कलंक 3

कलंक

पुढे वसुंधराला दिवस गेले. दिवस गेले असतानाही तिला घरातील कष्टाची कामं चुकायची नाही. जाऊ तिच्या नखऱ्यातच व्यस्त असे. वसुंधराचा नवरा सगळं बघत होता. आईची दोघांच्या बायकांप्रती असलेली दुय्यम वागणूक त्याच्या लक्षात येत होती. वसुंधरा तक्रार करत नसली तरी तिच्या वाट्याला हे दुःखं नको म्हणून त्याने एक निर्णय घेतला.

ऑफिसमध्ये कळवून स्वतःहून दुसऱ्या शहरात बदली करून घेतली जेणेकरून वसुंधराला या अश्या अवस्थेत शांतता मिळेल. वसुंधरा आपल्या नवऱ्याचा या भूमिकेमुळे खूप सुखावली. तिचा वनवास आता संपेल या समाधानाने तिने आणि श्रीकांतने घर सोडलं.

इकडे राधाबाईंवर सगळा भार आला. सगळी कामं आता त्यांनाच करावी लागत. धाकल्या सुनेला सांगावंसं वाटे की बाई थोडीफार मदत कर, पण तिला काही बोललं तर त्यांचा लाडका राहुल दुखावला जाईल. राहुल साठी त्यांनी सुनेचे सगळे नखरे सहन केले.

त्यांना वसुंधराची आठवण यायची, पण तिची किंमत अजूनही समजायला त्या तयार नसत, उलट ती गेली म्हणजे तिनेच नवऱ्याला फूस लावली असणार वेगळं राहायची हेच त्यांच्या मनात.

इकडे राहुल आपल्या बायकोला सजवून धजवून मिरवत असे. त्याने काहीतरी नवीन काम सुरू केलेलं. थोडे पैसे गुंतवून भरपूर पैसा कमवायचा. सुरवातीला त्याला नफा झाला. श्रीकांत इथे नसल्याने त्याचं चांगलंच फावत होतं. राधाबाईंना तर राहुल इतके पैसे कमावतो म्हटल्यावर त्याला कुठे ठेऊ अन कुठे नको असं झालं..

"माझा राहुल कमवायला लागला, आता मला कुणाचीही गरज नाही.."

असं त्या म्हणत...पण राहुल सगळे पैसे फक्त बायकोवर उडवायचा. घर फक्त श्रीकांतने दिलेल्या पैशांवर चालत असे.

राहुल चं हे जास्त दिवस टिकलं नाही, हळूहळू तो फसत गेला, कर्जाचा डोंगर डोक्यावर चढला. राधाबाईंना एवढंच कळत होतं की राहुल कुठल्यातरी संकटात आहे. राहुलने त्यांना उलटं काहीतरी सांगून सहानुभूती मिळवली आणि आपल्याला पाच लाख हवेत एवढंच तो म्हणाला.

राधाबाईंनी श्रीकांतला तडक फोन लावला आणि पैशाची मागणी केली. श्रीकांतला एवढी मोठी रक्कम उभी करायची म्हणून संकट पडलं. एक तर त्यांच्या मुलाची जबाबदारी, वर नवीन घर, घराचे हफ्ते..

वसुंधराला हे कळलं तेव्हा तिने विचारलं...

"एवढी रक्कम कशासाठी लागतेय विचारलं नाही?"

"त्याच्या एका मित्राने ती रक्कम त्याच्याकडून घेऊन परत केली नाही, राहुल ने मोठ्या मनाने त्याला आपली सगळी पुंजी दिली आणि मित्र फरार झाला.."

"माझा विश्वास बसत नाही.."

"अगं... माझा भाऊ आहे तो.."

"तुम्हाला राग आला तरी चालेल, पण तुम्ही आधीपासूनच बघताय तो कसा वागतो..तुमचंच चुकलं..मोठा झाला तरी तुम्ही त्याला पैसे पुरवत राहिलात..त्याला तुमच्यावर अवलंबून ठेवलं..त्यामुळे त्याचं चांगलंच फावलं.. जबाबदारीची जाणीव त्याला कधी झालीच नाही.."

"पण मग आता.."

"एक काम करा, तुम्ही नीट चौकशी करा की पैसे नक्की कशासाठी लागताय.."

श्रीकांतला आपल्या बायकोवर विश्वास होता, त्याने माहिती काढली..त्यातून जे समजलं ते ऐकून श्रीकांतचा संताप झाला...

राहुलने बेटिंग वेबसाईटवर पैसे गुंतवले होते, त्यातून सुरवातीला चांगली कमाई झाली,त्याची हाव वाढली आणि त्याने लोकांकडून उसने पैसे घेऊन परत त्यात गुंतवले, तो हरला आणि सगळे पैसे घालवले.