Login

कळा ज्या लागल्या जीवा! (भाग तीन )

Intense Lovestory

कळा ज्या लागल्या जीवा
(भाग ३)

लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४



रुक्कू मंदिरात आली होती आणि त्याच्या आठवणीने व्याकूळ होती.

डोळ्यातले अश्रू दिसायला नको म्हणून ती मंदिराच्या मागे जाऊन बसण्याच्या विचारात होती .शंकराला कोणीच पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही त्यामुळे मागे कुणी येत नाही. खूपदा त्या दोघांची भेट मंदिराच्या मागे व्हायची. बरेचदा दोघे तिथेच येऊन गप्पा मारत बसायचे. ती जागा , हे मंदिर तर होतच घरून जवळ !

ती मंदिराच्या मागे गेली, जिथे बसण्यासाठी प्रशस्त चौथारा आणि दगडी खुर्च्या बनवलेल्या आहेत. पाहते तर तिथे एका खुर्चीवरती डोक्यात पाय घालून एक मुलगा बसलेला होता, ती आश्चर्याने ओरडली “मुरलीsss “
ती पुन्हा जोरात म्हणाली, मुरली !

त्यांने वर पाहिलं. ती जाऊन त्याच्या बाजूला बसली. तिच्या डोळ्यात अगोदरच अश्रू होते , त्यांने जेंव्हा वर पाहिलं त्याचे डोळे लाल झालेले होते.

तिने त्याच्या दंडाला जोरा जोरात हलवले ,”कुठे होतास दोन-तीन दिवसांपासून? किती शोधते मी तुला? का असा वागतोस ?”

त्याने नजर वळवली .

“मुरली काल कुठे होतास संध्याकाळी?”

“ खरेदीला गेलो होतो.”
त्यांने शून्यात पहात उत्तर दिले.

“ मी आत्ता ऐकलं अंगठी आणायला जाणार आहेस म्हणे?” तिने त्याच्या डोळ्यात पाहून विचारले.

त्याने तिचा दंडावरचा हात सोडवला .

“माझा उद्या गणिताचा पेपर आहे ."

"तर मी काय करू ?”
तो झटकन उभा राहिला.

“ काsय झालंय मुरली तुला? का असं करतोस? मरून जाईन मी तुझ्याशिवाय !”
तिच्या जागेवरूनच ती म्हणाली.

त्याने वळून पाहिलं व पटकन तिच्याजवळ आला.

स्वतःला खूप कंट्रोल केलं आणि म्हणाला “रुक्कू , सगळं स्वप्न समजून विसरून जा. माझा नाईलाज आहे.”

तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून तो बोलला, “आल दि बेस्ट उद्याच्या परीक्षेसाठी!”

“ मुरली थांब ना ! बोल ना मुरली माझ्याशी!” ती तिथेच बसून रडू लागली.

तो निघून गेला.

बराच वेळाने शांत झाल्यावर ती घरी आली.
आईच्या बडबडीला तिने काहीच उत्तर दिले नाही.

खोलीचे दार बंद करून अभ्यासाला बसली.
पण ती पुस्तकातलं काहीच पाहण्याच्या मनस्थितीत किंवा नोट्स वाचण्याच्या मनस्थितीत नव्हती.

एखादं गणित सोडवावं म्हटलं की त्याने ते कसं समजावलं होतं तेच आठवायला लागलं .

आयुष्याचं गणित उध्वस्त झालं होतं त्यामुळे हा गणिताचा पेपर तिला काहीच महत्त्वाचा वाटला नाही.

हातात पुस्तक ठेवून तशीच रडत रडत न जेवता झोपी गेली होती.
उशिरा आईने उठवलं होतं पण ती उठली ही नाही.

********************************************


इकडे साखरपुड्याचा सोहळा खूप छान झाला .
नवऱ्याकडच्या मुलांनी आणलेली जांभळी रेशमी साडी वृंदाला खूपच खुलून दिसत होती.

तो तसा फोटोग्राफरच्या म्हणण्यावर स्माईल देत होता पण मनातून आनंदी नव्हता .

“चला गाठ पक्की झाली म्हणायची , मुरलीधरराव चांगलं सांभाळा आमच्या वृंदाला!”.
तिचे मोठे काका आशीर्वाद देताना म्हणाले.
आलेल्या सगळ्या पाहुण्यांच्या पाया पडून झाल्यावर ओटीतली फळे आणि साखरपुडा काढून ठेवून मुरली व वृंदा खुर्चीवर बसले.

ती खूप आनंदात होती, मग हळूच त्याला म्हणाली “तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणायचा ,म्हणूनच तर तुम्ही पसंतीचा निरोप पाठवला.”

त्याने नुसतच तिच्याकडे पाहिलं ,थोड्या वेळ थांबला आणि म्हणाला “जेव्हा निर्णय घेता येत नाही ना तेव्हा चुकीचां का असेना पण निर्णय घ्यायला हवा आणि होणाऱ्या परिणामांचा सामना करावा या विचाराने मी तुला होकार कळवला.”

तिची निराशा झाली होती.

होकार कळाल्यापासून स्वतःबद्दल कुठेतरी सकारात्मक विचार करायला लागली होती पण त्याच्या या उत्तराने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले .

"म्हणजे मी एक पर्याय आहे तर. . . निर्णय नाही ! परीक्षेतल्या पर्याय निवडा प्रमाणे एक कुठलातरी लिहायचा. चूक की बरोबर ते नियती ठरवेल.”

“ असू दे ना , ते सगळं आता कशाला?” त्याने तिचं बोलणं थांबवलं कारण तो हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.


कार्यक्रम झाला. तीन महिन्यानंतरची लग्नाची तारीखही काढली. दोन्ही कुटुंब पुढच्या तयारीत रमायला लागले.

साखरपुडा झालेल्या रात्रीपासून त्याला कुठेच चैन पडत नव्हती, अपराधी भावना खायला लागली.

वृंदाला मात्र वाटायचं की त्यांने भेटायला यावं, घरी फोन करावा, विचारून फिरायला न्यावं , दोघांनी पुढची स्वप्न सजवावी. वास्तविक पाहता यात काहीही चूक नव्हतं परंतु प्रत्येक वेळी कंपनीचे काम आहे, कामाचे प्रेशर आहे, सध्या शक्य नाही, मीटिंग आहे अशी काहीही कारण सांगून तो टाळत होता .

एखाद्यावेळी घरी जायचाच भेटायला. घरी खूपच आदर आतिथ्य व्हायचं जे त्याला नकोस वाटायचं , अवघडल्यासारखं व्हायचं.

एके दिवशी दोघेजण घरी वरच्या रूम मध्ये बोलत बसले होते .

तिने विचारलं “काय हो आपण असंच राहणार आहोत का लग्नानंतर? इतकं औपचारिक?”
असं म्हणून तिने हे विचारताना हातात घेतलेला हात त्याला सोडवावासा वाटत होता पण तिच्या डोळ्यातल्या अर्जावाकडे पाहून तो शांत बसला.

त्या क्षणी त्याला रुक्कुचं ते दंड हलवून विचारणं आठवलं.

तो चटकन तिच्या पासून लांब झाला .

“तुझ्याशिवाय मरून जाईन रे मी!” हे वाक्य पुन्हा पुन्हा आठवलं आणि हृदयात खोलपर्यंत कळ गेली.

तो झटकन उठला आणि येतो म्हणून चालायला लागला .

त्याचं असं अचानक उठून जाणं वृंदाच्या खूप जिव्हारी लागलं . घरात काही सांगूही शकत नव्हती आणि लपवू शकत नव्हती.

**********
आज पूर्ण दहा दिवस झाले होते , रुक्कु व मुरली दोघांनी एकमेकांना न पाहता किंवा न भेटता.

इतका मोठा काळ गेल्या तीन वर्षात कधीच लोटला नव्हता.

एव्हाना सगळ्या श्रेय नगरमध्ये म्हणजे त्यांच्या कॉलनीमध्ये सर्वांना माहीत झालं होतं की मुरलीचा साखरपुडा झाला आहे आणि येत्या तीन महिन्यात लग्न आहे.

लोकांना त्यात काहीच वावगं वाटलं नाही कारण लग्नाचा मुलगा होता, नोकरी करत होता आणि लग्न ठरलं, इतकच.

नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात संध्याकाळी त्याच्याकडे वेळ असायचा तर तो गणिताची ट्युशन घ्यायचा.
अगोदर लहान मुलांची ट्युशन घ्यायचा मग नंतर वेळे अभावी कमी विद्यार्थी घेवून एकच बॅच घ्यायचा. तोपर्यंत रुक्मिणीचं दहावी झालं .

वेळ मिळेना मग ट्युशन कॅन्सल होऊन फक्त रुक्मिणी एकच विद्यार्थिनी राहिली.

आणि त्याच्याकडून शिकता शिकताच ती बावरी कधी त्याच्या प्रेमात पडली तिलाच कळालं नाही .

तिच्यासारख्या इतक्या चंट, स्मार्ट, तरुण आणि सुंदर मुलीने एवढं प्रेम दिलं,जीव लावला , की तोही तिच्यात कधी गुंतला त्यालाही कळालं नव्हतं.

त्याचा साखरपुडा झाला हे रुक्कु च्या आईला ही कळालं आणि त्यांना बरं वाटलं . आता तर टेन्शन मिटलं असं वाटलं.

रुक्मिणीला हे समजत नव्हतं की सगळे व्यवस्थित चालत असताना हे सगळं कसं घडलं ?

पाहता पाहता सगळी स्वप्नं उध्वस्त कशी झाली?

त्याचा साखरपुडा झाल्यापासून तर ती घरामध्ये स्वतःला कैद करून राहत होती .
स्वतःचे आवरण्याच भान राहायचं नाही, तयार होण्याचे नाही.
रात्रभर जागून आणि रडून डोळ्याभोवती काळी वर्तुळ झाली होती.

जेवणातही लक्ष नव्हतं ,आई रागवते म्हणून जेवायची .
आईला सगळं कळत होतं पण ती दुर्लक्ष करत होती.

कारण त्याचं लग्न ठरलं आहे, ते एकदा झालं की ही ठीकठाक राहील असं तिला वाटलं.

**********************
क्रमशः


लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४