हल्ली सगळेजण कार्ड पेमेंट आणि यु. पी. आय. चा वापर सर्रास करतात. पण मला यु. पी. आय. चा वापर करताना भीती वाटायची. कोड नंबर लक्षात ठेवणं अवघड वाटायचे. तो वापरणे किती सोपं आहे? हे मला जरा उशीरचं कळलं. त्याबद्दलचा अनुभव खाली शेअर करत आहे.
काल मी भाजी घ्यायला बाजारात गेले होते. त्यावेळी एकशे तेवीस रुपयाची भाजी घेतली आणि भाजीवाल्या काकांना पाचशेची नोट दिली. त्या वेळी ते काका मला म्हणाले,
“वहिनी एवढे सुट्टे नाही माझ्याकडे त्यापेक्षा फोन पे केले तरी चालेल.”
मी भाजीवाल्या काकांना म्हणाले, “काका मी नाही वापरत फोन पे.”
हे ऐकल्यावर भाजीवाले काका मला म्हणाले,
“वहिनी, फोन पे वापरायला चालू करा. हल्ली सगळीकडे लोक फोन पेननेचं व्यवहार करतात. फार उपयोगी पडते ते. त्याचवेळी आजूबाजूचे भाजी विकत घेणारे माझ्याकडे असे आश्चर्याने बघत होते की ही बाई आजच्या काळात फोन पे चा वापर करत नाही.
ही गोष्ट मी घरी आल्यावर माझ्या मुलाला व नवऱ्याला सांगितली तेव्हा माझा मुलगा व नवरा मला म्हणाले,
“आम्ही किती दिवसापासून तुला सांगत आहोत की फोन पेचे अॅप तुझ्या मोबाईलमध्ये लोड केले आहे, ते वापर. पण तुझे म्हणणे आहे की मला ते फोन पेचा वापर करायला अवघड वाटते. त्याचे कोड नंबर लक्षात ठेवायचा त्रास वाटतो. त्यापेक्षा कॅश पैसे देणे सोपे जाते.”
पुढे माझा मुलगा मला म्हणाला,
“आई आता कोणीही पर्समध्ये पैश्यांची थप्पी घेऊन फिरत नाही सगळेजण फोन पे किंवा कार्डने ने पैश्याचा व्यवहार करतात. ते फार सोयीचे पडते. सुट्टे नाही म्हणून कोणी जास्तीची वस्तू गळ्यात मारणार नाही. हल्ली मी माझ्या पाकिटात पैसेच ठेवत नाही. सगळीकडे फोन पे करतो. त्यामुळे मला त्याचा हिशोबही वेळच्यावेळी लागतो.”
मुलाचे हे बोलणे ऐकल्यावर मी विचार करु लागले की खरचं आधुनिक तंत्रज्ञानामुळे पैश्याचे व्यवहार करण्यात पण किती बदल झाला आहे. इथे पण स्मार्ट मोबाइल उपयोगी आला आहे.
. पूर्वी बाहेर खरेदीला जाताना किती पैसे घ्यावे? खरेदी करताना पैसे कमी पडणार नाही ना. पैसे चोरीला जाणार नाही ना. हे प्रश्न हल्ली कार्ड पेमेंट किंवा यु.पी. आय.चा वापर करताना पडत नाही.
मी भाजीवाल्या काकांकडील अनुभवाने माझ्या मोबाईलमधील फोन पे च्या ॲपचा वापर करायला मुलांकडून शिकले आहे. सुरवातीला फोन पे ने पैश्याचा व्यवहार करायची जी भीती व कंटाळा यायचा तो आता येत नाही. उलट फोन पे च्या वापरामुळे मला माझ्या पैश्याचा हिशोब लगेच लागतो. पर्समध्ये पैश्यांची थप्पी न घेताही मी बाहेर खरेदीला जाऊ शकते. सुट्टे पैसे नाही म्हणून दुकानदार चॉकलेट देत नाही. हल्ली मी कधी ओला, उबर रिक्शा किंवा टॅक्सीमध्ये फिरायला बाहेर पडते, त्यावेळी ओला, उबर रिक्शा किंवा टॅक्सी ड्रायव्हरशी सुट्टे पैश्यावरुन वाद न करता त्यांना फोन पे ने मला पेमेंट करता येते. सध्या पेट्रोल पंपावर पण मला फोन पे ने पेमेंट करता येते.
©️®️ ज्योती प्रशांत सिनफळ
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा