कळा ज्या लागल्या जीवा! (भाग चार)

Intense Lovestory

कळा ज्या लागल्या जीवा
(भाग ४)

लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४


रुक्कुला सुट्ट्या लागलेल्या होत्या, परीक्षेचा निकाल येण्यासाठी महिना दीड महिना वेळ होता .

तशी त्या निकाला कडून तिला काहीच अपेक्षा नव्हती.

तिला तर आता आयुष्या कडूनच काही अपेक्षा नव्हती, कारण त्याच्याशिवाय ती कसं जगणार हेच तिला कळत नव्हत.

आणि मुळात तो या सगळ्याला तयार कसा झाला ?
तिला दिलेली वचने, तिच्यासोबत घालावलेला वेळ ते सगळं काय होतं ?

त्याच्या जवळ घेण्याची, त्याच्या स्पर्शाची इतकी सवय लागली होती की तो दुसऱ्या कुणाचा कसा होऊ शकतो? याला तिचं मन मानत नव्हतं.

एक दिवस रुक्कुने ठरवलं की जाऊन तिला भेटायचं आणि सगळं सांगायचं. घराचा पत्ता शोधुन काढला.

पुन्हा तिने विचार केला त्या बिचारीची तरी काय चूक ? हा म्हणाला म्हणून ती लग्नाला तयार झाली. आता ती नाही म्हणाली तरी हा मला थोडीच मिळणार आहे ?
त्याच्या घरची लोक ऐकतील का?

घरच्यांचा विरोध पत्करून तो काही करू शकेल का?

पण हा सगळा विचार आता करून काय उपयोग आहे?

साखरपुडा झाला आहे, त्यांची तर खरेदी पण सुरू होईल.
दोघं नवीन संसारात स्वप्न रंगवत आहेत.

‘ कसे कोण जाणे पण तिकडे कुणीतरी जाऊन वृंदाला हे सांगितलं की त्याची कुणीतरी मैत्रीण होती जिच्यावर त्याचं प्रेम होतं तरीही तो तुझ्याशी लग्न करतो आहे.’

ही बातमी कळल्यापासून वृंदा खूप बेचैन झाली.

तिने त्याच्या घरी फोन केला आणि निरोप दिला की ‘संध्याकाळी त्यांना पाठवून द्या.’

तो देखील एखाद्या निर्जीव पुतळा जावा तसा तिच्यासमोर जाऊन बसला.

“आपला साखरपुडा झालाय, दोन-तीन महिन्यात आपलं लग्न होईल. आपला संसार सुरू होईल आणि अजूनही तुम्ही माझ्याशी स्पष्ट बोलत नाही?”

“ काय स्पष्ट बोलायला हवंय मी ? काय पाहिजे आहे तुला?”

“तुम्ही नाराजीने माझ्याशी लग्न करत आहात?"

“ हो ते तर आहेच . मी तुला पाहायला आलो तेव्हा सांगितलं होतं."

" तिचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणे तुमचंही आहे का?” आता तिने स्पष्टच विचारलं.

“या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही.”

“ तुम्हाला द्यावे लागेल मुरलीधर ! त्याशिवाय काय विश्वासाने मी तुमच्या आयुष्यात येईन? माझ्या मनात ही अपराधी भावना राहील ना?”

“ अपराधी भावना असेल तर ती मला असावी, तुला असण्याचे कारणच नाही. गुन्हेगार मी आहे . . . तुझा पण आणि तिचा पण ! मी निर्णय घेऊ शकलो नाही. मी घरच्यांच्या विरोधात जाऊ शकलो नाही, तर माझा दोष आहे. तुला अपराधी भावना असण्याचे कारण नाही.”

“अपराधी भावना नसली तरी कुणाचं तरी सुख हिरावून घेतलेल्याची ती भावना राहीलच मनात . शिवाय तुमचे मन इतरत्र गुंतलेले असताना मी कशी तुमच्या सोबत राहू शकते? हा माझ्यावर अन्याय नाही का?”

“वृंदा, अन्याय झालाच असेल तर तो नियतीने माझ्यावर केला आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार आहे. सगळं कळत आहे पण मी हतबल आहे .काहीच करू शकत नाही.”

“ अजूनही विचार करा मुरलीधर ,आपण चूक करतो आहोत का?”

“साखरपुडा झाल्यानंतर तू हा विचार करतेस?”

“लहानपणापासून माझं दुर्दैव माझ्या सोबत आहे, ते माझी पाठ सोडणार नाही असे दिसते.”

“मी आधीच मनाने खूप खचलेलो आहे, त्यात या विषयावर मी आता बोलू शकत नाही. मी निघू का ?”

आणि तो विषय अर्धवट टाकून सरळ निघून गेला.

सगळं कळत असूनही वृंदा घरच्यांना काहीच सांगू शकली नाही कारण अनेक गोष्टींची उत्तरे वेळ देत असते.

मुरलीधरला किमान विचार करण्यासाठी वेळ मिळावा एवढीच तिची इच्छा होती.

आठवड्याभरानंतर वृंदाची मैत्रीण रत्ना कडून मुरलीच्या एका कॉलेजातील मैत्रिणीचा संपर्क झाला.

वृंदाला ती भेटल्यावर कळाले की हे रुक्मिणी प्रकरण साधे नाही. मुरलीची मैत्रीण सोनल हिला त्यांच्या नात्याबद्दल आणि जवळीक असण्याबद्दल सगळंच माहित होतं.

सोनल स्वतः आश्चर्यात होती की मुरली असं का वागतोय? मी त्याला समजावते असे ती म्हणाली.

वृंदा ने तिच्यावर विश्वास ठेवला.

दोन दिवसांनी सोनल मुरली च्या घरी गेली. त्याच्या आईशी आणि बहिणीशी गप्पा मारल्यानंतर तिला साखरपुडा झाल्याचे कळाले व हे पण माहीत झालं की मुरली ऑफिसच्या कामाने दोन दिवसांसाठी बाहेर गावी गेलाय. ती काही विषय न काढताच परत निघाली.

परत येताना ती रुक्मिणीच्या घरी पण गेली. तिची आई चर्चा करण्याच्या मूडमध्ये नव्हती .पण रुक्कुला भेटायचं म्हटल्यावर आईने सांगितलं की “अगं, सुट्ट्या लागल्या होत्या. ती आळशी पणाने नुसती घरी बसून होती. मग म्हंटल ,अगं मामाकडे तरी जा आठ दिवस तर नाही म्हणाली मग तिच्या होस्टेलवरची मैत्रीण राहते तर दोन मैत्रिणीसोबत ती गेलीय तिकडे धुळ्याला. “

“ओके काकू मग पुन्हा येते , आल्यावर भेटते तिला."

सोनल ने विचार केला की दोघे जर आपापले सेटल होतायत तर आपण कशाला सगळं बिघडवयचा. मुरली परत आल्यावर बोलुयात, आणि ती निघून आली.

******”**************************

दोन दिवस झालेच होते ,
तिसऱ्या दिवशी ऑफिस मधला शिपाई घरी आला व मुरलीच्या बाबांना म्हणाला की “सरांनी ही फाईल अर्जंट चेक करून मागितली आहे. मुरली सर दोन तीन दिवसांपासून आले नाहीत तर चौकशी पण करून ये म्हणाले.”

बाबांच्या पायाखालची जमीनच सरकली.

“अगं एs , बघ बरं हे काय म्हणताहेत? मुरली तर ऑफिसच्या कामानेच बाहेर गेलाय ना ! मग त्यांच्या साहेबांना कसे माहित नाही?”

आईला तर काय करावे कळेना.

इकडे रुक्मिणीच्या भावाला रुक्कुच्या हॉस्टेल मधल्या दोन मैत्रिणी रसवंती मधे दिसल्या.
त्याने विचारलं तर त्या म्हणाल्या की “आमचा प्लॅन बनला होता धुळ्याचा पण वेळेवर आमचे बाबा नको म्हणाले म्हणून आम्ही गेलो नाही.”

हे घरी कळताच आई खूप घाबरली .

कारण आईला माहित होतं की रूक्कुच्या मनाविरुद्ध सगळं चालू होतं तर पोरीने काही जिवाचं बरं वाईट तर केलं नाही ना अशी धडकी भरली.

भावाने आणि वडिलांनी सगळ्या मैत्रिणींकडे शोधलं.

नातेवाईकाकडे फोन करण्याची हिम्मत झाली नाही कारण बदनामी होण्याची शक्यता जास्त होती.

शेवटी ते दोघे दुसऱ्या दिवशी पोलिसात तक्रार करायला म्हणून तिचा फोटो घेवून गेले. गत्यंतर नव्हतं.

तिथे पोचले तर पाहतात की मुरलीचे वडील पण पोलीस स्टेशन मधून बाहेर येत होते.

दोघे रागाने एकमेकांना काहीच बोलले नाहीत.

पोलिसांनी मग विचित्र प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“काही प्रेमाबिमाची भानगड तर नव्हती ना? कुणावर संशय वगेरे, घरातलं काही चोरीला गेलंय का?”

तिच्या सरळ मार्गी वडिलांना असले प्रश्न काही रूचेनात, त्यांची चिडचिड व्हायला लागली.

“अहो असंच चालू आहे आजकाल. आम्हाला हॉटेल शोधावे लागतात, विहिरीचे तळ शोधावे लागतात, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन चेक करावं लागतं. एक ना हजार भानगडी!” इन्स्पेक्टर समजावत होता.

“माझी मुलगी खूप सरळ आहे हो. आता बारावी झालीय. “

“आता हेच पहा, प्रत्येकाला आपलं मुलं सरळमार्गी वाटतात . तुमची तक्रार व पत्ता लिहून घेतो आहे तपास करू. तुमची तरी मुलगी आहे पण तुमच्या अगोदर तुमच्या कॉलनी मधली अशीच केस आलीय. कमावता लग्नाचा मुलगा बेपत्ता झालाय.आता कसा अन् कुठे शोधायचा सांगा.”

या वाक्याने व इन्स्पेक्टरच्या संशयी स्टेटमेंट मुळे रुक्मिणीच्या वडिलांचे हात पाय थर थर लटपटायला लागले.

ते घरी निघून आले.

*************************************

क्रमशः


लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४

🎭 Series Post

View all