कळा ज्या लागल्या जीवा! (भाग पाच ) अंतिम

Intense Lovestory
कळा ज्या लागल्या जीवा
(भाग ५) अंतिम


लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४


इकडे

वृंदाची तब्येत बिघडली होती. आज पंधरा दिवस झाले होते बातमी कळून . . मुरली बेपत्ता आहे.
नेमकी रुक्मिणी पण बेपत्ता झाल्याने संशय बळावला होता की दोघे पळून गेले असतील.

पळाले तरीही ठीक पण जीवाचे काही बरे वाईट करून घेतले तर?

आता अलरेडी खूप बदनामी झाली होती. स्थानिक वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती.

पण पळून गेले तर जातील कुठे?
पत्ताच लागत नव्हता.
मुरली ने त्याचे लग्नासाठी ठेवलेले नकदी पैसे सोबत नेले होते आणि रूक्कु ने तिची सोन्याची चेन व सोन्याचे कानातले सोबत नेले होते.
गावात व नातेवाईकात चर्चा सुरू झाली होती.

सारखं काही कळालं का हो? असे प्रश्न विचारले जायचे.

दोघांच्याही वडिलांच्या मनात मुलांबद्दल घृणा निर्माण झाली होती.

**************************************

मुरली बेपत्ता झाल्यानंतर साधारण बावीस - पंचवीस दिवसांनी त्यांच्या घरासमोर टॅक्सी थांबली आणि सामानासकट चारजण खाली उतरले.

घरात एकच गोंधळ झाला.
मुरलीचा नेव्हीतला मोठा भाऊ ,वहिनी, मुरली आणि रुक्मिणी जी नवविवाहित दिसत होती ते आले होते.

मुरलीच्या मायेपोटी त्याची आई समोर आली.

तो सुरक्षित आहे याने ती सुखावली पण सोबत रुक्मिणीला पाहून तिला सगळा प्रकार लक्षात आला.
तिला रुक्मिणी बिलकुल आवडायची नाही, लहान आहे पण खूप आगावू आहे असं वाटायचं.
ती सतत तिच्या येण्या -बोलण्या बद्दल मुरली कडे तक्रार करायची. आता तीच दारात सून म्हणून उभी होती.

मोठ्या सुनेने सूत्र हातात घेवून वातावरण शांत केलं, दोघांचं औक्षण करून घरात बोलावलं.
मुरलीचे बाबा बाहेर आले नाहीत. आपल्या खोलीचे दार लावून बसले.
इकडे रुक्मिणीच्या घरी कुणीतरी पळत पळत जावून सांगितलं की ती परत आलीय.

आईला खूप राग आला होता पण मायेपोटी जीव भांड्यात पडला.
तिच्या मनासारखं तिने केलं, जाऊ दे आता काय करणार ?.असा विचार करून तिला भेटावं - पहावं वाटलं.

तिच्या वडिलांनी हे ऐकलं आणि त्या क्षणी त्यांना ते सगळे अपमानाचे व नाचक्कीचे दिवस आठवले व त्यांनी मुख्य दरवाजा लावून घेतला.

त्यांनी आईला बजावलं की तिच्याशी आपला संबंध नाही, तू काहीच संपर्क ठेवायचा नाही, घरात घ्यायचं नाही .

मुरलीच्या मोठ्या भावाने व वहिनीने चार दिवस राहून त्यांच्यासाठी कॉलनीत दोन खोल्यांचं एक घर भाड्याने घेवून दिलं. बेसिक व्यवस्था केली व ते परत गेले.

मुरलीच्या आई वडिलांनी वृंदाच्या घरी जावून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.

लग्नानंतरचे संकट टळले असा काहींनी विचार केला .

सोनल कडून निरोप देवून मुरली व रुक्मिणी ने एक दिवस वृंदाला बाहेर भेटायला बोलावलं कारण तो घरी जाऊ शकत नव्हता. . . त्याच्यासाठी जोखीम होती.

त्याने तिला सर्व परिस्थिती सांगितली की कसा मुरली आईच्या शपथेत बांधलेला होता.

रुक्मिणी तर साखरपुड्या नंतर जीव देण्याच्या तयारीत होती पण तिने एक कॉल मुरलीच्या वहिनीला केल्यामुळे सगळं चित्र पालटलं होतं.

वहिनीने पुढाकार घेवून भावाच्या मदतीने कसा प्लॅन करून दोघांना विशाखपट्टणमला बोलावून घेतलं.

परीक्षेनंतर तिथे पोहचेपर्यंत रुक्मिणीला अठरा वर्षे पूर्ण झाली होती.

दादा वहिनींनी व्यवस्थित विधिवत लग्न लावून दिले. रजिस्टर करण्याची व्यवस्था पण केली.

साखरपुड्याला हे दोघे आले नव्हते, त्यावेळी वेळ नव्हता, शिवाय जे चालू होतं ते दोघानाही पटलं नव्हतं.

रुक्मिणी मुरली पेक्षा ८ वर्षांनी लहान होती, त्यामुळे कुणीच त्यांच्या नात्याचा विचार करत नव्हतं.

वृंदा ला सगळं सांगितल्यावर दोघांनी पण हात जोडून तिची माफी मागितली.

नाईलाज का असेना पण तिने माफ केलं आणि निघताना म्हणाली ,

“माझं नाव आईवडिलांनी वृंदा ठेवलंय त्यामुळे श्रीकृष्ण कधीच वृंदेला मिळत नाही, तो रुक्मिणीचाच असतो. नाही का! काळजी करू नका मुरली. मी जगेन माझं आयुष्य तुम्हाला मनात ठेवून कारण मनाने मी तुम्हाला वरलं आहे. मी बाबांच्या माघारी आईचा आधार बनेन. आता हिम्मत आली आहे माझ्यात. ”
"तुझ्या या त्यागाचं ओझं आमच्या प्रेमावर राहील वृंदा! कुठल्या शब्दांत माफी मागू?"
मुरली खाली मान घालून म्हणाला कारण स्वप्न धुळीत मिळणं काय असतं हे दोघांनी अनुभवलं होतं.
"ओझं नका बाळगू, दोघे स्नेह असू द्या फक्त. चला कुणीतरी सुखी आहे म्हणून मी रिलॅक्स राहीन. नाहीतर तिघांच्याही आयुष्याची राख झाली असती.

वृंदा निघून गेली पण ती जाताना रुक्मिणी आणि मुरली तिला कितीतरी वेळ श्रध्देने पहात होते.

***************************


आयुष्य जेव्हा सुरळीत चालू असतं तेव्हा ते गतिमान वाटतं.
काळ असाच तीव्र गतीने पुढे गेला.

आज २० वर्षानंतर मुरली व रुक्मिणी एक यशस्वी जोडपं आहे. रुक्मिणी ने कष्टाने संसार केला आणि ब्युटी पार्लरचा कोर्स केला व स्वतः चे पार्लर चालवत खूप नाव व पैसा कमावला.
मुरली ने नोकरी करता करता स्वतः ची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली व हळू हळू वाढवत गेला. आता छान नावारूपाला आला.
लग्न झाल्यावर दोन वर्षानंतर मुरलीच्या आईने त्यांना मोठया मनाने व मोकळेपणाने घरी परत बोलावून घेतलं.
रुक्मिणी च्या घरी मात्र पाच वर्षे लागली त्यांना माफ करायला.
रुक्मिणीच्या पहिल्या मुलाच्या बारशाला आई आली आणि मग नातवाच्या मायेपोटी पुन्हा नाती जुळली.

आज या जोडप्याला ८वी आणि ६ वी अशी शाळेत शिकणारी( एक मुलगा व एक मुलगी ) दोन मुले आहेत.

वृंदा एका वृद्धाश्रमात ऑफिसमधे नोकरीला लागली आणि मग तिने स्वतः साठी व तिच्या आईसाठी तिथेच राहण्याची व्यवस्था करून घेतली आहे.
ती सेवा करून ,मेहनतीने व स्वाभिमानाने जगते आहे. तिने आईच्या काळजीपोटी अविवाहित राहणेच पत्करले.

जीवाच्या कळा जितक्या असह्य होतात तितक्याच त्या काळानुरूप शिथील ही होतातच की!

समाप्त
लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३.०७. २४
(कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे सुरक्षित.)

🎭 Series Post

View all