Login

कलम तीनशे चोपन्न भाग १३

Use and misuse of Law

कलम तीनशे चोपन्न
भाग १३

©® सौ.हेमा पाटील.


मागील भागात आपण पाहिले, रश्मी तिची मैत्रीण वृषालीशी बोलते, आणि एस.पी. ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते. आता तिथून पुढे...

रश्मीची पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची ही पहिलीच वेळ होती. तिच्या मनात धाकधूक होती; परंतु आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यासाठी धाडस केलेच पाहिजे असा विचार करून तिने पुढे पाऊल टाकले. याबाबत तिने साकेतला काहीच कल्पना दिली नव्हती. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असा विचार तिने केला होता.
आत गेल्यावर गेटजवळ तिची माहिती विचारण्यात आली. काय काम आहे या संदर्भी नोंदवहीत नोंद करण्यात आली. त्यावर तिची सही घेण्यात आली. त्यानंतर ती आत जाऊन जिल्हाप्रमुखांच्या ऑफिस समोर बसलेल्या इतर लोकांच्या समवेत खुर्चीवर आपला नंबर येण्याची वाट पाहत बसली. तिथे आपल्यासारखे सर्वसामान्य पुरुष स्त्रिया पाहून तिला जरा धीर आला. तिच्या मनावरील दडपण कमी झाले. तिचा नंबर आला आणि ती आत गेली.

आत गेल्यावर जिल्हाप्रमुखांसमोर उभी राहून तिने नमस्कार केला, आणि आपले निवेदन त्यांच्या समोर ठेवले. त्यांनी त्याकडे एक नजर टाकली आणि विचारले,
" काय काम आहे?" इन्स्पेक्टर महेश यांनी तिला कल्पना दिली होती की, आपले निवेदन समोर ठेवल्यावर आपले काय काम आहे ते थोडक्यात सांगायचे. यावर रश्मीने सांगितले,
"नमस्कार साहेब, माझे पती साकेत देशमाने यांच्यावर विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात मी आपणास निवेदन देण्यासाठी आले आहे." यावर जिल्हाप्रमुख म्हणाले,
" तक्रार जर खोटी असेल तर कोर्टात सिद्ध होईल, आणि तुमच्या यजमानांची निर्दोष मुक्तता होईल. मग कशासाठी काळजी करता?" यावर रश्मी म्हणाली ,
"साहेब दोन मिनिटे माझे ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे; पण यात बराच कालावधी जाईल. माझ्या यजमानांवर आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यांच्या प्रतिष्ठेत बाधा येईल. जर गुन्हा केलेलाच नाही आणि तसा पुरावा आहे तर प्रयत्न करायला काय हरकत आहे? यासाठी मी आपल्या समोर आले आहे आहे. कृपया आपण याचा गांभीर्याने विचार करावा. माझे मिस्टर एका प्रतिथयश कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांना पुढच्या महिन्यात कंपनीच्या कामासाठी जर्मनीला जायचे आहे. जर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर त्यांचा पासपोर्ट जप्त केला जाईल किंवा त्यांना परदेशी जाण्यास अटकाव घातला जाईल. याचे कारण कंपनीला कळवावे लागेल. त्यांची कामाच्या ठिकाणी बदनामी होईल. ते टाळण्यासाठी मी आपल्या समोर हा अर्ज घेऊन आले आहे. तसेच त्यांना परदेशात जाण्याची जी संधी मिळाली आहे ती हातची जाईल. याचा त्यांच्या करिअरवर वाईट परिणाम होईल. यासाठी या तक्रारीची योग्य पद्धतीने शहानिशा करण्यात यावी. जर मी निवेदन दिले आहे त्याप्रमाणे खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे असा पुरावा समोर आला तर माझ्या मिस्टरांवर तक्रार दाखल करण्यात येऊ नये. त्यांच्या विरूद्ध ज्यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यांच्यावर खोटी तक्रार दाखल केली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मी विनंती करत आहे. मी एक सर्व सामान्य महिला आहे. आपण कायद्याचे पाठीराखे आहात. आपण यात लक्ष घालावे अशी मी आपणास कळकळीची विनंती करत आहे. माझी अडचण कृपया लक्षात घ्यावी. कोर्टामध्ये जर आरोपी म्हणून माझ्या यजमानांना उभे करण्यात आले तर त्यांच्या करियरवर परिणाम होईल तो टाळण्यासाठी मी इथवर मोठ्या आशेने आले आहे. त्यांचे मनोधैर्य ही ढासळले आहे. आपण काहीच न करता हे बालंट आपल्यावर आले आहे यामुळे ते सैरभैर झाले आहेत. यासाठी मी आपल्यासमोर हा अर्ज घेऊन आले आहे . यात लक्ष घालून आपण याचा साकल्याने विचार करावा अशी विनंती मी करत आहे. या सर्व सामान्य बहिणीच्या पाठीशी आपण उभे राहावे अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. ज्यांनी हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर पोलीस खात्यातर्फे गुन्हा दाखल करण्यात यावा; जेणेकरून परत अशा खोट्या तक्रारी कुणावर करण्याचे धाडस ती महिला करणार नाही."
एवढे बोलून रश्मी समोरून काय उत्तर येते त्याची वाट पाहू लागली.


तिचे बोलणे जिल्हाप्रमुखांनी शांतपणे ऐकून घेतले. त्यावर एक मिनिटभर विचार करून त्यांनी तिच्या तक्रार अर्जासोबत जोडलेल्या एफ. आय. आर. वर कुठल्या पोलीसस्टेशनची नोंद आहे हे पाहिले. त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला त्यांनी त्या पोलिस स्टेशनमध्ये फोन लावून तेथील इन्स्पेक्टर साहेबांना काॅलवर घेण्यास सांगितले. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन मध्ये फोन लावला. समोरून इन्स्पेक्टर दळवी बोलत होते. फोन स्पीकरवर होता. एस. पी. साहेबांनी त्यांना सांगितले,
" माझ्या समोर रश्मी साकेत देशमाने या बसलेल्या आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की; त्यांचे मिस्टर साकेत देशमाने यांच्यावर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे." यावर दळवी साहेब म्हणाले,
" हो खरं आहे. चार दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे."
हे ऐकल्यावर जिल्हाप्रमुख म्हणाले,
" त्यांचे असे म्हणणे आहे की, हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे." यावर इफेक्टर दळवी म्हणाले,
" गुन्हा खरा आहे की खोटा आहे ते कोर्टात सिद्ध होईल. त्यासाठी त्या मॅडम तुमच्याकडे कशाला आलेत?"
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होईल पुढे? रश्मीच्या अर्जाचा आणि तिच्या धडपडीचा काही उपयोग होईल? जिल्हा पोलिस प्रमुख यात लक्ष घालतील? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५