Login

कलम तीनशे चोपन्न भाग १८

Use and misuse of Law

कलम तीनशे चोपन्न
भाग १८

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, एक माणूस साकेतच्या घराभोवती वावरत होता. तो माणूस कोण आहे? याची शंका रश्मीला आली होती. आता पुढे ....

बहुतेक शहाने तो माणूस पाठवला असावा असं तिने कयास बांधला होता. ती ऑफिसला गेली तेव्हा तो तिथेच उभा होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती त्याच्यासमोरुन पुढे निघून गेली. संध्याकाळी जेव्हा ती परत आली तेव्हाही तो माणूस तिथेच उभा होता. ती सरळ जाऊन त्याच्यासमोर उभे राहिली आणि म्हणाली,
" काय हवे आहे? कशासाठी आमच्यावर पाळत ठेवली आहेस?"
यावर तो माणूस म्हणाला,
" माझे काम मी करतोय. मला जे सांगितले आहे तेवढे काम मी करतोय." यावर रश्मी म्हणाली,
" जरा थांब " तिने आपल्या पर्स मधील मोबाईल काढला, आणि त्या माणसाचा फोटो काढला. त्यावर तो माणूस गडबडला. तो म्हणाला,
" माझा फोटो का काढताय?" रेश्मा म्हणाली,
" आता मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार आहे. हा माणूस माझा पाठलाग करत आहे म्हणून." यावर तो म्हणाला,
" ओ मॅडम, माझे काम एवढेच आहे की, तुम्ही घराबाहेर पडलात की तुम्हाला मी इथे उभा आहे किंवा तुमच्या अवतीभोवती आहे हे लक्षात आणून देणे. तुमच्या अंगाला मी बोट तरी लावले आहे का? मग माझी तक्रार कशासाठी करता?" यावर रश्मी म्हणाली,
"काहीही संबंध नसताना दुसऱ्या माणसावर पाळत का ठेवता? तुम्ही मला ओळखता का? तुमचा माझा काही संबंध आहे का? नाही ना? त्या शहानेच तुम्हाला इथे पाठवले आहे याची मला खात्री आहे. जा तुमच्या त्या शहाला जाऊन सांगा, आम्ही घाबरत नाही. समोर येऊन वार कर. माघारी नको. आम्ही मराठ्याची अवलाद आहोत."

तेवढ्यात तेथे दुसरा एक माणूस येऊन उभा राहिला. त्याने त्या माणसाचा हात धरून मागच्या बाजूला पिरगाळला आणि तो म्हणाला, " कोणी पाठवले आहे तुला इथे? कालपासून मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. तू काही अपाय करण्याचा जर प्रयत्न केला असतास तर बाराच्या भावात गेला असतास. आता माझ्यासोबत पोलीस स्टेशन कडे चलायचे. तिथे साहेबांच्या समोर खरे काय आहे ते सांगायचे; नाहीतर थर्ड डिग्री लागणार हे नक्की!" हे ऐकून तो गडबडला.
" नको नको. पोलीस स्टेशनला मला नेऊ नका. मी काही केले नाही.
मी फक्त इथे उभा राहिलो होतो."
" आत्तापर्यंत उभा राहिला होतास, पण उद्या काही केले असतेस तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे मुकाट्याने पोलीस स्टेशनकडे चलायचे." रश्मीकडे वळून तो म्हणाला,
" ताई, मी साध्या कपड्यांत दिसत असलो तरी मी पोलीस आहे. माझी ड्युटी तुमच्या घराजवळ लावलेली आहे. या माणसाला मी कालपासून इथे वावरताना पाहिले. तसेच काल तुमच्या मुलाला जो माणूस दम देत होता त्यालाही आम्ही ताब्यात घेतलेले आहे. त्यामुळे काळजी करू नका. याला आता सरळ पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवतो."
रश्मीच्या चेहऱ्यावरचे हास्य लोप पावले होते ते परतले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे हे तिच्या लक्षात आले.

ती घराकडे परतली. थोड्याच वेळात छोटू आला. त्याच्या पाठोपाठ साकेत आल्यावर तिने जे काही घडले ते त्याच्या कानावर घातले. ते ऐकल्यावर साकेत म्हणाला,
" आपल्याला भीती वाटावी , दडपण यावे यासाठी शहाने त्या माणसाला आपल्या घरावर पाळत ठेवायला सांगितले असावे. तो माणूस आपल्यावर पाळत ठेवतो हे आपल्या लक्षात यावे अशा पद्धतीने त्याला वावरायला सांगितले असावे." यावर रश्मी म्हणाली,
" तसेही असेल, पण आता पोलिसांनी त्या माणसाला पकडून नेले आहे. त्याला बोलते करणार असे तो पोलीस म्हणत होता. तसेच छोटूला जो माणूस तुझा उजवा पाय तोडू का डावा पाय ? असे विचारत होता, त्या माणसालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.

हे ऐकल्यावर साकेतला बरे वाटले. त्यानंतरचे दोन दिवस काहीच घडले नाही. रश्मी ऑफिस वरून येताना जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात गेली. तिथे तिने साहेबांना विचारले,
" साहेब, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरा यांची तपासणी झाली आहे का? तुमच्याकडे अहवाल आला आहे का?" यावर साहेबांनी शेजारी उभे असलेल्या अधिकाऱ्याला फोन करायला लावला आणि माहिती विचारली. मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरा यांची तपासणी झालेला अहवाल इन्स्पेक्टर दळवी यांनी जमा केलेला होता. तो अधिकाऱ्यांनी वर ऑफीसमध्ये मागवला. रश्मीला बाहेर बसायला सांगितले .

अहवाल आल्यानंतर साहेबांनी तो नजरेखालून घातला, आणि रश्मीला आत बोलावले. रश्मी आत आल्यावर त्यांनी सांगितले,
" एफ. आय. आर. मध्ये साडेचार वाजताची वेळ दिलेली होती. त्या वेळेत तुमचे यजमान सावर्डे गावात हजर नव्हते. त्यावेळचे त्यांचे मोबाईल लोकेशन मंगल हॉल येथील दाखवत आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता ते सकाळी साडेनऊ वाजता गावात आले होते. साडेअकरा वाजता गावातून परत गेले होते असे दिसून येते. त्यामुळे जेव्हा विनयभंग झाला ती संध्याकाळी साडेचारची वेळ दिलेली आहे त्यावेळी साकेत देशमाने तेथे हजर नव्हते. म्हणजे विनयभंगाची तक्रार खोटी आहे हे सिद्ध झाले आहे. आता मी आदेश दिला आहे की; सदर विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यामुळे तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या यजमानांवर गुन्हा दाखल होणार नाही."

हे ऐकल्यावर रश्मीला आनंद झाला. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने हात जोडून साहेबांना नमस्कार केला आणि त्यांचे आभार मानले. ती ऑफिसच्या बाहेर आली आणि पहिल्यांदा तिने साकेतला फोन केला. तिने घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला. तो ऐकल्यावर साकेतलाही खूप आनंद झाला.

‌‌ रश्मी घराकडे निघाली. छोटू येऊन शेजारी रमाकाकूकडे बसला होता. रश्मी रमाला कल्पना देऊन दिली होती की; "आज मला यायला थोडा उशीर होईल. त्यामुळे छोटू आला की त्याला बसवून घे."
रश्मीच्या पाठोपाठ साकेत आला. त्याने आनंदाने रश्मीला मिठी मारली. " तुझ्या प्रयत्नांना यश आले. तुझ्यामुळे आज माझ्यावर आलेले बालंट दूर झाले. नाही तर मला पोलिसांनी कोर्टात आरोपी म्हणून उभे केले असते. तशी सगळी तयारी त्यांनी केलेली होती." यावर रश्मी म्हणाली, " सत्य कधीच लपत नाही. ते कधीतरी बाहेर येतेच. आपण प्रयत्न करण्याची गरज असते. ते आपण केले. आपण हातपाय गाळून बसलो नाही त्याचा हा परिणाम आहे."

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

साकेत विनयभंगाच्या गुन्ह्यात गुंतलेला नाही याची जिल्हा पोलिस प्रमुखांनी खात्री करून घेतली. मोठे बालंट तर टळले.
पण कोण होता तो माणूस? शहाने यांच्या पाळतीवर माणूस ठेवला होता का? काय होईल पुढे? शहा त्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५