Login

कलम तीनशे चोपन्न भाग ६

Use and misuse of Law
कलम तीनशे चोपन्न
भाग ६
©® सौ.हेमा पाटील.

"आता आपल्यामागे कोर्ट कचेरी लागली हे नक्की!" असे साकेत म्हणाला. यासोबतच तो म्हणाला,"आता तरी जरा शहाण्यासारखी वाग."

ते ऐकल्यावर रश्मी म्हणाली,
" याचा अर्थ कुणीतरी खोटी केस केलेली आहे . आपला तर कोणाशीही भांडण तंटा नाही. मग असे कोणी का करेल?"

" तोच विचार करुन करुन डोके फुटायची वेळ आली आहे. माझ्या वाईटावर कोण असू शकते? किंवा अजाणतेपणी माझ्याकडून कुणाचे काही अकल्याण झाले होते का? हे मघापासून आठवून पहातोय मी.'

यावर ओघाने साकेतला आठवले, त्याची शेतजमीन रस्त्यालगत होती. त्यासाठी शहरातील प्रसिद्ध बिल्डर शहा यांनी त्याची जागा विकत मागितली होती; परंतु मला माझी जमीन विकायची नाही असे साकेतने सांगितले होते. त्यावर
" जागेचा दर प्रतिगुंठा पाच लाख आहे, मी तुम्हाला सहा लाख गुंठा याप्रमाणे दर देतो. ती जमीन मला द्या." असे शहाने सांगितले होते. यावर साकेतने स्पष्टपणे सांगितले,
" मला ती जमीन विकायचीच नाही."
यावर परत शहाने दोन वेळा त्याच्याकडे माणसे पाठवली होती. त्याने त्यांनाही स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर शहा यांचा फोन आला होता. त्यांनी साकेतला फोनवर विचारले होते,
" बघा, तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात का?"
यावर साकेत म्हणाला,
" मी तीन वेळा आपणांस नकार दिलेला आहे. तरीही आपण का विचारत आहात?" यावर शहा म्हणाले,
कारण मला कुठल्याही परिस्थितीत ती जागा हवी आहे."
"ही कुठली जबरदस्ती? मला जागा विकायची नाही." असे साकेतने सांगितले.
" याचा परिणाम चांगला होणार नाही." असे शहा म्हणाले .
साकेत म्हणाला,
" जमीन माझ्या मालकीची आहे. त्याचे काय करायचे ते मी ठरवेन. तुम्ही मला धमकी देताय का?"
" तसेच समजा. मी तुम्हाला 24 तासांची मुदत देत आहे. या अवधीत नीट विचार करा, आणि तुमचा होकार मला कळवा." यावर साकेत काहीच बोलला नाही आणि त्यांनी फोन ठेवला.
साकेतने याबाबत त्यांना काही फोन केला नव्हता. माझी जमीन मी कसेन नाही तर पाडून ठेवेन. हे कोण मला सांगणारे? असा विचार त्याने केला होता.
ही घटना त्याला आठवली तेव्हा त्याने रश्मीला याबाबत सांगितले. रश्मी घाबरेल म्हणून शहाने धमकी दिली आहे हे त्याने याआधी रश्मीला सांगितले नव्हते.
"शहा याच्या मागे असू शकेल का? " या साकेतच्या प्रश्नावर रश्मी म्हणाली,
" काय माहित? पण तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात शहाचा काय फायदा?"
" अगं दहशत, दुसरे काय! आपण मध्यमवर्गीय माणसे चारित्र्यावर शिंतोडे उडाले तर अस्वस्थ होतो. चार माणसांत आपली छी थू होईल या विचाराने मी जमीन विकायला तयार होईन असे त्याला वाटले असेल. सरळपणाने त्याने मला जमीन मागितली होती. मी बधत नाही हे पाहून त्याने हा मार्ग स्वीकारला असणार." साकेत असे म्हणतोय तोवर त्याला फोन आला. वैतागून फोन कट करण्यासाठी त्याने बोट पुढे केले, एवढ्यात त्याने नाव वाचले. शहाचा फोन होता. तो पाहून त्याने फोन घेतला.

"काय मग साहेब! जेवलात का?" पलिकडून शहाचा आवाज आला.
"हो. जेवलो आत्ताच. बोला, काय काम काढलेत?"
" काम ते नेहमीचेच. दुसरे काय असणार? काय मग? देताय जमीनीच्या कागदांवर सह्या?"
" मी यापूर्वी अनेक वेळा आपणांस नकार दिला आहे तरीही पुन्हा पुन्हा का विचारताय?"
हे ऐकून शहा म्हणाले,
" आजवरची गोष्ट वेगळी होती. आज..." असे म्हणत शहाने वाक्य अर्ध्यावर सोडले.
त्या वाक्याचा अर्थ न करण्याइतका साकेत बुद्धु नव्हता. तरीही तिकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला,
" तुमचे बोलून झाले असेल तर ठेवू का फोन?"
" याचा खूप त्रास होईल तुम्हांला. समाजात बदनामी होईल ती वेगळीच. नोकरी सुद्धा जाईल तुमची. शहाणे असाल तर कोर्टाची पायरी चढण्याआधी विचार करा व सौदा पक्का करुन टाका. तुमच्यासाठी अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट ठेवेन मी. कितव्या माळ्यावर हवा ते ठरवण्याची चाॅईस तुमची बघा."
" हरामखोरा, लाज नाही वाटत, सभ्य माणसावर असे घाणेरडे आरोप करताना? धंदा करण्यात पण काही एथिक्स असतात. तू तर कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळले आहेस. पैसा हे सर्वस्व तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी ती काळी आई आहे. माझ्या बापानं विश्वासाने तिला माझ्या ताब्यात दिले आहे. तिचा स्वतःच्या स्वार्थासाठी लिलाव मी अजिबात करणार नाही." साकेत खूप चिडला होता.
" अहो साहेब, जरा शांत व्हा. एवढ्यातच एवढे पॅनिक झालात? अजून तर फक्त पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आलाय. पुढचे बाळंतपण करताना नाकी नऊ येतील. तेव्हा म्हणाल, :शहांचे ऐकले असते तर बरे झाले असते'. अजून दोन दिवस वेळ घ्या. शांतपणे विचार करा. मी वाट पहातो." शहाच्या या बोलण्यावर साकेत म्हणाला,
" काही गरज नाही मुदतीची. मी आत्ताच सांगतोय, दोन दिवसांनंतरही माझे तेच उत्तर असेल."
" ओके. तरीही मी वाट पाहेन. कदाचित मत बदलले तर समोरचा पर्याय उपलब्ध नाही असे समजू नका."
यावर काहीच न बोलता त्याने फोन ठेवला. त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. रश्मीने त्याला प्यायला पाणी दिले.


" बघितलेस? याच्या मागे तो नीच शहा आहे. त्याला वाटत असेल, कोंडीत पकडले की हा आपोआप तयार होईल; पण मी अजिबात तयार नाही या गोष्टीला. मला कितीही लढावे लागले तरी चालेल, पण मी हा सौदा करणार नाही. आईचा कुणी सौदा करतं का?" साकेत पोटतिडकीने बोलत होता. ते ऐकून रश्मी म्हणाली,

" होय. आपण आपली लढाई लढायची. समोर ताकदवान शत्रू आहे म्हणून लढणे सोडायचे नाही. मर्द मराठी मावळ्यांची अवलाद आपली." हे ऐकून साकेतला अधिक हुरुप आला.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.


सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५