Login

कळा ज्या लागल्या जीवा! (भाग एक)

Intense Lovestory With Happy Ending.
कळा ज्या लागल्या जीवा  (भाग १)

(प्रेमकथा )


लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी


मुलगी पाहण्याचा दिवस म्हणजे मुलाच्या घरी  उत्सुकता आणि हौसेची गोष्ट तर  मुलीकडच्या घरी उत्साहाचे आणि घाई गडबडीचे वातावरण !


वृंदाच्या घरी सगळे त्याच तयारीत होते इतक्यात मामांनी येऊन सांगितलं, “मुलाकडची मंडळी निघाली आहेत.  बरं ,दहा-बारा मिनिटात पोहोचतीलच इकडे . सगळं तयार आहे ना?” 


मावशीने फुलांच्या माळा सरळ केल्या, काकूंनी सोफ्यावरचे कुशन, दिवानवरचे बेडशीट एकदा पाहून घेतले .


ही बातमी वृंदापर्यंत आत खोली मध्ये गेली आणि अबोली रंगाच्या साडीत तयार बसलेल्या वृंदाच्या छातीत धडधड व्हायला लागले.


वृंदाच्या बाबांनी लहानपणीच नात्यांमध्ये तिचे लग्न ठरवलेले होते, ठरलेलं लग्न होतं पण दुर्दैवाने  तो होणारा नवरा मुलगा  तीन वर्षांपूर्वी  अचानक अपघातात गेला . मागच्या वर्षी अशाच एका स्थळाचा नकार तिने पचवलेला होता आणि वर्षभरानंतर हे तिसरे स्थळ,  सगळं जुळतच आलं होतं. 


वृंदा ने या मुलाचा  फोटो देखील पाहिला नव्हता कारण तिला माहीत होतं तिच्याकडे चॉईस नाही .


या मुलाने पसंत केलं तर ठीक नाहीतर नाही .  बापाच्या मागे मावशी व मामा एवढं करत आहेत ते काय कमी की काय ?


दहा - बारा मिनिटात नवरे मुलाकडची  मंडळी येवून पोचली .


 सन्मानाने स्वागत झालं. घरातले  चौघेजण आले होते.  नवरा मुलगा, त्या मुलाचे आई ,वडील, त्याची बहीण आणि पाचवे  मध्यस्थी  असलेले काका  आले होते. 


वृंदाची मावस बहिण पळतच  आत आली आणि म्हणाली, “ अग ताई, ते  लोक आलेत बरं ! जीजू तर डिट्टो राकेश रोशन आहेत ,जुना हीरो नाही  का , म्हणजे रितिक रोशन चे पप्पा जसे दिसायचे ना जुन्या  सिनेमात तसे गोरे आणि  घारे डोळे, आणि हिरो !”


 वृंदाचे मन आनंदी झाले पण क्षणात तो आनंद ओसरला , मनात वाटल , "काय उपयोग? इतक्या सुंदर हिरो सारख्या  मुलाने मला पसंत तर करायला हवं ना!"


तीही दिसायला चांगलीच होती पण पंधरा व्या वर्षी  झालेल्या  एका ऑपरेशनमुळे ,गोळ्यांच्या साइड इफेक्ट ने ती थोडीशी स्थूल झाली होती.


बोलावल्यावर  ती बैठकीत आली.  सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळलेल्या होत्या .


तिने  सर्वांना पोहे दिले.  त्याच्या हातात प्लेट देताना नजरा नजर झाली.  खरंच तो  खूप हँडसम होता. डोळे तर अगदी राकेश रोशनच !


 पाहुण्यांनी  एकमेकांना जुजबी माहिती दिली.  


थोडेसे प्रश्न उत्तर झाले .ती मात्र अगदी बिनधास्तपणे बोलत होती कारण तो नकार देणारच आहे असं मनात निश्चित झालं होतं मग कशाला भ्यायचं?

पण तिचा हा मोकळपणा, तिचे भविष्याबद्दलचे विचार आणि पुढे नोकरी करण्याची इच्छा,  लग्नानंतर ड्रेस घालण्यासाठी मागितलेली  परवानगी, सगळं त्या लोकांना म्हणजे तिच्या आई व बहिणीला आवडलं.


 मुलगा काही विशेष विचारत नव्हता. तो बहिणीशी काहीतरी बोलायचा आणि बहीणच ते विचारत होती .


 मग दोघांना  वैयक्तिक काही बोलण्यासाठी वरच्या खोली पाठवण्यात आलं .


 वर जाताच तो खुर्चीवर  शांत बसला आणि तीही थोड्यावेळ अबोलच राहिली .


 शांतता अशीच राहील म्हणून  तिनेच पुढाकार घेतला आणि म्हणाली ,”लग्नाला संमती आहे ना तुमची? म्हणजे नकार देणार असाल आत्ताच सांगा , मी मनाची तयारी करेन .”


“ असं काही नाही . लग्न तर करायचं आहे, त्यामुळे तसा पर्याय माझ्याकडे नाही.अरेंज मॅरेज मध्ये काही विशेष फरक पडत नाही . कुणाशी  तरी तडजोड करायची असते ना, ती तुमच्याशी करेन .”


“तडजोड  करेन ?? नाही हो . मला उलट मला वाटतं की लव मॅरेज मध्ये माणूस तडजोड करून घेतो कारण त्यांचं प्रेम असतं ना . पण अरेंज मॅरेज मध्ये पर्याय  असतात विशेषतः मुलांना . म्हणून तर मुलं नकार देतात .हिच्यापेक्षा अजून चांगली मुलगी मिळेल म्हणून . . .. जी समोर आहे तिला नकार देतात. स्वभाव पाहत नाहीत .गुण पाहत नाहीत ,फक्त चेहरा पाहतात . लग्नानंतर त्या चेहऱ्याच काय होणार आहे याचा काय भरोसा?”  ती मात्र मनातलं सगळं एकदाच बोलून गेली. 


“ बरोबर आहे आहे तुमचं ,  घरच्यांचा आग्रह आहे . तुमचं स्थळ त्यांना आवडलं म्हणून मी तयार झालो “


“. अहो पण, म्हणजे तुमचं काहीच मत नाही का?”


“नाही. माझ्या मताने विशेष फरक पडत नाही. अनोळखी व्यक्ती सोबत पण एका घरात राहून राहून सवय होऊन जाते . अशीच  चालतात ना सगळी ठरवलेली लग्न? तुमचं काय?”


“ मला तशी संधी मिळणार नाही . कारण घरातलं वातावरण पाहिलं तर मला जर एखाद्या मुलाने पसंत केलं तर मी स्वतःला धन्य मानायचं आणि वरमाला घेऊन उभी  राहायचं. तशी माझ्या मताला विशेष किंमत नाही पण  तुमच्या मताला आहे. जर तुम्ही मला विचाराल तर. . .  वैयक्तिकरित्या सांगेन , मला तुम्ही आवडलात. म्हणजे दिसायला तर छान आहात पण जे आहे ते स्पष्ट बोलता, दिखावा करत नाहीत .असे स्पष्ट राहाल ? जर आपला योग जुळून आला तर ?”


तो  खिन्नपणे हसला.


“ आपल्या नशिबात काय लिहिलंय हे आपल्यालाच माहीत नसतं. किती हतबल  आहोत ना आपण  या नशीबापुढे?”


“का हो इतकी निराशा ? काही  अडचण आहे का?”  वृंदा काळजीत पडली .


“अहो तुमच्याकडून सॉल्व होणारी असती तर नक्कीच सांगितली  असती पण काही उपयोग नाही.  चला खाली जाऊयात ,नशिबाने काय ठरवले पुढे, पाहूयात.” 


“निराशेचा सूर सोडा. तुमचा होकार असेल तर आपण पुढे एकत्रित सुखाचा संसार करू.  मला विचारलं तर होकार आहे पण तुमच्यासारख्या माणसाची अडचण सोल्व करण्यासाठी तुमच्या जीवनात यायला आवडेल मला .” 


आता त्याने  तिच्याकडे पाहिलं,  नजरा नजर झाली. तिचा  चेहरा खूपच निरागस ,निष्पाप होता .थोडी स्थूल असेल पण खरच वृंदा खूप सरळ आहे असं वाटलं .


पण तिच्याबद्दल काहीही विचार करायला गेला तर त्याच्या मनात खोलपर्यंत एक  कळ गेली  आणि चेहऱ्यावरती त्या कळीचे ओरखडे दिसले .


तो चरकला . ‘मी यावेळी काय करायला हवं आणि मी काय करतो आहे ? आज मी कुठे असायला हवं आणि मी कुठे आहे?’


 त्याने दीर्घ श्वास घेतला आणि वर पाहिलं ,पूर्ण मनाने देवाची माफी मागितली.


दोघेजण हळूहळू खाली आले.


तिचा चेहरा तर खूप आनंदी दिसत होता. मामा व मावशी खुश झाले की काहीतरी आनंदाची बातमी दिसते परंतु तो आला तेव्हा पेक्षाही आता जास्तच कन्फ्युज दिसत होता .


मुलीच्या घरच्यांनी घाईने लगेच विचारले “काय मग?"


" काय कळवायचं ?” त्याच्या आईने विचारले.


तो  म्हणाला “ठीक आहे. कळवूयात .थोडा वेळ तरी द्या ना मला विचार करायला ?”


मंडळी परत निघाली.


‘ कळवतो’ या शब्दाचा अर्थ पुष्कळदा वधू पक्षांसाठी नकार आहे असाच होतो.


 वृंदा आनंदी दिसली तरीही त्याचा नकार  येणार असे मनात ठरवून होती  त्यामुळे चर्चा बंद झाली.


 घरातली मावशी, मामी, काकू यांनी मात्र वर दोघांचे काय बोलणे झाले? तू काही म्हणालीस का ?ते काही बोलले का? जमेल ना दोघांचं? असे प्रश्न विचारणे सुरू केले.  तिच्याकडे उत्तर नव्हते .


“पाहूयात माझ्या नशिबात काय आहे?”  तिच्या या वाक्यावर तिने सर्वांना गप्प केले.


  *************************************

क्रमशः 


लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३. ०७ .२४