Login

कलम तीनशे चोपन्न भाग १०

Use and misuse of Law
कलम तीनशे चोपन्न
भाग १०
©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले,रश्मीने आपण शहाविरुद्ध लढायचे असा निर्धार केला आणि साकेतला दोघांनी मिळून लढा द्यायचा असे सांगून धीर दिला. आता पुढे...

दोघांनीही आपापली कामे आवरली. साकेतने विवेकला फोन करून आम्ही दोघे संध्याकाळी भेटायला येणार आहोत असे सांगितले. यावर विवेकने संध्याकाळी घरीच या व जेवायलाच या असे सांगितले. नको असे साकेत म्हणाला पण विवेकने ऐकले नाही. त्यामुळे साकेतचा नाईलाज झाला. त्याने रश्मीला याबाबत कल्पना दिली. सकाळी रश्मीशी बोलणे झाले त्यामुळे त्याला जरा हलके हलके वाटत होते.
त्याने कामावर लक्ष केंद्रित केले. दुपारी दोनच्या सुमारास त्याला शहाचा फोन आला. नंबर त्याने सेव्ह केला होता; त्यामुळे नाव पडले. नाव वाचून काॅल रिसिव्ह करु नये असे त्याला वाटले; पण रश्मीचे बोलणे त्याला आठवले. त्यामुळे त्याने फोन घेतला. समोरुन शहा बोलत होता.
" काय मग साकेत राव? काय ठरवले? कधी येताय पैसे न्यायला? पैशांची बॅग तयार आहे." यावर साकेत म्हणाला,
" कसले पैसे? तुम्ही आमच्या कंपनीच्या सेवाभावी ट्रस्टला मदत देताय का? वा वा! छान आहे. कधी येऊ पैसे घ्यायला?"
" माय फूट! तुमच्या सेवाभावी संस्थेला मी का पैसे देऊ? मी तुमच्याबद्दल बोलतोय. तुमच्या जमिनीचे पैसे घ्यायला कधी येताय?"
" मी कधी तुम्हाला सांगितले की पैसे न्यायला येतो म्हणून?" साकेतने गुगली टाकली.
" काल रात्री किती पेग घेतले? वकील साहेबांच्या ऑफीसमधून किती अस्वस्थ होऊन बाहेर पडला होता! म्हणून विचारले. कशाला एवढा डोक्याला ताप करुन घेता? तुम्ही पांढरपेशी माणसं! हे असले कोर्ककचेरीचे हेलपाटे घालणे तुम्हाला जमणार नाही. त्यापेक्षा आपला जमिनीचा मोबदला घ्या आणि गप्प बसा. बघा, नाही तर उद्या तेलही गेले, तूपही गेले, हाती धोपाटणे आले अशी अवस्था व्हायची. जमीनही हातून जायची, अन् इज्जतीचा फालुदा होईल तो वेगळाच! यासाठी सांगतोय साहेब, ऐका माझे. आलेले पैसे गुंतवा म्युच्युअल फंडात. करोडपती व्हाल चार वर्षांत. ती जमीन इतके उत्पन्न देणार आहे का?"

"आपल्या मौल्यवान सल्ल्यासाठी आभारी आहे; पण कसे आहे ना, काय निर्णय घ्यायचा यावर मी ठाम आहे. मला ती जमीन कुठल्याही परिस्थितीत विकायची नाही." साकेत म्हणाला.
ते ऐकून शहाचा रागाचा पारा चढला. तो रागाने म्हणाला,
" याचे परिणाम भोगावे लागतील."
" ठीक आहे. भोगतो." असे साकेत म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला.

त्यानंतर तो विषय डोक्यातून बाजूला सारुन तो आपल्या कामात गुंतला. संध्याकाळी तो घरी गेला तेव्हा रश्मीने आवरायला घेतले होते.छोटुला घेऊन ते विवेकच्या घरी गेले. विवेकच्या मुलीशी छोटुची गट्टी जमली. दोघेजण खेळत होते, म्हणून साकेत, रश्मी व विवेक त्याच्या घरातील ऑफीसमध्ये गेले. घरी रात्री काम करण्यासाठी, तसेच केसचा अभ्यास करण्यासाठी घरात एका कोपऱ्यात छोटेसे ऑफीस बनवले होते. कधी अर्जंट क्लायंट मिटिंग घ्यावी लागली तर क्लायंट या ऑफीसमध्ये येतात.

रश्मीने आपले एकेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. विवेक उत्तरे देत होता.
विनयभंगाच्या तक्रारीबाबत रश्मी बारकाईने चौकशी करत होती. त्यावेळी तिच्या मनात एक प्रश्न आला, तो तिने बोलून दाखवला.
" या सगळ्या प्रकरणात पोलीस शहाला सामील असतील का? पैसे चारुन त्याने अशी खोटी केस केली असेल का?"
यावर विवेक म्हणाला,
" हो. तसेही होऊ शकते. ते काही नवीन नाही; पण शहाने त्या बाईचे प्यादे इथे उभे केले आहे. वरवर पाहता साकेतने त्या बाईचा विनयभंग केला आहे अशी केस आहे. या केसमध्ये साकेतला गुंतवून त्याच्यावर दडपण आणायचे आणि त्याला जमीन विकायला भाग पाडायचे हा या मागचा खरा डाव आहे. यासाठी त्याने साकेत वर बारीक लक्ष ठेवले होते. तो कधी गावी गेला होता याची माहिती त्याला होती. अंदाजपंचे तारीख दिली असती तर साकेतचे कंपनीतील थंब पंचिंग पुरेसे झाले असते. त्यावरुन साकेत त्यादिवशी कंपनीतच होता हे सिद्ध झाले असते. यासाठी त्याने साकेतवर पाळत ठेवून तो गावी नेमका कोणत्या दिवशी गेला होता ते पाहून त्या तारखेची विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यादिवशी आपण गावी गेलो नव्हतो असे साकेत म्हणूच शकत नाही हे त्याला माहीत होते. केस खोटी असली तरी प्रथमदर्शनी व परिस्थितीजन्य पुरावा पाहिला जातो. त्यात महिलांवर अत्याचार होतो म्हणून पुराव्याकडे फारसे लक्ष न देता महिलांची तक्रार नोंदवून घ्यायची असा कायदा केलेला आहे. याची शहानिशा कोर्टात होते. खोटी नोकेस असेल तर कोर्टात ते शाबित होते व आरोपीची निर्दोष सुटका होते.
खूपदा गुन्हा केलेले आरोपीही सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटतात. त्यामुळे काळजी करु नका वहिनी. साकेतवर काही बालंट येऊ देणार नाही मी." विवेक म्हणाला. रश्मी विवेकाचे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होती. ते ऐकत असताना तिच्या मनात एक प्रश्न आला. ती तो प्रश्न विवेकला विचारणार होती, तेवढ्यात विनिता जेवायला चला म्हणून बोलवायला आली. त्यामुळे रश्मीने तो प्रश्न विवेकला विचारला नाही. हसतखेळत त्यांचे जेवण झाले. आतमध्ये विनिताचे
स्वयंपाकघर आवरणे चालू होते म्हणून रश्मी तिथेच बसली होती. दरम्यान दोघींमध्ये कौटुंबिक गप्पा सुरू होत्या; पण मनात आलेला प्रश्न रश्मीला विवेकला विचारायचा होता म्हणून तिची चुळबुळ सुरू होती. मुले झोपाळ्यावर बसून मजेत झोका घेत होती. त्या झोक्यागणिक रश्मीचे हृदय धडधडत होते. पुढे काय होईल हा प्रश्न डोक्यात थैमान घालत होता.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
कुठला प्रश्न रश्मीला पडला होता? त्यावर काय उत्तर दिले विवेकने? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५