Login

कलंक 4 अंतिम

कलंक
श्रीकांतने वसुंधराला हे सांगितलं,

"मी म्हटलं होतं ना? असं असूनही त्याने आईंना किती खोटं सांगितलं.."

"पण आता?"

"त्याला अजिबात पैसे देऊ नका, उलट त्याला बजावून सांगा की हे पैसे तुलाच कष्ट करून कमवावे लागतील आणि फेडावे लागतील, तेव्हा त्याला किंमत कळेल.."

आपला भाऊ सुधारावा म्हणून श्रीकांत हे पाऊल उचलायला तयार झाला. त्याने घरी कळवलं तसं राधाबाईंचा संताप झाला. त्या श्रीकांतला नको नको ते बोलून गेल्या. हे सगळं वसुंधरामुळेच घडतंय हा शिक्का त्यांनी वसुंधरावर मारला.

काही महिने उलटले, सणाचा दिवस होता. श्रीकांत आणि त्याची बायको घरी गेले. त्यांचं स्वागत तर झालंच नाही, राहुल आणि राधाबाईं पूर्णवेळ फुगून बसलेले.



राहुलचा विषय निघाला तेव्हा श्रीकांत म्हणाला,

"आई तो काय करतोय याकडे लक्ष द्यायला हवं, मागे त्याने जुगारात पैसे लावले आणि आपल्याला माहीतही नाही.."

राधाबाई राहुलची चूक होती हे मान्य करायला तयारच नव्हत्या, त्यांनी आपला रोख सरळ वसुंधरा कडे नेला आणि भडाभडा बोलून गेल्या,

"ही तुझी बायको, हिनेच फूस लावली तुला. ही येण्याआधी किती जीव लवायचास तू तुझ्या भावाला, आणि आता त्याला गरज आहे तर मदतही करत नाहीस तू.. काय जादू केली हिने तुझ्यावर?"

श्रीकांतला आता असह्य झालं, याआधी बायकोला त्या बरंच बोलायच्या तेव्हा श्रीकांत सहन करायचा पण आता त्याचाही संयम सुटला..

"आई, वसुंधरावर आरोप करणं बंद कर....आज जे काही झालं आहे ते तुझ्या अति लाडामुळे झालं आहे. लहानपणापासून बघतोय मी, राहुलच्या मागे लागताना मीही तुझाच मुलगा आहे हे तू साफ विसरून गेलीस. मीही भाऊ म्हणून त्याचाच विचार करायचो पण प्रत्येक ठिकाणी मला डावलून त्याला तू पुढे करत आलीस. शाळेत असतांना मला गाण्याचा क्लास लावायला आमच्या शिक्षकांनी तुला सांगितलं होतं, पण तू साफ नकार दिलास, कारण राहुलला सहलीला जायला पैसे लागणार होते..मला पुढे शिकायचं होतं, पण तू सरळ सांगायचीस की राहुलला पुढे पैसे लागणारेत. माझं बालपण पूर्ण वाया गेलं, कुणामुळे? प्रत्येक गोष्टीत, अगदी खाण्यापासून ते शिकण्यापर्यंत, त्याचाच फक्त विचार तुझ्या डोक्यात असायचा. लहान होता तोवर ठीक होतं पण मोठा झाल्यावरही तुझं तेच...तो वाईट मार्गाला लागला, कर्ज करून ठेवलं तरी तू त्याला पाठीशी घालणार आणि मी कष्ट करून सर्वांना पोसतोय तरी तू मलाच दोषी ठरवणार? आणि वसुंधराला काही बोललेलं तर मी अजिबात सहन करणार नाही, भाऊ म्हणून मी सगळं केलं ते ठीक आहे पण तिने का म्हणून राहुलचे सगळे दोष पोटात घालायचे? का म्हणून तिने त्याचे लाड पुरवायचे? त्याने काही केलंय आपल्या वहिनीसाठी? तिलाही तिचा संसार आहे, स्वतःच्या नवऱ्याला आणि मुलाला सोडून ती तिसऱ्या व्यक्तीसाठी नाही आपल्या संसाराची राख करू शकत. आईचं प्रेम सर्व मुलांवर सारखं असतं असं म्हणतात, पण जेव्हा भावा भावांमध्ये फूट पडते ना तेव्हा तो दोष त्यांच्या बायकांचा नसून आईने एखाद्या मुलावर केलेल्या आंधळ्या प्रेमाचा असतो..."

घरातले सर्वजण ते ऐकत होते, राधाबाईंचे डोळे उघडले की नाही माहीत नाही पण वसुंधराला मात्र आज खूप वर्षांनी तिचा हक्क मिळाला, समाधान मिळालं आणि तिच्यावरचा कलंक पुसला गेला.

समाप्त

🎭 Series Post

View all