Login

कलाटणी भाग -3

स्त्री जीवनाची कहाणी
कलाटणी
भाग -3

त्याचा तर हा धंदाच झालेला होता. असा त्रास द्यायचा की मायबाप आपली पोरगी जिवानिशी जाण्यापेक्षा सुखरूप घरी घेऊन जावी म्हणून शरणागती पत्करत.

कोर्ट कचेरीला पैसे कोण लावणार, पोरीची बदनामी होईल ती वेगळीच म्हणून मायबाप हा मार्ग स्वीकारत. तेच त्याला फावले आणि त्याचा तो धंदाच बनला.

सायली त्याची... चौथी बायको होती. विश्वास बसणार नाही पण सायली आधीच्या तीन बायकांसोबत त्याने तेच केलेलं होतं.

पण सायली ची गोष्ट वेगळी होती. मायबापांनाही ती जड झालेली. त्यांनाही ती नकोशीच होती. त्यांना कसची तिची काळजी.
ती बिचारी रोजच तीळ तीळ मरत होती पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतेच ना? तिच्याही पाठीशी देव होताच असं म्हणूयात.
'जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे '
फुकटचा सल्ला देणारे तर चार भेटले पण मदतीचा हात पुढे करायला एकही नव्हता. चार वकिलांचे उंबरठे झिजवले, कोरडी सहानुभूती सगळेच दाखवायचे पण पैशाचे काम आले फीचा विषय निघाला की माघार घ्यायचे.

अशात तिला एडवोकेट शरयू चे नाव कळाले. शेवटचा प्रयत्न करून बघावा म्हणून सायली शरयूकडे आली.
हाती निराशाच येणार ही खूणगाठ मनाशी बांधूनच ती आपली कर्म कहाणी खरे तर शरयू पुढे कथन करत होती.

पण...

सायली ची कर्म कहाणी ऐकता ऐकता एडवोकेट शरयू अंतर्मुख झाली. तिचे रक्त तापले, ती चिडून उठली.
आता बस्. खूप झाले. आता पायली भरली म्हणत ती उठून उभी झाली. तिचे ओठ रागाने थरथरत होते, डोळे लालबुंद झाले होते जणू आगच ओकत होते.
तिची देहबोलीच सांगून जात होती की ती किती संतप्त झालेली आहे.

या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे. मी आज विडा उचलते म्हणत तिने मनाशीच शपथ घेतलेली.

ती सायली कडे वळली आणि म्हणाली, " ठीक आहे, उद्या ये केस पेपर तयार करून घेऊ. "
तिचे शब्द ऐकले आणि एक क्षणासाठी सायली स्तब्ध झाली. तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. तिने जो विचार केला होता त्यापेक्षा हे वेगळंच होतं.ती म्हणाली,
" मॅडम फी... "

" ते नंतर बघू आधी केस
लढायची. "
सायली तर निघून गेली शरयू मात्र विचारात गढून गेली. तिला रात्रभर झोप आली नाही.
दुसऱ्याच दिवशी तिने सायलीच्या वतीने ' राघव ' विरोधात दावा दाखल केला. सह आरोपी म्हणून त्याचे आई-वडील बहीण सगळ्यांचीच नावे त्यात उद्धृत केलेली होती.

आणि लगेच त्याचे पडसाद उमटायला लागले.

आपल्या पदाचा वापर, आपले वजन वापरून शरयूवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. नाही म्हणायला बळाचाही वापर झाला. गुंडागर्दी,धमक्या सगळे अस्त्र वापरून एडवोकेट शरयूला परास्‍त करण्यासाठी शिकस्त सुरू झाली. पैशाचे आमीष दाखवून झाले.
साम-दाम-दंड-भेद सगळं वापरून तिला परास्त कसं करता येईल याचा शोध घेतल्या गेला.
पण शरयू... शरयू होती ती जराही डगमगली नाही.
आपल्या निश्चयावर ठाम राहिली.

जसजशी केस पुढे सरकत होती आणि विरोधी पक्षाला आपलं भविष्य समोर पुढ्यात दिसायला लागलं होतं.

या सगळ्या गोष्टींची कल्पना शरयूला होती. ती सावध होती. तिने आपलं मरण पणाला लावलं होतं.
तिने अगदी पॉईंट टू पॉईंट युक्तिवाद करत राघवला आरोपीच्या पिंजऱ्यात तर उभे केलेच होते आता आरोपीच्या पिंजऱ्यातून फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवले होते.

तो कोर्टाच्या बाहेर आवारात तिला म्हणाला ही होता, " लक्षात ठेव मला राघव म्हणतात. "

शरयू ही कणखरपणे उत्तरली होते, " मलाही शरयू म्हणतात "
खालच्या कोर्टाचा निकाल आला. आता तो हायकोर्टाची सुप्रीम कोर्टाची दारे ठोठावेल हे ती जाणून होती. तिची जबाबदारी वाढली होती.
क्रमश: पुढील भागात
भाग-4 अंतिम मध्ये
शरयू एवढी का पेटली? मला राघव म्हणतात असे राघव का म्हणाला? बघूयात पुढील भागात....
पुढील भाग नक्की वाचा
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all