा.. भंगारवाला येतो त्या क्षणापर्यंत मी कोणीतरी येईल म्हणून वाट पाहतो. कोणीही येत नाही....
रद्दीचे पैसे मी मुलाला देतो. त्याला चायनीज खायचे असते.....
डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा