Login

कलम तीनशे चोपन्न भाग १९

Use and misuse of Law

कलम तीनशे चोपन्न
भाग १९

©® सौ.हेमा पाटील.

जिल्हा पोलिस प्रमुखांनी अहवाल वाचून खात्री करून घेतली की खरोखर साकेत निर्दोष आहे. तसे त्यांनी रश्मीला सांगितले. आता तिथून पुढे...

साकेतच्या मनावरील फार मोठे दडपण दूर झाले होते. आपण आणि विनयभंगाची तक्रार या गोष्टीचा त्याला जबरदस्त धक्का बसला होता. बालपणापासून तो जरा भिडस्त स्वभावाचा होता. त्याला शाळेत अगर काॅलेजमध्ये एकही मैत्रीण नव्हती.मुलींशी बोलताना त्याला अवघडल्यासारखे होई. आजही तो महिलांशी मनमोकळेपणाने बोलू शकत नसे. हा त्याच्या स्वभावातील दोष होता. तरीही रश्मी त्याच्यावर जेव्हा संशय घेत असे तेव्हा त्याला आश्चर्य वाटत असे. आपल्यावर जर कोर्टात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला तर सगळेजण आपल्याकडे कशा नजरेने पहातील याचे त्याला खूप टेन्शन आले होते. रश्मीच्या प्रयत्नांमुळे शहाचा डाव उलटला. त्याला यश मिळाले नाही. त्याला आता खूप राग आला असेल असा विचार साकेतच्या मनात आला आणि त्याचवेळी फोनची रिंग झाली.

साकेतने फोन उचलला. अननोन नंबर होता. शहाचाच असावा असा कयास साकेतने बांधला. तो बरोबरच निघाला कारण काही वेळातच शहाचा रागाने धुमसलेला वरच्या पट्टीतील आवाज ऐकू आला.
" मला काटशह देतो काय रे? तुझ्यापेक्षा पंचवीस पावसाळे जादा पाहीले आहेत मी. काय समजलास?"
यावर साकेत काहीच बोलला नाही. त्याचे शांत रहाणे शहाला खटकले. तो पुढे म्हणाला ,
" एवढ्यावरच ही लढाई संपलेली नाही. बघतो तुला. विनयभंगाच्या तक्रारीमधून सही सलामत बाहेर पडलास, पण माझ्या तावडीतून असा सुटणार नाहीस तू."
हे ऐकून साकेत हसला. तो म्हणाला,
" बरोबर आहे. तुमची आणि आमची कुठून बरोबरी होणार? तुम्ही पोचलेली माणसं. आमच्यासारख्या सामान्य माणसांची तुमच्यासोबत काय ती बरोबरी? आमची पायरी आम्हाला माहीत आहे; पण एक गोष्ट आहे. आमची चुकी नसताना आमच्या वाटेला जर कुणी गेला तर मात्र त्याची खैर नसते. तुझ्या इतके खालच्या पातळीवर जाऊन उतरणे आम्हाला आयुष्यात कधीच जमणार नाही."

"तुझी जागा ताब्यात घेतल्याशिवाय रहाणार नाही मी. हा एक बेत फसला म्हणून काय झाले? माझे प्रयत्न मी सोडणार नाही." या शहाच्या बोलण्यावर साकेत म्हणाला,
" जी गोष्ट आपली नाही तिचा इतका हव्यास धरणे बरे नव्हे." पण हे तत्वज्ञान शहासारख्या माणसाला थोडेच रुचणार? त्याने फोन ठेवला.

त्यापाठोपाठ इन्स्पेक्टर दळवी यांचा फोन आला.
"हॅलो, साकेत देशमाने?"
"बोला."
" तुमच्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा खोटा आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोर्टात हजर राहण्याची गरज नाही." सगळे समजलेले असूनही साकेतने वेडेपणाचा बुरखा पांघरला व विचारले,
" असे कसे काय झाले हो? तुम्ही तर अटक वॉरंटवर माझी सही घेतली होती. बऱ्या बोलाने कोर्टात हजर झालो नाही तर अटक करुन कोर्टात नेणार होतात. मग आता असे काय झाले की मी निर्दोष साबित झालो?"
"अहो, तुमचे मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरा बॅकअप यात तुम्ही त्यावेळी तिथे हजर नव्हता असे सिद्ध झाले. तुम्ही जर त्यावेळी त्याठिकाणी हजर नव्हता तर विनयभंग कसा करणार? त्यामुळे ती तक्रार खोटी आहे हे सिद्ध झाले."
" ते मी अन् ती बाई सोबत असलेले जोडीचे एकत्र असलेले फोटो तुम्ही मला दाखवले होते ते खोटेच होते म्हणायचे. जेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा तुम्ही तपास करताना या पद्धतीने का केला नाही? जेव्हा माझी पत्नी जिल्हा पोलिस प्रमुखांना जाऊन भेटली तेव्हा त्यांनी तुम्हांला आदेश दिले. त्या आदेशानुसार तुम्ही तशा पद्धतीने तपासाची चक्रे फिरवलीत.

माझी पत्नी जर वरिष्ठांना जाऊन भेटली नसती तर मला कोर्टात हजर रहावे लागले असते. मला वकीलांची नेमणूक करावी लागली असती. प्रत्येक तारखेला हजर रहावे लागले असते. वेळ, पैसा, मानसिक स्वास्थ्य याचे नुकसान झाले असते. याशिवाय कपाळावर आरोपीचा शिक्का बसला असता तो वेगळाच! कितीही निष्णात वकील दिला असता, आणि निर्दोष सुटका झाली असती तरीही समाजाने माझ्याकडे दुषित नजरेनेच पाहिले असते. काही न करता मी माणसातून उठलो असतो."
साकेतचे हे बोलणे ऐकून इन्स्पेक्टर दळवी म्हणाले,
" बरोबर आहे तुमचे साहेब, पण यात आमची काय चुकी? महिलांच्या सुरक्षेसाठी असा कायदा तयार करण्यात आलेला आहे. महिलांनी तक्रार नोंदवली की त्यात तथ्य आहे की नाही हे न पहाता संबंधित व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असा आदेश आहे. आमचे काम आम्ही केले. तुम्हांला त्रास झाला यासाठी दिलगीर आहोत."
इन्स्पेक्टर दळवी यांचे हे मानभावीपणे काढलेले उद्गार ऐकून साकेत उसळला. तो म्हणाला,
" स्त्रियांची सुरक्षितता हा मुद्दा अगदीच मान्य आहे; परंतु त्याच्या बुरख्याआड लपून जेव्हा या कायद्याचा दुरुपयोग होतोय हे तुमच्या लक्षात येते त्यावेळी तरी तुम्ही अशा पद्धतीने तपास करायला हवा. तुमच्यासाठी ती एक रोजच्यासारखी केस असते, पण यामुळे एखादी व्यक्ती आयुष्यातून उठते. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, भक्षक असल्यासारखे वागू नका. आज माझ्या पत्नीला कुणीतरी योग्य सल्ला दिला म्हणून ती जिल्हा पोलिस प्रमुखांना जाऊन भेटली व तिने माझी बाजू त्यांच्यासमोर मांडली. त्यांनी आदेश दिले म्हणून तुम्ही तशा पद्धतीने तपास केलात व माझे निर्दोषत्व सिद्ध झाले. असाच तपास तुम्ही जेव्हा खोटी केस आहे हे लक्षात येते तेव्हा केलात तर? पण तुम्ही तसे करत नाही, कारण आधीच तुमचे हात मालामाल झालेले असतात. त्या लाच घेतलेल्या हातांनीच तुम्ही अशी कृत्ये करता."

"साहेब, तुम्ही तुमची पातळी सोडताय. सरळसरळ माझ्यावर लाच घेतल्याचा आरोप करताय." चिडून इन्स्पेक्टर दळवी म्हणाले.
यावर साकेत म्हणाला,
" ते मी सिद्ध करु शकत नाही ना! तरीही मला माहीत आहे तुमचे शहाशी संधान आहे ते. जाऊदे. माझी यातून सुटका झाली. तुम्हांला जे योग्य वाटेल ते तुम्ही करु शकता. माझ्या पत्नीच्या जागृततेमुळे मला कोर्टाची पायरी चढावी लागली नाही. त्याआधीच मी सही सलामत बाहेर पडलो. आता शहाचा पुढचा प्लॅन काय आहे त्याच्याशी दोन हात करायला मी तयार आहे. आता माझ्यावर परत कलम तीनशे चोपन्नचा वापर शहा करु शकणार नाही. तुम्हांला एकच सांगेन, तुमच्या वर्दीचा आदर ठेवा." यावर काही न बोलता पलिकडून फोन कट झाला.

साकेत आणि त्याच्या पत्नीने केलेल्या प्रयत्नांमुळे साकेतवर आलेले बालंट टळले. आता त्या तीनशे चोपन्नच्या केसचे पुढे काय झाले हे आपण पुढील भागात पहाणार आहोत.
क्रमशः सौ. हेमा पाटील.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५