कलंक 1

कलंक

"तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे दोन्ही भावात अंतर पडलं. नाहीतर माझा आबा असा कधीच नव्हता.."

सासूबाई तोंडाला येईल ते थोरल्या सुनेला बोलत होत्या आणि ती गपगुमान ऐकत होती.

श्रीकांत, राधाबाईंचा मोठा मुलगा. त्याच्या पाठोपाठ आलेला राहुल. धाकटा म्हणून जास्तच लाडका. श्रीकांतचं बालपण जास्त दिवस टिकलं नव्हतं, पाठीवर 2 वर्षांनी भाऊ झाला आणि त्याचं बालपण हरपलं. सगळं लक्ष एकट्या राहुलकडे. आईचं प्रेम सर्व मुलांवर सारखंच असतं असं म्हणतात ते काही पूर्णपणे खरं नाही.

थोरला आबा, म्हणजेच श्रीकांत लग्नाच्या वयाचा झाला तेव्हापासून राधाबाईंना काळजी होती. राहुल प्रचंड लाडात वाढलेला. अभ्यासात त्याचं लक्ष नसायचं. पूर्णवेळ खेळणं आणि मजा करणं. तरुण वयात रखडत कॉलेज पूर्ण केलं पण पुढे नोकरीवरही टिकेना. सतत धरपकड सुरू असायची. घर केवळ श्रीकांतच्या प्रामाणिक कामामुळे त्याच्या पगारावर सुरू होतं.

श्रीकांतचं सुद्धा आपल्या भावावर खूप प्रेम होतं. तो कमवत असो नसो, त्याला आवर्जून तो पैसे पुरवायचा. स्वतःची स्वप्न बाजूला ठेऊन त्याच्यासाठी पैसे बाजूला ठेवायचा. त्यात आई वडिलांचा पाठिंबा असायचाच.

श्रीकांतचं लग्न झालं आणि वसुंधरा सून म्हणून घरी आली. साधीभोळी असली तरी हुशार होती, चाणाक्ष होती. बारीकसारीक गोष्टी ती समजायची. घरात रुळायला तिला फार वेळ लागला नाही.

हळूहळू तिच्या लक्षात आलं, की राहुल अति लाडामुळे आळशी झालाय, त्याला आयतं मिळायची सवय झालीये. तिला ही गोष्ट खटकायची पण नवीनच लग्न, त्यात आल्या आल्या हे सगळं बोलणं तिला योग्य वाटलं नाही. राधाबाई श्रीकांतपेक्षा राहुल चे लाड करण्यात तिची मदत घ्यायच्या,

"आज डब्याला मेथी बनव.."

"आई पण यांना मेथी आवडत नाही, डब्याला दिली तर नाराज होतील.."

"पण राहुलला आवडते ना? ते काही नाही, मेथीच बनव.."

वसुंधराला नवऱ्याच्या आवडीनिवडी बाजूला ठेऊन गपगुमान जे सांगितलं ते करावं लागे. आता काही बोलायला गेलं तर वातावरण बिघडेल हे ती जाणून असायची.