कलंक 2

कलंक
राधाबाईंचं वय झालं असल्याने त्यांच्याकडून फारसं काही व्हायचं नाही, मग वसुंधराला पुढे करून त्यांना राहुलसाठी हवं ते तिच्याकडून करवून घ्यायच्या.

एकदा वसुंधराच्या माहेरी धोंड्या साठी बोलावणं आलं. श्रीकांत आणि वसुंधरा दोघेही गेले, तिच्या आईवडिलांनी बरीच बोळवण करून पाठवली. श्रीकांत साठी चांगले कपडे, वसुंधरासाठी साडी पाठवली. राधाबाईं मात्र आपल्या राहुल साठी काही आणलं नाही म्हणून नाराज झाल्या. त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून ती नाराजी दिसून यायची.

तसं पाहता राहुल हा तटस्थ व्यक्ती, त्याच्यासाठी काही करायचा प्रश्नच नव्हता, पण राधाबाईंसाठी सगळ्याचा फायदा फक्त राहुलला व्हायला हवा असं वाटायचं. मोठ्या मुलाचं लग्नही राहुल च्या पथ्यावर पडावं असं त्यांना वाटे. श्रीकांत तर आपल्या भावासाठी करतच होता सगळं, पण त्याच्या बायकोनेही राहुलचे लाड पुरवावे याकडे त्यांचा कटाक्ष असे.

वसुंधराची चिडचिड होऊ लागली. हळूहळू तिनेही विरोध करायला सुरवात केली.

"यांना डब्याला मेथी आवडत नाही, हरभऱ्याची उसळ आवडते, मी तीच बनवणार.."

"अगं मग राहुल कशी खाणार?"

"सगळ्या भाज्यांची सवय हवी, यांना मेथी आवडत नाही तरी ते खातातच ना?"

राधाबाईंना राग यायचा. दोघींमध्ये खटके उडू लागले. राधाबाईंनी ठरवलं, राहुलचं लग्न लावून द्यावं.

"राहुल ची बायको येऊ दे, मग तुला विनवण्या करायची गरज येणार नाही मला.."

वसुंधराला पण वाटायचं, जाउबाई आली की तिचंही काम हलकं होईल.

राहुल साठी स्थळं बघायला सुरवात झाली. राहुलने घरात अचानक तोफ सोडली, त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि तो तिच्याशीच लग्न करणार..

आपल्या लाडक्या मुलाचं मन कसं मोडायचं? सर्वजण एका पायावर तयार झाले. राहुल ने निवडलेली मुलगी...राहायला मॉडर्न..नखरेबाज..

संस्काराचा पत्ता नाही. घरकामाची बोंब. लग्न करून आली तेव्हापासून सकाळी 9 शिवाय उठायची नाही. वसुंधरा तिला बोलायला जायची तेव्हा राधाबाई मध्ये पडत.

"अगं तिला सवय नाही अजून.."

"मला कुठे सवय होती? मी अशी वागले असते तर चाललं असतं? तेव्हाही असंच म्हटल्या असत्या का?"

"तुसुद्धा टंगळमंगळ करायचीस बरं का.."

वसुंधराला कामाच्या बाबतीत कधी टाळाटाळ केलेली आवडायची नाही. तरी हे चुकीचे आरोप तिला ऐकून घ्यावे लागायचे.

वसुंधरा तिच्या जावेला अजिबात पाठीशी घालत नसे. तिलाही कामाची सवय हवी असं तिला वाटायचं. ती अर्धा स्वयंपाक करायची, पोळ्या झाल्या की जावेला बाकीचं करायला लावे. पण राधाबाईं स्वतः पुढे होऊन उरलेलं काम करून घेत. एरवी सोफा न सोडणाऱ्या राधाबाईंना आता कामाला चांगलाच जोर आलेला.

वसुंधराने सगळं काम करावं आणि जावेने फक्त आराम करायचा असा राधाबाईंचा प्रयत्न असायचा तो वसुंधरा काही यशस्वी होऊ द्यायची नाही. वसुंधरा तिच्या वाटेचं काम करायची, उरलेलं काम जावेसाठी सोडून खोलीत जायची. राधाबाई वसुंधराला बोलू शकत नव्हत्या, मग स्वतः पदर खोचून उरलेलं काम करत असायच्या.

एकदा जावेची तब्येत बरी नव्हती. राधाबाई सतत तिच्या मागेपुढे.. जेवण झाल्यावर ताट उचलू लागली तर राधाबाई म्हणत,

"अगं तुला बरं नाही, जा आराम कर..मी उचलते ताट.."

ते बघून वसुंधराच्या डोक्यात एकच सणक गेली. तिला तिचे दिवस आठवले, वसुंधरा तापाने बेजार होऊन अशक्तपणे बेडवर झोपून होती, तेव्हा राधाबाई चार वेळा तिच्या खोलीत आल्या..

"स्वयंपाक कोण करणार? थोडावेळ उठ आणि कर स्वयंपाक.."

वसुंधराला ते बघून अजूनच चीड यायची.