कलंक प्रेमाचा 9

Love Story

रोहनच्या स्वभावाने प्रियाला आपलंसं करून घेतलेले. प्रियाला घरी जाऊन जेवणाचा पुन्हा त्रास नको म्हणून रोहनने मुद्दामूनच आपला मुक्काम हॉटेलमध्ये वळवला.

मेनुकार्ड त्याने तिच्या पुढ्यात सरकवल...

"मनचाव सूप?? " दोघेही एकत्रच म्हणाले..

आणि नंतर हसु लागले..

प्रियाच्या आईचा प्रियाला फोन आला. ह्या वेळेला प्रियाने फोन उचलताना रोहनकडे बघितले.

"उचलू का फोन?? आईचा आहे. " प्रियाने रोहनला विचारलं.

"अग उचलना.. त्यात काय विचारायचं? मी पण विचारलं म्हणून सांग आईंना.." रोहनने एवढं प्रेमाने दिलेल्या उत्तराने प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटल.

ह्यावेळेला मात्र प्रिया जागेवरून न उठता रोहनच्या पुढ्यात बसुनच बोलत होती. खुप दिवसांनी आईसोबत बोलताना प्रियाचे डोळे नकळत पाणावले. प्रियाच्या आईने तिच्या वडिलांकडे फोन दिला. प्रियाच्या पप्पांना रोहनशी बोलायचे होते. प्रियाने रोहनला फोन दिला.

"नमस्कार जावई बापू..." रोहनसोबत आदरानेच प्रियाचे वडिल बोलू लागले..

"नमस्कार पप्पा. कसे आहात तुम्ही? " रोहनने सुद्धा त्यांची विचारपूस केली.

"मी आहे ठिक. प्रियाला माहेरपणासाठी आणायचं म्हणत होतो. तुमची परवानगी असेल तर.? " रोहन सोबत बोलताना प्रियाचे वडिल थोडे काचरत होते..

"अहो पप्पा ती आधी तुमची मुलगी आहे आणि मग माझी बायको. तुम्ही म्हणाल ते आणि मला आपला मुलगा समजा. अस अहो जाओ नका ना करू. खुप अवघडून गेल्यासारखं वाटत.." रोहन हसतच म्हणाला.

त्याच बोलणं ऐकुन प्रियाच्या वडिलांना खुप बर वाटल. ते सुद्धा त्याच्या बोलण्यावर हसले..

"तिला उद्या न्यायला आलं तर चालेल का ? " प्रियाच्या वडिलांनी प्रश्न केला..

" उद्या घेऊन जायचं म्हणतायत तर माझी काहीही हरकत नाही. प्रियाला चालणार का विचारा कारण तिला उद्या कामावर जायचं आहे. मग कस ते तुम्हीच ठरवा. धरा प्रियासोबतच बोला.. " एवढं बोलून रोहनने फोन प्रियाला दिला. 

प्रियाने वडिलांना मी नंतर फोन करून कळवते एवढं म्हणत फोन ठेवून दिला.

तितक्यात दोघांनीही दिलेल्या जेवणाची ऑर्डर आली. दोघेही जेवून घरी आले. प्रिया आणि रोहन दोघेही फ्रेश होऊन बेडरूमकडे वळले. प्रिया बेडरूम बाहेरच एखाद्या पुतळ्या प्रमाणे स्तब्ध पणे ऊभी राहिली. तिच्या पापण्यांची हालचाल होती तेवढीच..

रोहनच लक्ष प्रियाकडे गेलं.

" प्रिया, अशी बाहेर का ग उभी ग.? आत ये.." बेड वरील चादर नीट करतच रोहन ने प्रियाला म्हटले.. 

खरं तर नात्यात अजुन पुढे जायची तयारी प्रियाच्या मनाची झालेली नव्हती..

रोहन आणि मी एकाच बेडरूममध्ये हा विचार करुनच तिच्या पोटात गोळा आलेला आणि हे सगळ तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होतं..

"रोहन ते... मी.." प्रिया एकएक शब्द जोडत होती. रोहन सोबत काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं..

प्रिया काही बोलणार तितक्यात रोहनने तिला इशाऱ्याने शांत केले.

रोहन ने स्वतःसोबत चादर घेतली आणि एका हातात लॅपटॉप पकडत तो तिच्याच पुढ्यातून रूमबाहेर पडु लागला..

"तुम्ही कुठे चाललात.?? " तिने त्याला प्रश्न केला..

"तुझ्या मनाची होणारी घालमेल मला कळते ग. तुला हवा तेवढा वेळ घे. पण तुझ्या परवानगी शिवाय मी तुला स्पर्श सुद्धा नाही करणार आणि मुळात मला काय वाटत माहिती का?? आपण आधी चांगले मित्र होऊ आणि मग बघू." एवढं बोलून रोहन तिच्याच पुढ्यातून निघुन हॉल मध्ये आला.

प्रियाला रोहनच खरच खुप कौतुक वाटत होत. प्रत्येक क्षणी तो असं काही करायचा कि तिच्या हृदयात त्याची छाप पडायची.. आणि तो समोरून निघुन गेला तरी ती मात्र त्याच्याच विचारात हरवलेली असायची..

रोहन लॅपटॉप उघडून हॉलमध्येच बसुन स्वतःच काम करू लागला.

आणि प्रिया दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायची तैयारी करत होती.ऑफिसच आयडी कार्ड आणि कपडे ती तिच्या बॅगेतुन शोधून काढत होती. उद्या आई बाबांकडे जाणार म्हणून स्वतःची बॅगसुद्धा भरत होती.
ह्या सगळ्यात तिला अर्धा तास तरी लागला असेल.

झोपण्याआधी रोहनला एकदा बघावं म्हणून ती रूम बाहेर गेली. रोहन हॉलमध्ये नव्हता. त्याचा लॅपटॉप तिथेच ठेवून तो हॉलमधील बालकनीत एकटाच उभा होता. प्रिया देखील त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तिने रोहनकडे पाहिले.. तो एकटक काळ्याभोर नभाकडे बघत होता.. नभात चमकणाऱ्या टपोर चांदण्यात कोणालातरी शोधत होता तो..
प्रिया आपल्या शेजारी येऊन उभी राहिली हे सुद्धा त्याला कळलं नव्हतं..

"तुम्हांला झोप नाही येत का?" प्रियाने विचारलं.

अचानकपणे प्रियाचा आवाज आल्याने रोहन दचकला.

"तस नाही.. सहज बाहेर बघावं म्हणून आलो. आता झोपतच होतो. " रोहन कापऱ्या स्वरात म्हणाला.. त्याच्या आवाजात प्रियाला थोडा बदल जाणवला..

"काय झालं रोहन? बर नाही वाटत आहे का...? " प्रियाला. रोहनची काळजी वाटु लागली..

"कुठे काय.. काही नाही.. तुला झोप नाही येत? " त्याने प्रश्न केला.


"तुम्ही रडताय का.. काय झालं. मला नाही सांगणार?" प्रियाने विचारलं.

"काही नाही ग. झोप तू.." रोहन उत्तरला..

"तुम्हांला शप्पथ आहे माझी...सांगा काय झालं.." प्रिया हट्ट करतच म्हणाली..

"आधी सुटली बोल..." रोहन म्हणाला..

"नाही आधी सांगा.... मगच सुटली बोलेल.." हट्टी पणा करण्यात प्रियाचा हात कोणीच पकडू शकत नव्हतं..

"ते... मला माझ्या आईची आज खूप आठवण येतेय.. खुप म्हणजे खुप.." रोहनने असं म्हटल्यावर प्रियाला काय बोलावे सुचत नव्हत. ती शब्द जोडत त्याच्यासोबत काही बोलायला जाणार पण त्या आधी रोहननेचं बोलायला सुरुवात केली..

"बाबा खूप लवकर गेले. आम्हां दोघांनाही आईनेच मोठं केलं. खुप कष्ट घेतले तिने आम्हाला मोठं करण्यासाठी.

तिने आमच सर्व केलं ग. बाबा नाहीत ह्याची कमी कधीच भासु दिली नाही..

माझं स्वप्न होतं,
खुप म्हणजे खुप मोठ व्हायचं.. एका चांगल्या पदावर कामाला लागायचं.. एक मोठं असं घर घ्यायचं.. ते घर बघुन आईला तिने आमच्यासाठी घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं पाहिजे..
त्या घरात प्रत्येक कामासाठी नोकर चाकर ठेवायचा सुद्धा विचार होता.. आईने आत्तापर्यंत खुप काम केलं, मोठ्या घरात गेल्यावर आईला काहीच काम करायला मी देणार नव्हतो. आईने फक्त त्या नोकरांवर हुकूम सोडायचे. ती जे मागेल ते तिच्या पुढ्यात हजर असलं पाहिजे. माझं ना माझ्या आईसाठी खुप काही करायचं ठरवलं होतं..!

पण तिने संधीच नाही दिली. खुप लवकर साथ सोडली माझी..

तू मगाशी हॉटेलमध्ये तुझ्या आईसोबत बोलत होती, तेव्हा मला माझ्या आईची खूप आठवण आली. " प्रिया सोबत बोलताना रोहनचे डोळे पानावले होते..

रोहनला रडताना बघून ती स्वतः सुद्धा रडू लागली. 

तिने त्याचा हात हातात घेतला. 

"एक दिवस सगळ्यांनाच इथून जाव लागणार आणि तुम्हाला माहिती, चांगली माणस देवाला खूप आवडतात. आई खूप छान होत्या, हे तुम्हां दोघा भाऊ बहिणीवर केलेल्या संस्कारावरून कळून येत.. त्या जिथे पण असतीलना तिथून तुम्हाला बघत असतील आणि तुम्ही अस रडलेलं तिला आवडणार नाही." असं म्हणत प्रियाने रोहनचे डोळे पुसले.

प्रियाने असं जागी करताच रोहन प्रियाकडे बघतच राहिला.

"नाही ना रडणार परत..? " प्रियाने विचारलं.

त्याने नाही मध्ये मान डोलवली..

"थँक्स प्रिया.. थोडं बर वाटल तुझ्याशी बोलून..." तो म्हणाला.

"फ्रेंडशीपमध्ये नो सॉरी एन्ड नो थँक्स...! " ती म्हणाली..

तिच्या बोलण्यावर दोघेही हसायला लागले..

"तू झोप. उद्या कामावर जायचं आहे तुला. माझं थोडं काम आहे.. ते झालं की मी पण झोपेल." रोहन म्हणाला.

"पुन्हा अस एकट्यात बसून रडू नका...नाही तर मग मी फ्रेंडशिप तोडून टाकेल.." प्रियाने थेट धमकीच दिली त्याला.

तिच्या गोड धमकीने त्याला हसु आलं..

"हो ग राणी. आता झोप..." रोहन हसतच म्हणाला..

"गुड नाईट..! " रोहनला स्मित देतच प्रिया म्हणाली..

"गुड नाईट...! " रोहनने सुद्धा तिला स्मित देत म्हटले..

रोहन त्याच काम संपवण्यात गुंतुन जातो.. पण इथे प्रिया मात्र बेडरूममध्ये स्वतःची कूस वारंवार बदलत झोपण्याचा प्रयत्न करत असते.

तीच मन आता फक्त रोहनच्याच नावाचा जप करत होतं. खूप वेळाने तिला झोप लागली.

तासाभराने रोहनच काम आटोपलं.. लॅपटॉप तसाच सोफ्यावर ठेवत प्रिया नीट झोपलीना हे बघण्यासाठी बेडरूमध्ये आला.

प्रिया गाढ झोपली होती.. पण रूम मधील टेबल लॅम्प तसाच चालू होता.. रोहनने तो लॅम्प बंद केला आणि तो रूम बाहेर आला.

हॉलमध्ये असणाऱ्या सोफ्यावर तो थोडं अवघडून झोपला..!

दुसऱ्या दिवशी सकाळी,

प्रियाला रोहन उठवत असतो.

"प्रिया उठ.. वाजले बघ किती. कामावर जायचं नाही का? "

"मम्मे... 5 मिनिट ना ग.." प्रिया कूस बदलतच म्हणाली.. आपण अजुनही माहेरी आहोत असं तिला वाटलं..

रोहनला हसू आलं..

"अग राणी उठ.. 8 वाजून गेलेत बघ." रोहनचा आवाज तिच्या कानांनी पुर्णपणे श्रवण केला तसं प्रिया घाबरतच उठली.
आपण स्वतःच्या घरी नाही तर रोहनच्या घरी आहोत ह्याची जाणीव तिला झाली.. तसं डोळ्यांवर असलेली उरली सुरली झोप सुद्धा तिची कुठे तरी दुर पळून गेली..

"सॉरी रोहन.. मला उठायला उशीर झाला.." बेडवर उठुन बसतच तिने रोहनला म्हटले..

"फ्रँडशीप मध्ये नो सॉरी.. नो थँक्स... असा रुल्स कालच कोणी तरी मला सांगितलेला.." रोहन ने असं म्हटल्याबरोबर गोड स्मित तिने रोहनला दिलं.

"गुड मॉर्निंग..! " ती त्याला म्हणाली.

"गुड मॊर्निंग... आणि बाय.. मी निघतोय आत्ता.." लॅपटॉप बॅगेत भरत रोहन तिच्यासोबत बोलत होता.

"हे काय?? तुम्ही एवढ्या लवकर निघालात.? " रोहनला प्रश्न करताना प्रियाचे डोळे मोठे झालेले..

"मी लवकरच निघतो ग राणी..

आणि हो... ब्रेकफास्ट मध्ये पोहे बनवलेत ते गरम करून खाऊन घे.
आणि तुझा डब्बा सुद्धा बनवलाय. जास्त काही करायला नाही जमलं.. मसाले भात केलाय.. आठवणीने घेऊन जा."
मनगटावर घड्याळ चढवतच तो म्हणाला.

रोहनने आपल्यासाठी एवढं काही केलंय हे बघुन प्रियाचे डोळे मात्र मोठे झाले..

"तुम्ही एवढं सगळ केलं? मी उठुन केलं असतं.. तुम्ही का त्रास करुन घेतला..? " आपण उशिरा उठल्यामुळे रोहनने स्वतःला त्रास करुन घेतला असं तिला वाटु लागलं.

"अग पुन्हा तुलाच उशीर झाला असता आणि आज घरी जाणार आहेस ना.?" रोहनने विचारल.

प्रियाने त्याच्याकडे बघतच हो मध्ये मान डोलवली. त्याच्यावरून तिची नजर हटतच नव्हती आज. निळसर रंगाच्या शर्ट मध्ये आज जरा जास्तच हँडसम दिसत होता तो..

"मग काय ठरलं.? पप्पा येणार आहेत का घरी? नाही म्हणजे.. जर ते घरी येणार असतील तर मला ऑफिस मधुन लवकर लवकर निघायला.

"नाही... मी कामावरून सुटल्यावर डायरेक्ट जाईन घरी. चालेलना ना तुम्हांला? " प्रियाने रोहनच मत सुद्धा विचारलं..


"हो चालेल..

बरं हे पैसे ठेव जवळ. जास्त दगदग नको करुस. डायरेक्ट टेक्सिने जा."

दोन हजारची नोट त्याने तिच्या पुढ्यात ठेवली. तिला बाय करत तो निघूनही गेला.

प्रियाला उठायला आधीच उशीर झालेला.. अजुन उशीर करुन तिला चालणार नव्हतं.. स्वतःची तैयारी करून ती देखील कामावर जायला निघाली.

ती पोहचली ना पोहचली तोच रोहनचा मेसेज..

"पोहचलीस का ग राणी??"

पगालातल्या गालात हसतच तिने त्याच्या मॅसेजवर रिप्लाय देत त्याला कळवलं, हो आत्ताच पोहचली. आणि तुम्ही?"

"मी तर मगाशीच आलो.." त्याने रिप्लाय केला.

"पोहे छान होते. मी घरून निघताना तुमच्यासाठी रात्रीच जेवण करून ठेवलंय. रोज बाहेरच खाऊ नका." तिने पटपट कीबोर्डवर अंगठे दाबत त्याला मॅसेज केला.

"ओके राणी. मला खूप काम आहे. आपण नंतर बोलुयात? चालेलना तुला.??" नेहमीप्रमाणे प्रियाची परमिशन रोहनने घेतली.

"हो... बाय..." एवढं बोलुन प्रियाने मोबाईल बाजुला ठेवला.

आज सगळेच प्रियाच्या डेस्कवर गर्दी करुन होते. प्रत्येक जण तिला लग्नाच्या शुभेच्छा देत होतं. सगळे तिला शुभेच्छा देऊ आपापल्या जागेवर निघुन गेलं तसं तिच लक्ष डेस्कवर एका कोपऱ्यात असलेल्या गिफ्ट कडे गेलं. ती ऑफिसमध्ये येण्याआधीच खरं त्र कोणी तरी ते गिफ्ट आणुन ठेवलेलं.. लेबल वैगेरे काही लावलं नव्हत.ल त्यामुळे गिफ्ट कोणाकडुन आहे हे प्रियाला कळत नव्हतं..

प्रियाने तिच्या ऑफिस मधील वॉचमेन काकांकडे त्या गिफ्ट कुठुन आलंय ते विचारलं..

त्यांच्याकडून कळलं कि ते गिफ्ट मुंबईमधुनच कोणी तरी कुरिअर केलंय पण त्यावर नाव वैगेरे नाही.

संकोचीत होतं प्रियाने ते गिफ्ट उघडल.

त्याचा सुंदर असं काचेच शॉ पिस होतं..

घर होतं ते.. तेही काचेच. त्या काचेच्या घराबाहेर एक मुलगा एका मुलीला घुडग्यावर बसून गुलाबाचं फुल गिफ्ट म्हणून देतो.. असा तो शॉ पिस होता.

आणि त्या गिफ्ट वरच एकदा चिट्ठी होती..

ती ओपन केल्यावर तिला कळलं कि ते गिफ्ट दुसर तिसरं कुणीही पाठवलं नसून ऋषीने पाठवलंय..

तसं प्रियाच्या हातुन गिफ्ट निसटून खाली पडल.

क्रमशः

@lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यांना ही कथा ऐकायला सुद्धा आवडेल त्यांनी नक्कीच ऐका..

कथा इतरत्र शेअर करताना लेखकाच्या नावानेच करा..

🎭 Series Post

View all