Login

कलम तीनशे चोपन्न

The use and misuse of law
कलम तीनशे चोपन्न
भाग १

©® सौ.हेमा पाटील.

साकेत ऑफिसमध्ये कामात मग्न होता, तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने एक नजर मोबाईलवर टाकली तर अनोळखी नंबर दिसला. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष करत त्याने पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. तेवढ्यात परत एकदा मोबाईलची रिंग वाजली. तेव्हा त्याने मोबाईल हातात घेतला. तोच नंबर रिपीट झाला होता. काहीशा वैतागलेल्या आवाजात तो म्हणाला,
"हॅलो, कोण आहे?" यावर पलीकडून आवाज आला,
" साकेत देशमाने." यावर तो म्हणाला,
" मीच साकेत देशमाने. आपण कोण? लवकर बोला. मी कामात आहे."
" ओ साहेब, आम्ही काय रिकामटेकडे आहोत का? कामासाठीच फोन केलाय."
ही भाषा ऐकल्यावर साकेत चपापला. तो म्हणाला,
" कोण आपण? काय हवे आपल्याला? आपण जर विमा एजन्सीकडून बोलत असाल तर सॉरी. किंवा एखाद्या स्कीमबद्दल बोलत असाल तरी कृपया माझा वेळ घेऊ नये. मी खरंच खूप कामात आहे."
"एकदा सांगितलेलं समजत नाही का? टाईमपास म्हणून फोन केला नाहीये. एक काम करा. आत्ताच्या आत्ता तिथून निघा आणि इथे पोहोचा."
" असं कसं पोहोचा? माझं काम सोडून तुमच्यासमोर कशासाठी येऊ?
ओ मिस्टर! ठेवा आता फोन. काय पण कामाच्या वेळात डोकं खातात. एकतर तो बाॅस कामं लवकर संपवा म्हणून वेताळासारखा मानगुटीवर बसलेला असतो, अन् त्यात हे एजंटचे फोनकाॅल्स."
यावर पलिकडून आवाज आला,
" तुम्ही बऱ्या बोलाने येताय की शाही इतमामात घेऊन जाण्याची व्यवस्था करु?"

"म्हणजे? अरे यार कोण बोलतंय? काय कटकट आहे? एक तर काम उरकायचे आहे, तर मध्येच हा फोन."

"मी काय सांगितले समजले नाही का? अच्छा! सरळ भाषा समजतच नाही तर! ठीक आहे. पाठवतो मग मी दोन पोलिस. त्यांच्यासोबत सावकाशीने या." हे ऐकून साकेत गडबडला.
" कोण बोलताय आपण? कुठे यायचे आहे मला?"
" आता कसे लाईनवर आलात? मी पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टर दळवी बोलतोय. तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये येऊन तुमचा जबाब द्यायचा आहे."
" माझा जबाब? तो तुम्हाला कशासाठी हवा आहे?" यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
" तुम्ही करून सवरुन बाजूला होता हो. पुढचे सगळे आम्हाला निस्तरावे लागते." यावर साकेत म्हणाला,
"अहो, मी एक वेलएज्युकेटेड पांढरपेशा मध्यमवर्गीय माणूस आहे. मी कशाला या असल्या लफड्यात पडू?"
यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
"ओ मिस्टर साकेत देशमाने! तुम्ही कुठल्या प्रकरणात साक्ष द्यावी म्हणून मी तुम्हाला बोलवत नाहीये. तुमच्या विरुद्ध आमच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्याबाबत जबाब देण्यासाठी मी बोलवतोय."
"काय? माझ्याविरुद्ध गुन्हा? आणि तो कोणी दाखल केला?"
"ही सगळी माहिती तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर मिळेल. मग येताय की...?"
यावर गडबडीने साकेत म्हणाला,
" येतो, येतो साहेब. पाच मिनिटातच निघतो. कुठल्या पोलीस स्टेशनला यायचे आहे?" यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
" सिटी पोलीस स्टेशनलाच या."
" हो" असे म्हणून साकेतने फोन ठेवला. त्याचे डोके चालेनासे झाले. ही काय भानगड नवीनच? आधीच व्याप कमी आहेत, त्यात हे काय आणखी? आणि या पोलीस स्टेशनची पायरी चढायची म्हणजे किती कटकट असते! आलिया भोगासी असावे सादर असे मनाशी म्हणत त्याने आपले दप्तर आवरले. गाडीला किक मारत तो पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. त्याच्या डोक्यात विचारांची चक्रे सुरू होती.

पोलीस स्टेशन मध्ये पोचल्यावर त्याने एका पोलिसाला विचारले,
" इन्स्पेक्टर दळवी यांना भेटायचे आहे."
साकेतला आपादमस्तक न्याहाळत तो पोलीस म्हणाला,
" काय काम आहे?" यावर त्याच्याकडे रोखून पहाणाऱ्या त्या पोलिसाची नजर चुकवत साकेत म्हणाला,
" साहेबांनीच बोलावले आहे."
" काय गोंधळ घालून ठेवलाय?" यावर साकेत काहीच बोलला नाही. कारण त्याला तरी कुठे काय माहित होते?

दळवी साहेबांच्या केबिनकडे बोट दर्शवत त्या पोलिसाने दळवी साहेब कुठे भेटतील ते सांगितले. त्या दिशेने साकेत चालू लागला. त्याच्या हृदयात धडधड होत होती, कारण पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची त्याच्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ होती. नाही म्हणायला पासपोर्ट काढण्यासाठी पोलिस व्हेरिफिकेशनसाठी तो पोलीस स्टेशनला गेला होता, पण ती तांत्रिक बाजू होती. इथे इन्स्पेक्टर साहेब सांगत होते, गुन्हा दाखल झाला आहे. ते ऐकून त्याची पाचावर धारण बसली होती. केबीनबाहेर दार ठोठावत तो म्हणाला,
" मी आत येऊ का?" यावर आतून इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
" या." तो भीतभीतच आत गेला, आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या टेबल समोर असलेल्या खुर्चीवर बसला.

" मी साकेत देशमाने. आपला मगाशी फोन आला होता."
" हो. कुठे काम करता तुम्ही?"

" मी कंपनीत कामाला आहे."
"कंपनीला नाव गाव काही नाही का?"
"आहे ना साहेब. मी मर्फी कंपनीत कामाला आहे."
तेवढ्यात साकेतचा फोन वाजला. रश्मीचा फोन आला होता. रिंगचा आवाज ऐकून इन्स्पेक्टर साहेब म्हणाले,
"आधी तो फोन कट करा आणि फोन सायलेंट करुन ठेवा. नाहीतर फोन जप्त करेन."
"साहेब, फोन माझा आहे. मी फोनवर बोलायचे की नाही हे मी ठरवेन. तुम्ही मला कशाला बोलावले आहे लवकर सांगा. माझ्यापाशी वेळ नाही."
इन्स्पेक्टर साहेबांनी वर मान करून साकेतकडे पाहिले. त्यांची ती भेदक नजर पाहून साकेत जरा चपापला. नरमाईच्या सुरात तो म्हणाला,
"प्लीज, मला लवकर मोकळे करा. मला लवकर घरी जायचे आहे."
"घरी जायचेय? कसे जाणार?"
"कसे म्हणजे काय साहेब? माझी गाडी आहे ना?" साहेबांचा उपरोधिक स्वर न समजून साकेत म्हणाला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
इन्स्पेक्टर साहेबांनी साकेतला कशासाठी बोलावले असेल? तो तर पांढरपेशा मध्यमवर्गीय माणूस... कुणाच्या अध्यात न मध्यात. ना कुठल्या टोळक्यासोबत कुठल्या मंडळाचा सभासद होता...की दंगा झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. मग नेमके काय झाले असेल? कथेच्या पुढील भागांमध्ये याचे कोडे उलगडेलच..
अष्टपैलू लेखक स्पर्धा २०२५
सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५