Login

कलम तीनशे चोपन्न भाग ८

Use and misuse Of Law

‌कलम तीनशे चोपन्न
भाग ८

©® सौ.हेमा पाटील.

ऑफीसमधून निघाल्यावर साकेत थेट ॲड. विवेकच्या ऑफीसमध्ये पोहोचला. विवेक कामात होता, त्याच्यासमोर एक अशिल बसले होते म्हणून साकेत बाहेर बसला. तो आलेला पाहून विवेकने आपले बोलणे आवरते घेतले आणि साकेतला आत बोलावले.

आत गेल्यावर विवेकने त्याच्यासमोर काही कागद ठेवले आणि डोळ्याने ते पहा म्हणून खुणावले. साकेतने ते कागद हातात घेतले तर त्यावर ठळक अक्षरात First Information Report ( F. I. R . ) असे लिहिलेले होते. खाली एका काॅलममध्ये भारतीय दंड संहिता १८६० अन्वये कलम ३५४ अ , कलम ५०४ , कलम ३२३, कलम ३४ अशी वेगवेगळी कलमे लिहिलेली होती.
ॲड. विवेकने त्याला सांगितले,
" कोर्टाकडून मी ही प्रिंट मागवली आहे. खाली लिहिलेला मजकूर काळजीपूर्वक वाच."
त्याखाली वार सोमवार , चार मार्च २०२४ ही तारीख लिहिलेली होती.
साकेतने वाचायला सुरुवात केली.
" चार मार्च रोजी साकेत वसंत देशमाने यांनी सौ. जानकी मनोहर बाबर यांच्यावर जबरदस्ती केली. त्यांच्या पदराला हात घालत त्यांना जबरदस्तीने मिठीत घेतले व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले." खाली वेळ लिहिली होती संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास... हे वाचून साकेतचे डोके गरगरले. तो चिडला. टेबलवर हाताची मूठ आपटत तो म्हणाला,
" कसे शक्य आहे? ही कोण जानकी बाबर? हे नाव मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकतोय; अन् ही बाई चक्क पदराला हात घातला अशी तक्रार करते? किती निर्लज्ज बाई असेल?"
" पैसा बोलतो साकेत पैसा! पैसा मिळत असेल तर खोटी विनयभंगाची तक्रार नोंदवायला काय जातेय? खराखुरा विनयभंग थोडाच झाला पाहिजे?"
" पैशासाठी स्वतःची अशी अब्रू वेशीवर टांगायला या बाईला काहीच वाटत नाही?"
"अरे, हे तर काहीच नाही. केस जेव्हा स्टॅंड होते तेव्हा न्यायालयात या अशा केसमध्ये या बायकांना वकील जे प्रश्न विचारतात ते यापेक्षा जास्त लज्जा उत्पन्न करणारे असतात. त्यांना याची सवय झालेली असते. त्यांच्यासाठी अब्रू, बेअब्रू पैशांपुढे काहीच नसते."

हे ऐकून साकेत गप्प बसला. त्याला विचारात पडलेला पाहून विवेक म्हणाला,
" आपण ॲड. संदीप कुलकर्णी यांच्याकडे जाऊया. फौजदारीमध्ये ते तज्ञ वकील आहेत. मी तुझ्यासाठी ही केस चालवली असती, पण मला दिवाणी केसेसचा अनुभव आहे. या केसांसाठी आपल्याला फौजदारी मध्ये काम करणारे निष्णात वकील हवेत."

" चालेल. तू म्हणशील तसे. मला यातला काहीच गंध नाही. त्या वकीलांशी कधी बोलायचे?"
" मी फोन करुन त्यांच्याशी बोलतो. त्यांनी बोलावले की मग आपण दोघे जाऊ. ते आधी वकीलपत्र कोर्टात सादर करतील. तुला कोर्टात हजर रहाण्यासंबंधी जेव्हा कोर्ट कडून समन्स येईल तेव्हा तू कळव. मग त्यादिवशी ते कोर्टात हजर रहातील. एक गोष्ट लक्षात ठेव, समन्स आल्यावर तुला कोर्टात हजर रहावे लागेल. जर अगदी ज्येन्युईन कारण असेल तर ते वकीलांमार्फत कोर्टाला कळवावे लागते. जर हजर राहिला नाहीस तर पोलिस तुला अटक करु शकतात."
" नाही, नाही. मी स्वतः हजर राहीन. ते बेड्या घालून पोलीस मला घेऊन चालले आहेत ही कल्पना केली तरी मला भीती वाटतेय. थरथरायला होतेय. टिव्हीवर, सिनेमात मी पाहिले आहे कैद्याला कसे धरुन आणतात ते." साकेत म्हणाला.

" तुला याबाबत काही अनुभव नाही म्हणून... कोर्टाचे प्रत्यक्ष काम आणि सिनेमात दाखवतात ते सीन यात खूपच फरक असतो. आता समजेल तुला."
" खरं तर काही काही अनुभव आयुष्यात कधीच येऊ नयेत. जसे पोलिस स्टेशनमध्ये जाणे, कोर्टाची पायरी चढणे, आजारानिमित्त खूप दिवस दवाखान्यात दाखल होणे."
" तू म्हणतोस ते खरं आहे साकेत! आयुष्यात येणाऱ्या अनुभवांनी आपण समृद्ध होत जातो. समोर येणाऱ्या संकटांना सामोरे जावेच लागते. सोने जसे अग्नीतून अधिक झळाळून उठते, तसे संकटातून तावूनसुलाखून बाहेर पडले की आत्मविश्वास अधिक वाढतो. काळजी करु नकोस. सगळे काही ठीक होईल. ॲड. कुलकर्णी हुशार आहेत. ते तुझी यातून सही सलामत सुटका करतील यात शंकाच नाही."

" त्यांची फी किती असेल अंदाजे?"
" याबद्दल मी काही सांगू शकत नाही. आम्ही एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालत नाही. ते आमच्या एथिक्सच्या विरोधात आहे. त्यांनी भेटायला बोलावल्यावर दहा हजार रुपये सोबत घेऊन ये. फी चा ॲडव्हान्स द्यावा लागेल. कुलकर्णी साहेब पैसे ओढण्याच्या वृत्तीचे नाहीत. जे नितीनियमाने वागणारे काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतके वकील आहेत त्यात कुलकर्णी वकील सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे खूप पैसे जातील अशी काळजी अजिबात करु नकोस. हा माझा शब्द आहे." विवेक म्हणाला.
" ठीक आहे. तू त्या कुलकर्णी वकीलांशी बोलून घे व मला कळव. मी जातो आता."
" काळजी करु नकोस. तुला जमीन विकायची नाही ना? नको विकूस. कुलकर्णी वकील त्या बिल्डरची बघ कशी जिरवतात ते!"

साकेत तिथून बाहेर पडला खरा, पण त्याचे डोके चक्रावले होते. आपण काहीच न करता हे काय लचांड आपल्या मागे लागले असे त्याला वाटले. तो खूप मानसिक तणावाखाली होता. समोर दिसणाऱ्या बारकडे त्याची पावले आपसूकच वळली. तिथे बसल्यावर त्याने ऑर्डर दिली. सोबत खारे शेंगदाणे मागवले. पहिला पेग संपल्यावर त्याने दुसरा मागवला. चार शेंगदाणे तोंडात टाकले. हातात दुसरे शेंगदाणे घेतले आणि तो त्या शेंगदाण्यांकडे पाहू लागला. आपल्या शेतात गेल्या वर्षी सहा पोती भुईमुगाच्या शेंगा पिकल्या होत्या. गेल्या वर्षी दिवाळीला आपले घरच्या शेंगांचे तेल घाण्यातून गाळून आणले होते. घरच्या शेंगदाण्याची चव वेगळीच लागते असे त्याच्या मनात आले.

बाबांनी लहानपणापासून जमीन म्हणजे काळी आई आहे हे मनावर बिंबवले होते. त्यामुळे बाबांच्या मृत्यूनंतरही त्याने शेतीकडे लक्ष देणे सोडले नव्हते. त्याची खूप धावपळ व्हायची, पण तो दर पंधरा दिवसांनी शेताकडे चक्कर मारायचा. त्याच्या शेजारपाजारच्या शेतकऱ्यांनी गुंठावारी आपल्या जमिनी विकायला काढल्या होत्या. त्यालाही बऱ्याच जणांनी तसा सल्ला दिला होता, पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले होते. 'त्या जमिनीमुळे आज आपल्यावर ही वेळ आली आहे. जाऊदे ती जमीन, देऊन टाकू त्या शहाला,' असा विचार त्याच्या मनात आला आणि त्या दोन पेग पोटात गेलेल्या अवस्थेतही त्याला चटका बसल्यासारखे आपल्या बाबांचे शब्द आठवले.
" काळ्या आईचा कधी लिलाव करु नकोस. जमीन कसणे तुला जमले नाही तर बाॅण्ड करुन खंडाने एखाद्या चांगल्या माणसाला कसण्यासाठी दे. जमीन विकण्याचा विचार कधी करु नकोस."
क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.
काय करेल साकेत? दारुच्या नशेत डोक्यात आलेला विचार प्रत्यक्षात आणेल? की वडिलांनी सांगितले होते त्याप्रमाणे वागेल? पाहूया पुढील भागात...
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५


0

🎭 Series Post

View all