Login

कळा या लागल्या जीवा ( भाग २)

Sarcastic humour
 
कळा या लागल्या जीवा
भाग २
©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण माधव आणि रमा या जोडप्यात सुरु असलेला प्रेमळ संवाद ऐकला. आता माधव प्राध्यापक महाशयांना फोन करतो. आता पाहूया माधव आणि समीक्षक असणारे व प्रस्तावना देण्यास तयार झालेले प्राध्यापक महाशय यांच्यातील संवाद...


"हॅलो! नमस्कार प्राध्यापक महाराज."

"कोण बोलतंय?"

 "अहो मी माधव काळोखे ! माझ्या काही कविता आणि कथा तुमच्याकडे समिक्षणासाठी दिल्या होत्या बघा दोन महिन्यांपूर्वी! भ्रमर या टोपणनावाने मी लिहितो. आठवले का?"


"बरं झालं टोपणनावाने लिहिता."

हे ऐकून आनंदित स्वरांत माधव म्हणाला,

" भ्रमर कसा मध गोळा करतो तसे मी ..."

पण पलिकडून प्राध्यापक महाशय त्याचे वाक्य अर्ध्यावर तोडत म्हणाले,

" भ्रमर नाही हो ! मधमाशी मध गोळा करते. भ्रमर या फुलावरुन त्या फुलावर बसतो आणि मध प्राशन करतो."


"खूपच चावट आहात तुम्ही."


"आता यात मी काय चावटपणा केला? मधमाशीचे कार्य आणि भुंग्याचे कार्य यांत तुमचा घोळ झाला होता ते समजावले. त्याआधी मला एक सांगा, हा तुमचा नवीन मोबाईल नंबर आहे का?"


 "माझ्या मोबाईलवरुन तुम्हांला फोन लावला तर रिंग होते पण तुम्हांला ऐकू येत नाही. म्हणून मी ऑफीसच्या लॅंडलाईन वरुन तुम्हांला फोन केला. तेव्हा तुम्ही उचलला, पण त्यानंतर त्यावरुन पण आवाज येणे बंद झाले. तुम्ही फोन उचलायचा पण मलाच आवाज ऐकू यायचा नाही. म्हणून आज मिसेसच्या मोबाईल वरुन फोन लावलाय. आज अगदी स्वच्छ ऐकू येतेय. मलाही आणि तुम्हांला ही. "

"अच्छा! म्हणजे आता हा ही नंबर मला सेव्ह केला पाहिजे."

"हो हो.अवश्य सेव्ह करा.माझ्या मिसेसचे नाव रमा आहे.मी माधव आणि या माधवची ती रमा! लग्नानंतर तिचे नाव बदलले मी."

"तुमच्या मिसेसच्या नावाशी माझा दुरान्वयानेही काही संबंध आहे का ?"

"नाही.असेच सांगितले हो ! नावात सुद्धा लय सांभाळली मी! हे सांगायचे होते. "

"हीच लय लेखनात सांभाळता आली असती तर..." प्राध्यापक महाशयांच्या अगदी ओठांवर आलेले हे शब्द न उच्चारता ते म्हणाले,

" तुमचे लेखन वाचायला सुरुवात केली आहे. सगळे वाचून झाले की तुमचे बाड परत करतो."

"आणि समिक्षण ? प्रस्तावना? "

" प्रस्तावना... ती तर मोठा यक्षप्रश्न बनून माझ्यासमोर उभी आहे."

"म्हणजे काय सर? समजले नाही मला. तुमच्या मार्गदर्शनपर शब्दांची वाट पाहतोय मी. माझ्या लेखनातील चुका समजल्या तर माझ्या लेखनात सुधारणा होईल."

"प्रत्येक वाक्यावर कसे मार्गदर्शन करु मी? त्यातील चुका कशा सांगू?"

"बिनधास्त करा सर. तुम्ही चुका दाखवल्या तर मला अजिबात वाईट वाटणार नाही."

"काय माणूस आहे हा ! कुठून मला दुर्बुद्धी झाली आणि हो म्हणालो. आधी थोडेतरी वाचून अंदाज घ्यायला हवा होता. आता भोगा आपल्या कर्माची फळे." अर्थातच हे स्वगत होते.


"रोहितला त्याची प्रेयशी म्हणाली,
"तुझे माझ्यावर किती प्रेम आहे? आयुष्य दावपर लावायला तू तयार आहेस का?" हे तुम्ही लिहिलेले वाक्य पहा.

प्रेयशी नसते हो..प्रेयसी असते, आणि त्याच्या पुढच्या वाक्यात तुम्ही चक्क मराठी व हिंदी या दोन्ही भाषांचा खूनच केलात".

"सर, मी नवीन तयार केलाय तो शब्द! यामुळे मराठीत अजून एका शब्दाची भर पडली याचा मला अभिमान वाटतो."

"कुठला नवीन शब्द ?"

"प्रेयशी हा शब्द! याबद्दल बोलतोय मी. प्रेयसीचा अर्थ आहे जिच्यावर प्रेम आहे ती.आणि इंद्रियास अति प्रिय ते प्रेय! या प्रेयला मी शी जोडले. शब्द तयार झाला प्रेयशी."

"प्रेय या शब्दाला शी का जोडले तुम्ही?"

अहो मी आत्ताच सांगितले ना, मी नवीन शब्द तयार केला म्हणून?"

"असे शब्द तयार करता येतात?"

" येतात ना ! ते जरा ला आपण जोडत नाही का जराशी..तसे प्रेयशी."

 "छान! तुम्ही खरे तर मराठी शब्दकोशासाठी हातभार लावताय.आणि मी तुम्हांला उगाचच शब्दांचे अर्थ विचारतोय." हे बोलत असताना आपल्याला येणाऱ्या रागावर कंट्रोल करण्यासाठी प्राध्यापक महाशयांना खूप त्रास होत होता.


"आणि ते मराठी वाक्यात हिंदी शब्द ?"

"ते तर एकदम सिंपल आहे.
तुम्ही सध्याचे लेखन वाचत नाही का? अशा सरमिसळ शब्दरचना लोकांना फार आवडतात."

"हे कुणी ठरवले? म्हणजे कुठल्या वाचकांचा तुम्ही सर्व्हे केला होता?"


"तुम्ही मालिका पहात नाही? पात्रांच्या तोंडी सरसकट अशीच वाक्यरचना असते."

 "मी काही अशा धेडगुजरी मालिका वैगेरे पहात नाही. 

   आता मला सांगा ,तुम्ही कुठल्या लेखकाचे साहित्य वाचले आहे ?तुमचे आवडते साहित्यकार कोण आहेत ज्यांच्या लेखनशैलीचा तुमच्या लिखाणावर प्रभाव आहे? "

"खरं सांगू, मला बालपणी गोष्टी वाचायला खूप आवडायच्या. मी सिंदबादच्या सफरी वाचलेत. चांदोबा वाचायचो. परीकथा वाचायचो, पण यांचे लेखक कोण होते ते मला माहीतच नाही.

नंतर अभ्यासामुळे इतर काही वाचायला वेळ नव्हता.पण आता फेसबुकवर आणि वाॅटसअप वर आलेले सगळे लेख,कथा आवर्जून वाचतो."

"एक प्रश्न विचारु? तुम्ही का लिहिता?"

"अरे वा! सर, तुम्हांला माझे लेखन इतके आवडले? धन्यवाद! तुम्ही माझ्या कथासंग्रहासाठी प्रस्तावना लिहिताय? मी धन्य जाहलो."

"इतक्यात धन्य होऊ नका. मी तुमची मुलाखत घेत नाहीय. मी सरळ साध्या भाषेत विचारले आहे की,तुम्ही का लिहिता?"


क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५

🎭 Series Post

View all