Login

कैरीच्या रेसिपीज Recipes In Marathi

आंबट गोड कैरीच्या स्वादिष्ट रेसिपीज
कैरीच्या रेसिपीज


        उन्हाळा सुरु झाला की आंब्याचे आगमन होते. आंबा तर सगळ्यांनाच आवडतो पण कैरी ही आवडते. कैरी खाण्याचे खुप सारे फायदे आहेत. मस्त आंबट गोड अश्या कैऱ्या कोणाला नाही आवडत खायला! सगळ्यांनाच आवडतात, कोणी त्या तश्याच मीठ मिरची लावून खातात तर कोणी मुरांबा बनवते, साखर आंबा, गुळांबा, लोणच, डाळ कैरी, कैरीचे पन्ह... अस बरेच वेगवेगळे प्रकार करतात.
         कैरीमध्ये व्हिटामिन सी व के जीवनसत्त्व, पोटॅशियम, सोडीयम, मॅग्नेशियम भरपुर प्रमाणात असते. कैरी खाण्याचे खुप फायदे आहेत जसे, की उष्माघातापासून बचाव होतो. अपचनाची समस्या दुर होते. रक्त शुद्ध करण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. आयरनची मात्रा पुर्ण करते, केस चमकदार आणि दाट होतात. डायबिटीजची शुगर लेवल कमी करण्यास मदत होते.

गुळांबा

साहित्य:  कैरी चार ते पाच, गुळ वाटीभर किंवा गोड आवडत असेल तर त्या प्रमाणात घेणे, बडीशेप, लाल मिरची पावडर, हळद, जीरे मोहरी, हिंग, मेथीचे दाणे चमचाभर, मिठ आणि फोडणीसाठी तेल.

कृती : १) कैरीचे साल काढा किंवा नाही काढले तरी चालेल पण स्वच्छ धूवून त्याचे बारीक फोडी करून घ्या.

२) पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जीरे मोहरी तडतडली की गॅस बारीक करून मग मेथीचे दाणे बडीशेप लाल मिरची हळद हिंग मीठ सर्व साहित्य घालायचे.

३) मसाले घालून झाले की त्यावर कैरीचे काप घालायचे.

४) मिश्रण एकत्र करून आता झाकण ठेवून वाफेवर पाच मिनिटे शिजू द्यावे.

५) नंतर त्यात गुळ घालून छान एकत्र करून घ्यायचे.

६) थोडावेळ गुळामध्ये कैरी शिजली की मग गॅस बंद करायचा.

ही कैरीची भाजी किंवा गुळांबा भरपूर दिवस टिकतो. जेवताना लोणच्यासारखे तोंडी लावायला खुप छान लागते.



साखर आंबा


साहित्य : दोन ते चार कैऱ्या (तोतापुरी), साखर दोन वाट्या, साजूक तुप दोन चमचे, लवंग काळीमीरी प्रत्येकी चार, दालचिनी एक तुकडा, वेलची पुड, केसराच्या चार ते पाच काड्या.

कृती : १) प्रथम कैऱ्या स्वच्छ धुवून पुसुन त्याची साल काढून किसून घेणे.

२) आता पॅनमध्ये साजुक तुपात लवंग मिरे दालचिनी घालने.

३) आता त्यात किसलेल्या कैऱ्या घालून मिनिटभर परतवून घेणे.

४) आता त्यात साखर घालणे आणि झाकण लावून पाच दहा मिनिटे शिजविणे.

५) आता मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात वेलची पुड आणि केसरच्या काड्या घालणे.

६) व्यवस्थित एकत्र करून घेणे आणि थंड झाल्यास काचेच्या बरणीत भरून ठेवणे.

साखर आंबा बरेच दिवस टिकतो. ब्रेडला हा जॅम म्हणून सुद्धा लावून खाऊ शकता.



कैरीची डाळ

साहित्य : एक कप चना डाळ, एक मध्यम आकाराची कैरी, हिरव्या मिरच्या चार ते पाच, आलं, मोहरी जीरे हळद हिंग कढीपत्ता, मीठ, चवीपुरती एक चमचा साखर, खवलेला ओला नारळ आवडत असेल तर, कोथिंबिर आणि तेल फोडणीसाठी.

कृती : १) चना डाळ दोन तीन तास भिजत घालावी.

२) कैरीचे साल काढून किसून घेणे.

३) आता मिक्सरमध्ये चनाडाळ थोडी किसलेली कैरी हिरवी मिरची आलं मीठ साखर घालून जाडसर दळून घेणे. शक्यतो पाणी वापरायचे नाही.

४) आता ह्यामध्ये राहिलेली किसलेली कैरी घालणे.

५) आता तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी जीरे हिंग हळद कढीपत्ता आणि दोन तीन सुक्या लाल मिरच्याची फोडणी करुन त्या मिश्रणात घालावी.

६) सगळे व्यवस्थित एकत्र करुन घेणे. आपली डाळ कैरी तयार आहे.



कैरीचे पन्हे

साहित्य : दोन कच्च्या कैऱ्या, गुळ एक वाटी, मीठ, वेलची पुड, काळे मीठ.

कृती : १) कैऱ्या कुकरमध्ये वाफवून घेणे.

२) त्याची साल काढून गर बाजुला काढून घेणे.

३) त्यात किसलेला गुळ आणि थोडस मीठ आणि वेलची पुड घालून व्यवस्थित एकजीव करून घेणे.

४) गोड आवडत असेल तर गुळाचे प्रमाण वाढवू शकता.

५) हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेणे म्हणजे नीट एकजीव होईल आणि नंतर गाळून घेणे.

६) हा पल्प फ्रीजमध्ये हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवणे.

७) आता ग्लासमध्ये दोन चार चमचे हा पल्प घेऊन त्यात काळ मीठ थोडी जीरे पावडर घालून त्यात थंड पाणी आणि हवे असल्यास बर्फाचे खडे घालून नीट एकत्र करून घेणे.

८) आपले थंडगार कैरीचे पन्हे तयार आहे. जर तुम्हांला यात गुळा ऐवजी साखर घालायची असेल तर कैरीच्या दुप्पट साखर घेणे.


किचन तुमचे आणि रेसिपी माझी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचत रहा. रेसिपी आवडल्या तर कमेंट नक्की करा.