Login

कलम तीनशे चोपन्न भाग १४

Use and misuse of Law

कलम तीनशे चोपन्न
भाग १४
©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, इन्स्पेक्टर दळवी जिल्हा पोलिस प्रमुखांना म्हणाले,
" कोर्टात सिद्ध होईलच, मग त्या मॅडम तुमच्याकडे कशाला आलेत?"
आता पुढे...


या इन्स्पेक्टर दळवी यांच्या म्हणण्यावर जिल्हाप्रमुख म्हणाले,
" ते तुम्ही मला शिकवू नका. मी या पदावर माशा मारायला बसलो नाही. एक काम करा. या केसचा तपास करताना सावर्डे गावातील गुन्हा घडला आहे असे दाखल केलेल्या तारखेचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बॅकअप चेक करा. तसेच त्या संपूर्ण दिवसाचे साकेत देशमाने यांचे मोबाईल लोकेशन चेक करा. त्या वेळेत ते त्या ठिकाणी खरोखरच होते का? याची खात्री करून घ्या. जर ते त्या वेळी तेथे नाहीत अशी तुमची खात्री झाली तर मात्र साकेत देशमाने यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कोर्टासमोर हजर करू नका. त्याऐवजी हा पुरावा कोर्टासमोर दाखल करून संबंधित व्यक्तीने खोटी केस दाखल केली आहे असे कोर्टासमोर सांगा. संबंधित फिर्यादी पार्टीवर खोटी केस केल्याबद्दल पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करा. यासंदर्भात लवकर तपास करा."
यावर इन्स्पेक्टर दळवी म्हणाले,
" पण साहेब एवढे सगळे करेपर्यंत जर ते निर्दोष असतील तर कोर्टात ते शाबित होईलच ना?"
यावर जिल्हाप्रमुख म्हणाले,
" मी सांगतोय ते काम करा. तुम्ही खूप आळशी झाला आहात. तुमची विदर्भात बदली करण्याची वेळ आली आहे याची मला खात्री पटली आहे.
म्हणजे तुमचे असे म्हणणे आहे की; त्यांनी कोर्टाचे हेलपाटे घालावेत. त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करून घेण्यासाठी वकिलाकडे जावे, आणि त्रास सहन करून स्वतःला निर्दोष सिद्ध करून घ्यावे. परंतु थोडा त्रास घेऊन तुम्ही मात्र तसा तपास करणार नाही." हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर दळवी गडबडले.
" नाही नाही साहेब, मला तसे म्हणायचे नव्हते."
" मग कसे म्हणायचे होते?" असे जिल्हाप्रमुख म्हणाले.
" मी आजच्या आज तपासाला सुरुवात करतो साहेब." असे इन्स्पेक्टर दळवी म्हणाले.
" काय तपास केला आहे त्याची एक प्रत आमच्या कार्यालयात पाठवून द्या." असे जिल्हाप्रमुखांनी सांगितले.
" हो साहेब, पाठवतो." असे दळवी म्हणाले तेव्हा जिल्हाप्रमुखांनी फोन ठेवला. फोन स्पीकरवर ठेवलेला असल्यामुळे जे काही बोलणे झाले ते सगळे रश्मीने ऐकले. त्यामुळे तिला धीर आला. मनाला विश्वास वाटला की, आपण येथे आल्यामुळे काहीतरी होऊ शकते. जिल्हाप्रमुखांचे तिने आभार मानले.
"आपल्यासारखे अधिकारी असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींना घाबरण्याची काही गरज नाही. आपले खूप खूप धन्यवाद!" यावर जिल्हाप्रमुख म्हणाले,
" जनतेची सेवा करणे हेच आमचे काम आहे. मी वेगळे काही करत नाही. आमच्या खात्याची इमेज बिघडली आहे. याला अनेक अधिकारी कारणीभूत आहेत. खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराने पोलीस खाते पोखरलेले आहे. आम्हाला जेवढे करता येते तेवढे आम्ही करत असतो." हे ऐकून रश्मी पुढे काही बोलली नाही. त्यांचे पुनश्च एकदा
आभार मानले व ती बाहेर पडली.

‌बाहेर पडल्यावर रश्मीने वृषालीला फोन केला व जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात जे काही घडले ते सांगितले. ते सगळे तिने इन्स्पेक्टर महेश यांना सांगावे अशी तिने विनंती केली. वृषालीने तिला धीर दिला.
" सगळे काही ठीक होईल. तिथे बसणारे अधिकारी ही पण आपल्यासारखी माणसेच आहेत. त्यांनाही मन आहे, भावना आहेत. दुसऱ्याच्या भावना त्यांनाही जाणता येतात. त्यामुळे काळजी करू नको. सर्व काही ठीक होईल." हे ऐकून रश्मीला हायसे वाटले.

ती घरी आली, जेवण करून तिने सरळ झोपून घेतले. रात्री तिची झोप झालीच नव्हती. संध्याकाळी तिने गरमागरम बटाटेवडे करण्याचा बेत आखला. तिने बटाटे शिजवून घेतले. भाजी तयार करून घेतली. छोटू शाळेतून आला, त्याच्या पाठोपाठ साकेत घरी आला. तेव्हा ती किचनमध्ये बटाटेवडे तळत होती. त्याचा घमघमाट सगळीकडे सुटला होता.
साकेत आल्यावर फ्रेश झाला आणि किचनमध्ये डोकावला. आत गेल्यावर तो रश्मीला म्हणाला,
" आज काय विशेष ? एकदम बटाटेवडे वगैरे?" हे ऐकल्यावर रश्मी म्हणाली,
" हो. विशेषच आहे . चल फ्रेश होऊन आला आहेस ना? तुला वाढून देते. खाऊन घे गरम गरम. छोटू, तूही ये."
तिने तीन डिश मध्ये वडे भरुन डायनिंग टेबलवर ठेवल्या. सोबत तळलेल्या मिरच्या आणि पावांची डिश ठेवली. शेंगदाण्याची चटणी एका छोट्या प्लेटमध्ये घेतली. पाण्याचा तांब्या भरून घेतला आणि तीही त्यांना जॉईन झाली. गरमागरम वडापाववर ताव मारत असताना सकाळचा सगळा घडलेला प्रसंग तिने साकेतला सांगितला.

आधी तर साकेतचा विश्वासच बसला नाही; परंतु तिने इन्स्पेक्टर महेशच्या सांगण्यानुसार त्या कार्यालयात जमा केलेल्या कागदपत्रांची पोहोच घेतली होती. त्यावर कार्यालयाचा सही शिक्का होता. ते पाहून साकेत म्हणाला,
" तू तर कमालच केलीस यार! तू डायरेक्ट जिल्हा पोलीस प्रमुखांपर्यंत जाऊन पोहोचलीस. कमालच आहे. आता मला काही काळजी करण्याचे कारण नाही; कारण माझ्यापेक्षा तूच या प्रकरणात जास्त लक्ष घातले आहेस." यावर रश्मी म्हणाली ,
" होय, बरोबर आहे. आपल्या घराची शांती या प्रकरणामुळे डळमळीत झाली आहे. त्यामुळे मी यात लक्ष घातले आहे आणि शेवटपर्यंत घालणार आहे. बारीक सारीक गोष्टींचा विचार करून पुढे काय केले पाहिजे याचा विचार मी करणार आहे. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. निर्धास्त रहा. जिल्हाप्रमुखांनी इन्स्पेक्टर दळवी यांना आदेश दिला आहे. तो काय येतोय याची मी पाच-सहा दिवसांनी पुन्हा एकदा जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात जाऊन चौकशी करून येईन. त्यानंतर पुढे काय होईल ते पाहू." हे सगळे ऐकून साकेतला हायसे वाटले.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

आता कथा अगदी वेगळ्या वळणावर आली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता अधिक न ताणता सदर कथेचे भाग सलगपणे प्रसारित करत आहे.


सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५