कलंक प्रेमाचा 3

Love story


कलंक प्रेमाचा 3


ट्रे मधुन चहाचा कप उचलायला घेतलेला हात त्याचा थरथरू लागला.. त्याने कप तसाच ट्रे मध्ये ठेवत हात खाली घेतला.

त्याचा थरथरणारा हात पाहुन प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याने तिच्याकडे.. दोघांचीही नजरा नजर झाली..

जिला दोन मिनिटां पुर्वी बालकणीत बघितलेलं त्याच प्रियाला समोर बघुन रोहन पुरता घाबरून गेला..


ती मात्र हातातील ट्रे तसाच त्याच्या समोर धरून उभी होती.. रोहन मात्र चहा न घेता तिला बघण्यात पुन्हा एकदा हरवून गेला..


"चहा घेताय ना? " न रहावल्याने तिने विचारलं आणि त्याच्या समोर चहाचा कप धरून उभी राहिली..


तिच्या आवाजाने त्याच्या हृदयाच्या जणु ताराच छेडल्या..


बहिणीने हात कोपर मारलं तसं तो भानावर आला.


"सॉरी..! " असं म्हणत गडबडीतच तिच्या हातुन तो चहा घेणारं पण त्याच्या थरथरत्या हातातून चहाचा कप निसटला..

आणि गरमा गरम चहा त्याच्या कपड्यावर सांडला. पटकन खुर्चीवरचा तो उठुन उभा राहिला..


"प्रिया तुला थोडं तरी कळत का ग? किती तो वेधळे पणा..? " प्रियाचे पप्पा तिला सगळ्यांसमोर ओरडू लागले..


"इट्स ओके..! तिला ओरडायची गरज नाही. माझ्याच हातुन कप निसटला.. " रोहन म्हणाला.


त्याने प्रियाकडे पाहिले. सगळ्यांसमोर वडिल ओरडले म्हणुन तोंड छोटं झालेलं तिचं..


"सॉरी..! " रोहनला ती म्हणाली.


"इट्स ओके.. नो इशु..! " ओठांवर स्मित आणत तो म्हणाला..


"तुम्ही या इथे माझ्या सोबत.. " असं म्हणत प्रियाच्या भावाने रोहनला आत नेलं व फ्रेश व्हायला सांगितलं. रोहन फ्रेश होऊन पुन्हा बहिणीच्या बाजूला येऊन बसला.


"आम्ही नंतर कळवतो तुम्हांला..! " सीमा म्हणाली..

तसं रोहनचे काका काकी आणि भाऊजी घरी जाण्यासाठी उठुन उभे राहिले..


रोहनचा चेहरा हिरमुसला.. खरं तर त्याला प्रियाला अजुन जाणून घ्यायचं होत..


पण सीमाच्या एका डायलॉगने तो सुद्धा उठुन उभा राहिला.. प्रियाच्या परिवाराचा निरोप घेत सगळेच सीमा मागोमाग घरा बाहेर पडले..


"दादू आत्ता अजुन कसलं टेन्शन घेत बसतोस.." रोहनचा पडलेला चेहरा बघुन सीमाने त्याला विचारलं.


"तुला लगेच निघायची काय गरज होती. थोडा वेळ बसलो असतो ना ग तिथे.." रोहन नाराज होतच म्हणाला.


"अस काय करतोस? तुच बोललास ना तुला कोणी तरी दुसरी आवडते.. आत्ता फुकटचे पोहे खाऊन रात्रीच्या जेवणाला सुद्धा त्यांच्याकडे थांबायचा विचार होता कि काय तूझा? " सीमा ने गंमतीतच विचारलं..

आणि स्वतःने केलेल्या विनोदावर ती स्वतःच हसु लागली..

रोहन छोटंसं तोंड करुन तिच्याकडे बघत होता..


सीमाने स्वतःचे दोन्ही कान धरले, "सॉरी बाबा.. पण तुला अचानक पणे तोंड पाडून बसायला काय झालं??"


"मला ही मुलगी पसंत आहे." ओठांवर स्मित उमटवतच रोहन ने म्हटले..

"खरच दादू... " सीमाने उत्साहीत होत विचारलं.


रोहन ने हो मध्ये मान डोलवली..

"म्हणजे मगाशी जे मला बोलत होतास ते खोटं होतं तर.." सीमाने दोन्ही हात कमरेवर ठेवतच रोहनला प्रश्न केला.


रोहन ने हसतच हो मध्ये मान डोलवली..

"वाटलच मला.. पण मी खुप खुश आहे फायनली तुला तुझी लाईफ पार्टनर मिळेल. आत्ता माझा दादु एकटा नाही रहाणार.. " अस म्हणत आपल्या दादाला तिने घट्टशीर मिठी मारली.


प्रिया खिडकीतून दोघां बहिण भावांचं एकमेकांवर ओतू जाणार प्रेम बघतच राहिली. ते प्रेम बघून तिला थोडं गहिवरून येत. तिने स्वतः भावाला अशी मिठी कधी मारलीच नव्हती.. एवढी जवळीक तिची तिच्या भावासोबत नव्हतीच.. पण ह्याचा अर्थ असा नव्हता की तिचं तिच्या भावावर प्रेम नाही.. प्रेम खूप आहे दोघांचही एकमेकांवर.. पण ते व्यक्तच करता येत नव्हतं.


प्रियाला अजूनही कुठे तरी वाटत होतं की ऋषी परत येईल तिच्याकडे. तिने त्याचा नंबर जरी मोबाईल मधून काढून टाकला असला तरी मेंदूत स्वतःची जागा निर्माण करुन बसलेल्या त्या आकडयांना ती डोक्यातून काढूच शकत नव्हती..

तिला साखर झोपेतुन उठवून जर का कोणी ऋषीचा नंबर विचारला तर पटकन बोलून दाखवू शकत होती ती. प्रिया आणि ऋषीत अधुन मधुन छोट्या मोठ्याने गोष्टी वरूनभांडण होतच असायची आणि तेव्हा देखील ती असच त्याचा नंबर वैगेरे डिलीट करून टाकायची. पण कधी तो तर कधी प्रिया एकमेकांना सॉरी बोलून मोकळे व्हायचे. तिला वाटलं ह्यावेळी देखील तसच काहीसं होईल पण तसं झालं नाही. ऋषीने तिला फोन तर सोडा सादा मेसेजसुद्धा केला नाही. शेवटी प्रियानेच हार मानून ऋषीला फोन लावला. रिंग जात होती त्याला.. पण फोन उचलत नव्हता तो..


सतत दोन दिवस प्रिया ऋषीला फोन लावत होती. आपले मिस कॉल बघुन तरी ऋषी पुन्हा कॉलबॅक करेल असे तिला वाटले.. पण कसलं काय?

त्याला काहीच फरक नाही पडत असं त्याच्या वागण्यातून प्रियाला जाणवत होतं पण तिचं एक मन होतं जे अजुनही हे मान्य करायला तयार नव्हतं कि ऋषीला ती नकोय.


त्याने दाखवलेली स्वप्न, वेळो वेळी घेतलेली तिची काळजी, तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्यासाठी घेतलेले महागडे गिफ्ट सगळंच खोटं कसं काय असु शकत? हा विचार तिच्या डोक्यात सुरु होता..


"नाही... ऋषीच अजुनही माझ्यावरच प्रेम आहे.." तिने स्वतःलाच म्हटले.


पण ऋषी फोनच उचलत नाही म्हणुन तिने दोघांचाही कॉमन मित्र असणाऱ्या सुयशला फोन लावला.


"ऋषी कुठे आहे ह्याबद्दल काही माहिती का तुला? माझे कॉल उचलत नाही तो.." सुयश ने फोन उचलल्या बरोबर प्रियाने त्याला प्रश्न केला.


खरं तर प्रिया आणि ऋषीमध्ये सुरु असलेल्या वादा बद्दल सुयशला काहीच कल्पना नव्हती.

"मी ऋषीसोबत बोलून बघतो आणि सांगतो तुला काय ते.." असं आश्वासन देत सुयशने फोन कट केला..


मोबाईल तसाच हातात पकडून ती होती..

सुयशच्या फोनची वाट बघत...


सुयशने सुद्धा फोन करतो म्हटले पण फोन केलाच नाही म्हणून प्रियानेच स्वतःहून त्याला फोन केला.


"ऋषीला तुझ्यासोबत बोलण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाही. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काहीच ऐकत नाही.. तुला हे सांगण मला जड जात होतं म्हणुन तुला कॉल करण टाळलं मी. प्रिया एक मित्र म्हणुन मी तुला एवढच सांगेल, विसर त्याला आणि मूव्ह ऑन हो.. "

सुयशच्या बोलण्यावर प्रियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही..


"हॅलो प्रिया... ऐकतेस ना? " सुयश ने समोरून विचारले..


"थेंक्स...! " कापऱ्या स्वरात ती म्हणाली आणि तिने फोन कट करुन टाकला


आत्ता मात्र प्रियाला हे मान्यच कराव लागणार होतं कि ऋषीला ती नको आहे.. आणि हिच गोष्ट मान्य करन तिला भरपूर जड जात होतं..

आज ती खुप रडली..

जणु मनात साठवुन ठेवलेल्या ऋषीच्या आठवणी डोळ्यांतील अश्रुंसोबत बाहेर टाकत होती ती..


दुसऱ्याच दिवशी रोहनच्या काकांनी प्रियाच्या वडिलांना होकार कळवला.


नेमक अश्या वेळेला प्रिया कामावर होती..

प्रियाच्या आईने प्रियाला त्याबाबत सांगितले आणि तिचे मत विचारले.

"तुम्ही कराल ते योग्यच असेल." अस सांगून फोन ठेवून दिला.

तडक डेस्कवरची ती उठली आणि तिने थेट बाथरूम गाठलं.. स्वतःला वॉशरूममध्ये कोंडून घेतल..

आणि अश्रुंना वाट मोकळी करून दिली तिने. पण काही केल्या तिच रडू थांबतच नव्हतं...


पण इथे रोहनच मात्र वेगळंच होतं.

प्रियाला बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडलेल्या रोहनला मात्र कधी एकदाच प्रियाला भेटतो असे झालेलं. तिला भेटल्यापासून त्याच मन प्रियामय झालेलं.. त्याचं त्याच्या कामात लक्षच लागत नव्हतं.. तिची आठवण त्याला स्वप्न लहरीत न्यायची.. दोघांच्याही भविष्याला घेऊन तो स्वप्न रंगवू लागायचा..

आणि....


अश्यातच साखरपुड्याची तारीख ठरविण्यात आली. जसं जशी साखरपुड्याची तारीख जवळ येत होती, तसं तसं प्रियाला ऋषीची आठवण जास्तच त्रास देत होती..

त्याच्यासोबत बोलल्या वाचुन तिला रहावतच नव्हतं..

"आपण एक शेवटचा प्रयत्न करुन बघू.. " असं स्वत:शीच ठरवत प्रियाने लंच ब्रेकमध्ये ऋषीला पुन्हा एकदा फोन केला..

पण नेहमी घडायच तेच ह्या वेळेस सुद्धा घडलं. ऋषीने ह्या वेळेस देखील तिचा फोन उचलला नाही. ती नाराज झाली.. त्याच्या आठवणीपासुन दुर पळण्याचा तिचा प्रयत्न सुरु झाला.. म्हणुन तिने स्वतःला कामात झोकून दिल.. पण जितकं ऋषीपासुन ती लांब पळत होती, तितकीच जास्त ती त्याच्या आठवणीत गुरफटत चालली होती..

खरं प्रेम हे त्रासदायी असतं आणि जर का ते एकतर्फी आणि निस्वार्थी असेल तर ते जास्तच त्रासदायक असतं ह्याची जाणीव तिला आज होत होती. समोरच्याला लगेचच मूव्ह ऑन व्हायला जमत पण जो एकतर्फी प्रेमात गुरफटलेला असतो, त्याला मात्र मुव्ह ऑन ह्या शब्दाचा अर्थ समजुन घ्यायला भरपूर वेळ लागतो..


असंच काहीसं प्रियाचं झाल होतं. भूतकाळातुन बाहेर पडताच येत नव्हतं तिला..


संध्याकाळचे 7 वाजुन गेलेले. प्रिया अजुनही कामाच्या व्यापात अडकून होती.. खरं तर ऋषीच्या आठवणीतून बाहेर पडायच्या नादात ऑफिस मधुन बाहेर पडायलाच ती विसरली.


"मिस प्रिया.. आज तुम्ही अजुन इथेच? " बॉसच्या आवाजाने ती भानावर आली.


तडक खुर्चीवरची ती उठुन उभी राहिली..


"ते मी... म्हणजे... माझं थोडं काम पेंडिंग आहे. तेच पुर्ण करते.. आणि मी निघणारच आहे आत्ता. " सरांसोबत बोलत असताना तिने पीसी सुद्धा बंद केला.


"सगळ ठिक आहेना? " तिच्या बॉस ने तिला प्रश्न केला.. कारण नेहमी पेक्षा आज दिसणारी प्रिया त्यांना सुद्धा थोडी जास्तच वेगळी वाटली..


तिने हो मध्ये मान डोलवली.. बॉस ने सुद्धा खाजगी प्रश्न विचारणं योग्य नाही समजलं..


"मी घरी सोडू? अंधार जास्तच झाला असेल.." बॉस ने माणुसकी म्हणुन विचारल.


"नो सर.. मी करेल मॅनेज.." ओठांवर स्मित आणतच ती म्हणाली.


"ओके.. टेक केअर.. " एवढं बोलुन बॉस तिथुन निघुन गेले..


प्रियाने पटापट स्वतःचा डेस्क आवरला. बॅग खांद्याला अडकवत ती तिथुन जाऊ लागली...


अजुनही ऋषीच्याच विचारात होती ती. आजचा रस्ता जरा जास्तच लांब वाटत होता तिला.. आजू बाजुला नजर टाकत ती झपझप पाऊले पुढे टाकत होती.


तिची नजर एका पिसिओ बूथवर येऊन थांबली. पिसिओ बूथ वरून ऋषीला कॉल करुन बघुयात असा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिने त्याला कॉल लावला सुद्धा..


आणि समोरून कॉल उचलला गेला..


"हॅलो... " इतक्या दिवसांनी तिने ऋषीचा आवाज ऐकला..


क्रमशः

©भावना भुतल


काय बोलेल प्रिया त्याच्यासोबत? कळेल पुढील भागात..


(काय वाटत ऋषी उचलेल प्रियाचा फोन? )

@lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यांना ही कथा ऐकायला सुद्धा आवडेल त्यांनी नक्कीच ऐका..

कथा इतरत्र शेअर करताना लेखकाच्या नावानेच करा..

🎭 Series Post

View all