Login

कलम तीनशे चोपन्न भाग ५

Use and misuse Of Law
कलम ३५४
भाग ५

©® सौ.हेमा पाटील.

पोलिस स्टेशनमध्ये जबाब देऊन साकेत घरी आला होता. रश्मीला त्याच्या चेहऱ्याकडे पाहून समजले की, काहीतरी घडले आहे. थोड्यावेळाने साकेतने जे घडले ते सगळे तिला सांगितले. आता तिथून पुढे...

"तू आणि विनयभंग? काय सांगतोयस ?" रश्मी उद्गारली.
"हो. माझ्यावर तसाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे." साकेत म्हणाला.
"याला पुरावा काय असे विचारले नाही का तू ?" रश्मी म्हणाली.
"अगं, पुरावा म्हणून त्यांनी दोन फोटो सबमिट केले आहेत. त्यात ती फिर्यादी बाई आणि मी जवळजवळ उभे आहोत. एका फोटोत तर नको त्या अवस्थेत आहोत." असे साकेतने सांगताच रश्मी उसळली.
"असे कसे? तू जवळ गेला असल्याशिवाय असे फोटो कसे काढता येतील?"
"तेच तर ! मी पण ते फोटो पाहून आश्चर्यचकित झालो. कितीतरी वेळ मी ते फोटो हातात घेऊन निरखून पाहिले. तरीही ती बाई कोण आहे हे माझ्या लक्षात आले नाही." असे साकेत म्हणताच त्याच्याकडे अविश्वासाने पहात रश्मी म्हणाली,
"अच्छा! म्हणजे ती बाई कोण आहे हे तुझ्या लक्षात आले नाही हे तुझे दुःख आहे का? असे किती बायकांच्या एवढे जवळ जातोस तू ? दर महिन्याला गावाला जातो म्हणून जे जातोस त्यावेळी कामात आहे असे सांगून तू फोन उचलत नाही. ते या कामात असतोस वाटतं? म्हणजे मीच मुर्ख आहे."
"झाली का तुझी सुरुवात? तुला वेळ, काळ तरी समजतो का? या तुझ्या संशय घेण्याच्या पायात एक दिवस खरंच काहीतरी करुन दाखवतो तुला. मग पस्तावशील."
"आला मोठा करुन दाखवणारा... त्यासाठी हिंमत लागते; आणि तू करुन दाखवणार? दाखवच तू! मला पण बघायचेच आहे."

"ऐ बाई, आता तू नवीन नाटक सुरु करु नकोस. एकतर आजचा दिवस त्या पोलिस स्टेशनमध्ये बसून बसून माझे डोके चक्रावले आहे. त्यात ते ३५४ आणि अटक वॉरंटचा अर्ज. आता तू आणखी डोकं खाऊ नकोस."
"मी डोकं खाते? बरोबर आहे. आता तसेच वाटणार, पण राजरोसपणे शेतात असे काही करताना तुला भीती वाटली नाही? "
"तुला लाज असे म्हणायचे आहे का? विचारण्याच्या पद्धतीवरुन तरी तसेच वाटतेय."
"हो. बरोबर ओळखले. मला लाजच म्हणायचे होते , पण तो शब्द तुला खूप खटकेल म्हणून वापरला नाही." रश्मी म्हणाली.
"थोडी तरी जनाची नाही मनाची शिल्लक ठेव गं. मी इतका थर्ड क्लास माणूस आहे का?" साकेत रागावून बोलला.
"आता तुम्हीच सांगताय, पोलिसांकडे तसे फोटो आहेत म्हणून.भल्याची दुनिया राहिली नाही रे देवा." या रश्मीच्या म्हणण्यावर साकेत म्हणाला,
"ऐ बाई, तुझे तोंड बंद ठेव. बकरीसारखे ते कायम चालूच असले पाहिजे असे नाही. मला शांततेची आवश्यकता आहे."
" हो का? आता शांतता हवी आहे ? मी गप्प बसेन, पण ती बाई माझ्यासारखी गप्प बसणार नाही ना. म्हणून तर तिने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे ना. निस्तर आता."
" तू फोटो नीट पाहिला आहेस का? मी जबरदस्ती करतोय असे कुठलेही भाव त्या बाईच्या चेहऱ्यावर नाहीत. मग तिने तक्रार का नोंदवली असेल?"
" तुमच्या बोलण्याला काही ताळतंत्र आहे का? घडीत म्हणताय मी काही केलेच नाही. घडीत म्हणताय त्या बाईचा चेहरा बघ. म्हणजे ती तुमच्यासोबत किती खुश आहे हे बघू का मी? आणि ते बघून मी पण खुश होऊ का?" रश्मीच्या शब्दांच्या लाह्या आता फुललेल्या अंगारासारख्या बरसल्या.
अहो जाहो ची भाषा सुरु झाली की रश्मीच्या रागाने एकदम वरचा टप्पा गाठलेला असतो हे त्याला अनुभवाने माहीत झाले होते. तरीही तो उखडलाच.
"अगं तुला मगाशीच सांगितले आहे की स्वतःची अक्कल पाजळू नकोस. असे काहीही झालेले नाहीय. मी कुणाचाही विनयभंग केलेला नाही. मी बाहेर असताना माझ्यावर संशय घेतेस, तेवढे पुरेसे नाही का?घरातच ही अवस्था मग बाहेरचे काय म्हणतील?" साकेत डोके धरुन बसला.
"म्हणजे खरंच तू काही केलेले नाही? मग ते फोटो?" रश्मीने विचारले.
"मला पण तोच प्रश्न पडलाय. अशावेळी माझ्या सोबत असले पाहिजेस तू. तर तूच अशी संशय घेतेस?" साकेत दुखावला गेला होता.
"तूच सांग. फोटो पाहून माझे टाळकेच सटकले. माझा नवरा दुसऱ्या बाईच्या मिठीत?" रश्मी म्हणाली.
" अगं बाई ते खरं नाही. ते शेत आपलेच आहे, पण फोटो मात्र ॲप वापरुन दोन फोटो जोडून तयार केलेला असणार आहे. याबाबत वकीलांशी चर्चा केली पाहिजे. मी तिथूनच विवेकला फोन केला होता. त्याने सांगितले त्याप्रमाणे मी जबाब दिला. आता त्याच्याशी बोलून एखादे निष्णात वकील दिले पाहिजेत. त्यांना सगळे सांगितले पाहिजे, पण आता आपल्यामागे कोर्ट कचेरी लागली हे निश्चित! पैशापरी पैसा जाईल, सोबत वेळ आणि मनःस्वास्थ्य. आता तुला हात जोडून विनवतो की बाई , आता तरी जरा शहाण्यासारखी वाग. बास कर प्रत्येक वेळी संशय घेणे. मी हे सगळे निस्तरु की तुझ्या प्रश्नांना सामोरे जाऊ?"

क्रमश: ©® सौ.हेमा पाटील.


सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५