कळत नकळत भाग 9

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर आणि नेहा दोघे लाॅन्ग ड्राईव्हला जातात.. मस्त एन्जाॅय करतात.. नेहा पावसात मस्त भिजते.. मग ते घरी येतात.. आता पुढे..

अमर नेहाला घरी घेऊन येतो. घरी आल्यावर ती थंडीने कुडकुडत असते. कारण ती पावसात चिंब भिजलेली असते..

"अगं हे काय इतकी कसं काय भिजलीस??" काकू.

"अगं बघ ना आई आम्ही गेलो आणि पाऊस आला. हिला नको म्हणताना पावसात भिजली." अमर.

"नेहा अगं जा लवकर कपडे बदलून ये. मी शेकायला गरम पाणी देते." काकू.

"हो काकू येते.." असे म्हणून नेहा आवरायला जाते.

ती कपडे बदलून आल्यावर काकू तिला गरम पाणी देतात. मग ती शेकून घेते. पण तरिही तिला सर्दी येतेच.. थंडी वाजून अंगात ताप भरतो.. अमर तिला दवाखान्यात नेऊन आणतो.. हे सगळं बघून मीराचे मन नाराज होते.

नेहा औषध घेते आणि झोपायला जाणार इतक्यात तिच्या लक्षात येते की झोपणार कोठे..

"काकू मी कोठे झोपायचं??" नेहा.

"अगं तू मीराजवळ झोपतेस की अमरच्या खोलीत.. कोठेपण झोप??" काकू.

"मी अमरच्या खोलीत झोपते.." नेहा मुद्दामच सांगते.

"बरं मग अमर तू हाॅलमध्ये झोपशील बाळ." काकू.

"हो आई चालेल.." अमर.

मग सगळे झोपायला जातात.. नेहाला झोपच येत नाही.. अंगात ताप असतो पण ती दिवसभरातील गोष्टी आठवून हसत होती.. ती फक्त अमर बद्दलच विचार करत होती..

मीराला अमर नेहाची काळजी घेताना पाहून कसेसेच होत होते.. तिला झोप येत नव्हती.. ती पाणी पिण्यासाठी खाली येते.. पाणी पिऊन जाताना तिचे लक्ष अमरकडे जाते.. अमर तसाच झोपला होता.. मग ती अमरच्या अंगावर चादर पांघरते आणि झोपायला जाते.

सकाळी मीरा तिचं सगळं आवरून खाली येते.. नेहा तिच्या आधीच आलेली असते.. नेहा आणि अमर गप्पा मारत बसलेले असतात.. ते पाहून मीरा आत जाते.. काकूंनी नाष्टा बनवलेला असतो.. सगळे मिळून नाष्टा करतात.. मग अमर त्याचा लॅपटॉप जो दुरूस्त करायला टाकलेला असतो तो आणायला जात असतो..

"मी पण येऊ काय??" नेहा.

"नको तू आराम कर.. आज कुठेच जायचं नाही.." अमर.

"अरे मी ठणठणीत आहे.. बघ जरा.." नेहा.

"तरीही नाही जायचं.." अमर.

"अरे मला एकटीला करमत नाही.." नेहा.

"मी लगेच येणार आहे.. लॅपटॉप दुरूस्तीला टाकलाय तो घेऊन येणार आहे.." अमर.

"काय झालंय लॅपटॉपला..??" नेहा.

"काही नाही ग. पडला तो आणि डिस्प्ले खराब झालाय.." अमर मीराकडे बघून म्हणतो.

"कसं काय??" नेहा.

"नंतर सांगतो.. मी आता जाऊन लगेच येतो.." असे म्हणून अमर जातो.

थोड्या वेळाने करमत नसल्यामुळे नेहा मीराकडे बोलण्यासाठी येते..
"हाय, येऊ का आत??" नेहा.

"हो ये ना.. विचारायच काय त्यात??" मीरा.

"मॅनर्स आहेत.. म्हणून विचारले.." नेहा तिरस्कारने बोलते.

मीरा गप्प बसते. "अम्या आणि तू बोलत नाही काय??" नेहा.

"तसे काही नाही.. बोलतो की आम्ही.." मीरा.

"मी कधी बघितले नाही.. अम्या तर किती बोलतो आणि तो तुझ्यासोबत बोलला पण नाही.." नेहा.

"मलाच जास्त बोलायला आवडत नाही.. म्हणून मीच बोलत नाही.." मीराचे हे बोलणे ऐकून नेहाला थोडं बरं वाटलं.

"मी आणि अमर लहानपणी खूप खेळायचो.. भांडायचो.. मी काकूंकडे आले तर याच खोलीत झोपत होते.. तशी तू पण छान ठेवलेस खोली.. पण माझ्या इतकी नाही.. मी आणि अमर रात्री उशीरापर्यंत जागून गप्पा मारायचो.. खूप मज्जा यायची.. अम्या आहे तसा आहे.. त्याच्यात काहीच बदल झाला नाही.." नेहा तिच्या लहानपणाच्या गोष्टी मीराला सांगू लागते.

मीरा नुसता "हममम" म्हणते. खरं म्हणजे तिला ते ऐकून घ्यायची इच्छा नसते.. पण तरीही ती काहीच बोलत नाही..

"अम्या एवढा फाॅरेनला गेला पण त्याला अजून एकही मुलगी पटवता आली नाही.. बिच्चारा.. कसं होणार काय माहित.." नेहा.

"तुला काय माहित.. कोणीतरी असेलच की.." मीरा.

"शक्यच नाही.. तसे असते तर तो मला बोलला असता.." नेहा आवाज वाढवून बोलते.

मीरा गप्पच बसते.

"मीच अमरला प्रपोज करणार आहे.. तो मला लहानपणापासून खूप आवडतो आणि मीही त्याला आवडते.. म्हणून तर तो माझी एवढी काळजी घेतोय.." नेहाचे हे बोलणे ऐकून मीराच्या काळजाचा ठोका चुकला.. तिला खूप वाईट वाटले.. पण तिने तसे दाखवले नाही..

"मी आज संध्याकाळीच अमरला प्रपोज करणार आहे.. आणि मला खात्री आहे की तो पण होकारच देणार.." नेहा मुद्दाम बोलते. इतकं बोलून ती निघून जाते..

मीराला आता काहीच नकोसं वाटतं असतं.. मन खूप उदास झालेलं असतं..

का कळेना
मन भटकत
उंच पहाडी जात आहे..

का कळेना
मन हे चंचल
उंच आकाशी जात आहे..

का कळेना
मनाची शीतलता
खोल पाण्यात जात आहे..

का कळेना
मन हे उदास
फक्त एकांतात जात आहे..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.

🎭 Series Post

View all