कलंक प्रेमाचा 1

This Story Is Related To Priya.

कलंक प्रेमाचा 1

"धाड sss !! " प्रियाने बेडरूमचा दरवाजा आपटाला.

हातात असणारा धारदार चाकू तिने बाजुला फेकला. शॉकेस मध्ये ठेवलेल्या रोहनच्या फोटोकडे एकटक ती बघु लागली आणि नंतर तोच फोटो हृदयाशी कवटाळत धायमोकलून ती रडू लागली. रोहन आपल्यापासुन दूर निघुन जाईल अशी अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली.


बघायला गेलं तर प्रिया आणि रोहनच्या लग्नाला दोनच महिने झाले होते. शोधूनही सापडणार नाही असा राजा राणीचा संसार नुकताच सूरु होणार होता, कारण प्रिया ने आत्ता कुठे स्वतःचा नवरा म्हणुन रोहनचा स्विकार केला होता. प्रियाला खरं तर हे लग्न करायचंच नव्हतं कारण तिचं ऋषी वर प्रेम होतं पण ऋषीने अर्ध्यावर तिची साथ सोडली आणि सोबतच पहिल्या प्रेमाचा कलंक तो तिच्या माथ्यावर लावुन मोकळा झाला.. तोच कलंक रोहन सोबत लग्न केल्यानंतर तिचा तिनेच पुसून देखील टाकला कारण ऋषी आणि प्रिया समजुतदारीने एकमेकांपासुन लांब झाले होते. प्रिया आपल्यापासून लांब गेल्यावर मात्र ऋषीला तिची आणि तिचं त्याच्यावर असणाऱ्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली आणि तो पुन्हा तिच्या आयुष्यात जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करत होता. जो भूतकाळ मागे टाकून तिने स्वतःच्या नव्या कोऱ्या संसाराचा गाडा रचायला सुरुवात केली होती तोच भूतकाळ तिच्या नव्या संसाराची राख रंगोळी करु पहात होता. ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलेलं तोच आत्ता तिच्या भावनांसोबत खेळत होता.

"प्रेम आणि आकर्षण ह्या दोन्ही गोष्टीतील फरकचं आपल्याला समजला नाही. कसं काय आपण ऋषीच्या प्रेमात पडलो??" असा प्रश्न प्रिया ने स्वतःला केला. भूतकाळ तिच्या नजरेसमोरून तरंगु लागला.

सहा महिन्यांपूर्वी

स्थळ : मायानगरी (मुंबई )

जवळपास तीन वर्ष प्रिया आणि ऋषी एकमेकांसोबत रिलेशनशीप मध्ये होते. ऋषीला भेटुन संपुर्ण जग जिंकल्यासारखं तिला वाटत होतं. एखाद्या सिनेमातीला नटाला मागे टाकेल अश्या रुबाबदार आणि देखण्या ऋषीला पहाताच प्रिया विरघळली. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला दोघांची भेट खरं तर झाली होती पण त्यानंतर देखील दोघांना एकमेकांची सोबत आवडू लागली. ऋषीने प्रेमाची मागणी घालताच प्रिया ने जास्त आढे वेढे न घेता सरळ हो म्हणुन मोकळी झाली इतकी ती ऋषीच्या प्रेमात आंधळी झाली होती. मैत्रिणींसमोर तर ऋषीची स्तुती केल्याशिवाय तिला रहावलंच जायचं नाही.

"कधी तरी आरश्यात स्वतःला एकदा बघ मग तुला स्वतःमध्ये ठासून भरलेल्या सौंदर्याची जाणीव होईल. " प्रियाच्या मैत्रिणी तिला नेहमी म्हणायच्या पण प्रियाने तिची गोष्ट कधी मनावर घेतलीच नाही.

सुखं म्हणजे नक्की काय असतं?? असा प्रश्न जर तिला कोणी केला ना तर, ऋषी मला भेटला म्हणजे सगळं सुखं मला भेटलं असं उत्तर समोरच्याला देऊन ती मोकळी व्हायची इतकी ती ऋषीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. ऋषीला कधी एखादा चांगला जॉब लागतो आणि कधी आपण आपल्या घरी दोघांबद्दल सांगतो असं खरं तर प्रियाला झालं होतं. ऋषीसोबत लग्नाला घेऊन भरपूर सारी स्वप्न तिने रंगवली होती.

प्रियाच्या घरातील वातावरण मात्र थोडं वेगळंच होतं. प्रिया खाजगी क्षेत्रात चांगल्या पदावर नोकरीला लागली आणि त्यात तिने वयाची बावीशी पार केली. मुलगी वयात आली म्हणुन हात पिवळे करून देण्याच्या घाईत तिच्या घरचे होते. प्रियाच नाव वधु-वर सूचक मंडळात घरच्यांनी नोंदवल होतं, तेही तिच्या मना विरोधात. खुपशी मागणी तिला येत होती पण येणाऱ्या प्रत्येक मुलात काही ना काही खोट काढुन ती मोकळी व्हायची.

ऋषीला ह्याबद्दल तिने कल्पना देखील दिली होती पण ऋषी मात्र,

"मी अजून सेटल नाही आणि हा विषय आत्ता नकोच. आपण ह्या विषयी नंतर बोलू. " म्हणत विषय टाळायचा. त्याला समजून घेण्यापलीकडे तिच्याजवळ दुसरा कुठला पर्याय देखील नव्हता.

आणि अश्यातच प्रियाला रोहनचं स्थळ समोरून चालुन आलं आणि इथेच तिच्या नशिबाचं समीकरण बिघडलं कारण रोहनमध्ये प्रिया नाव ठेवू शकेल असं काहीच नव्हतं. त्यात प्रियाच्या आत्याच्या बघण्यातला मुलगा मग तर प्रश्नचं मिटला होता. प्रियाच्या वडिलांचा स्वतःच्या बहिणीवर भरपूर विश्वास. तिच्या शब्दपुढे ते कधीच जात नसत. प्रियाने एखादं दुसरं कारण समोर केलं पण ह्या वेळेला घरच्यांसमोर तिचं काहीच चालले नाही.

"एकदा मुलाला भेटून बघुयात आणि मग बघू पुढे काय होतं ते. " त्यातल्या त्यात तिच्या आईने तिला आश्वासन दिले.

खरं तर तिचं आवसानच गळून पडलं होतं. पुढे नक्कीच काही तरी अघटित घडेल अशी हुरहूर तिच्या मनाला लागली होती.

दोघांची पत्रिका बघायचा कार्यक्रम झाला. पत्रिका जुळली. अगदी 36 पैकी 36 गुण जमले होते. एकुलता एक मुलगा म्हटल्यावर प्रियाच्या घरचे आत्ता मागे हटणाऱ्यातले नव्हते.


दोन्ही परिवाराकडून बैठकीचा कार्यक्रम ठरवण्यात आला. प्रिया कामावर असताना प्रियाच्या आईने तिला ह्याबद्दल कल्पना दिली.

प्रियाला आता फक्त रडू येणं बाकी होतं. तिने लागलीच ऋषीला फोन केला आणि म्हणाली. "हे बघ ऋषी मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचय मला तुझं काहीही एक ऐकायचं नाही. आपल्या ठरलेल्या ठिकाणी तु ये."

एवढं बोलुन तिने फोन करुन टाकला..

ऋषीला भेटुन एकदाचा काय तो मार्ग काढलाच पाहिजे, प्रिया स्वतःशीच पुटपुटली.

आपल्याला बरं नाही असं सांगुन तिने अर्धा दिवसाची सुट्टी घेतली आणि ऑफिस बाहेर पडली.. त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी ती निघाली जिथे ती तिच्या ऋषीला नेहमी भेटायची. ती ठरलेल्या वेळेत आली होती पण ऋषी मात्र नेहमीप्रमाणेच उशिरा आला.

"काय झालं? असं अचानक बोलवून घेतलंस मला.. तुला माहितीय ना कामावर किती कामं आहेत मला ते. " आल्या आल्या ऋषीने प्रश्नांचा भडीमार तिच्यावर सुरु केला.

"मला तुझं काहीही ऐकायचं नाही. मला तुझ्यासोबत लग्न करायचंय. ते ही आत्ताच्या आत्ता. " प्रिया हट्टाने म्हणाली. तिने असं काही म्हणताच ऋषीच्या चेहऱ्याचा रंगच बदलला.

"तू वेडी वैगेरे झालीस का? आणि अचानक पणे अस लग्न होत का कधी?" ऋषीने चिडतच विचारलं..

"दुसरा कोणता पर्याय माझ्या घरातल्यांनी माझ्या समोर ठेवलाच नाही ना. मला आत्तापर्यंत येणाऱ्या प्रत्येक स्थळाला तुझ्यासाठी मी नाकारत आलेय पण आता आलेलं स्थळ घरचे फायनल करतायत. मला तुझ्याशिवाय इतर कोणाशीच लग्न नाही करायचं." असं म्हणत प्रिया रडू लागली पण तिच्या रडण्याने ऋषीला काहीही फरक पडत नव्हता.

"हे बघ तू अशी रडू नकोस. मी अजून सेटल नाही. मी एवढ्यात लग्न नाही करू शकत. माझ्या घरच्यांना समजवायला सुद्धा वेळ लागेल मला." ऋषी प्रियाला समजवतच म्हणाला.

"घरच्यांना समजवायला? ह्यात घरच्यांना काय समजवायचंय? आणि हे तुला पाच वर्षा आधी का नाही सुचलं ? माझ्यासोबत फिरताना तुला घरच्यांना विचारावस नाही वाटलं का?" प्रियाने रागात विचारलं..

"हे बघ प्रिया मला नाही वाटत कि आपलं लग्न होईल म्हणुन. जर तुला एखाद दुसर चांगलं स्थळ आलं असेल तर तू लग्न करून टाक." ऋषी निर्विकारपणे बोलुन मोकळा झाला.

"हे असं बोलणं किती सोप्प आहे रे तुझ्यासाठी.. " डोळ्यांतून पाणी काढतच ती म्हणाली..

"सोप्प बनवुन घेतलंय मी आणि तु सुद्धा घे. ह्या पुढे आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये न रहाणंच आपल्या हिताचं असेल." आपल्याला काही फरकच नाही पडत अश्या अविर्भावात ऋषी म्हणाला..

"ठिक आहे. तुझी अशीच इच्छा असेल मग मीच एक पाऊल मागे येते.. पण एक दिवस असा येईल की तुला माझ्या प्रेमाची किंमत कळेल ऋषी. तू मला तुझ्या आयुश्यात परत ये म्हणुन बोलशील पण वेळ निघून गेली असेल. आज ह्या ठिकाणी मी रडतेय पण उद्या तू इथे असशील." प्रिया येणारा हुंदका आवरतच म्हणाली. ऋषी मिश्कीलपणे हसला आणि तिला एकटीला तिथे सोडून निघूनही गेला..

प्रिया रडतच पाठमोऱ्या दिसणाऱ्या ऋषीच्या आकृतीला स्वतःपासून दूर जाताना बघतच राहिली.

खळखळणाऱ्या समुद्राचा आवाज तिच्या कानी पडला. अथांग असा तो सागर आपल्याला हसतोय असं तिला भासु लागलं. एकटक ती त्या सागरातून उसळणाऱ्या लाटा बघत बसली. ऋषीचे शब्द तिच्या कानभोवती घुमत होते. खोल श्वास घेत तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली आणि थोड्या वेळाने तिची तिच तिथून निघून घरी आली.

खुंटीला स्वतःची हॅन्ड बॅग तिने अडकवली आणि आत फ्रेश व्हायला जाणार तोच तिची आई तिच्या जवळ आली.

"येत्या रविवारी मूलाकडचे तुला बघायला येणार आहेत. तुला उगाच सुट्टी नको घ्यायला म्हणुन आम्ही रविवारच फिक्स करून टाकला.. चालेल ना??" प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवतच तिने विचारलं..

"हम्म्म्म!! " ती फक्त हुंकारली आणि स्वतःच्या खोलीत निघुन आली..

कपाटातून ऋषीने दिलेलं सगळे गिफ्ट काढुन तिने एका पिशवीत भरले. त्याचा नंबर देखील तिने फोन मधुन डिलीट करून टाकला. ऋषीच्या कोणत्याच आठवणींना उजाळा तिला द्यायचा नव्हता.. त्याची कोणतीच आठवण प्रियाला पुन्हा तिच्या आयुश्यात नको होती.

खरं तर तिला प्रश्न पडला होता कि, "हाच तो मुलगा ज्याच्यावर आपण 5 वर्ष अगदी मनापासून प्रेम केलं.??? शीss" तिलाच स्वतःचीच लाज वाटू लागली.

पण आत्ता पश्चातापा व्यतिरिक्त तिच्या हातात काहीच उरलं नव्हत. पण एक प्रश्न मात्र तिच्या मनात घर करून होता आणि तो म्हणजे ज्याच्यासोबत नव्याने आपलं नात जुळणार त्याला आपण ती जागा देऊ शकतो का जी आपण ऋषीला दिली?? ह्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळतच नव्हतं. जो पर्यंत उत्तर मिळत नव्हतं तोपर्यंत ती कूस वारंवार बदलत होती. शेवटी उत्तर काही मिळालं नाही पण दिवसभर झालेल्या तणावामुळे झोप मात्र तिला लागली.

क्रमशः


(काय अवस्था झाली असेल प्रियाची?? कळेल पुढील भागात. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद )


कथा परवानगी शिवाय ऑडिओ करुन युट्युब किंवा इतर कुठे टाकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.. कारण कथा @lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर उपलब्ध आहे. पण तरीही इतर कोणी ऑडिओ करून जर ती युट्युबवर टाकण्याचा प्रयत्न केला तर कारवाई नक्कीच केली जाईल. चॅनल्स उभ करण्यासाठी केलेली मेहनत माती मोल होईल.. पण जर कथा आवडत असल्यास, फॉलो नक्की करा.. जेणेकरून कथेच्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुम्हांला मिळत जाईल. आणि सोबतच तुमच्याकडून छोटीशी कमेंट मिळाली तर खूप छान वाटेल...

🎭 Series Post

View all