Login

कलियुगी राक्षस- ए आय

हे केवळ मनोरंजनाच फिचर नाही... हा आहे कलियुगी राक्षस... ए आय
ईरा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा लेखन ( संघ कामिनी )

शीर्षक - कलियुगी राक्षस - ए.आय.

   घड्याळात सायंकाळचे चार वाजलेले. संगमरवरी दगडाप्रमाणे चकचकीत अश्या पांढऱ्या शुभ्र बंगल्यात आरडाओरडा, गोंधळ, रडारड चालू होती. बाहेर बघ्यांची गर्दी, त्यातच पोलीस जीप उभी होती. बेडरूमचा दरवाजा सताड उघडा होता. खिडक्यांवर लावलेले भले मोठे पांढरे शुभ्र पडदे धबधबा कोसळल्याप्रमाणे वाऱ्यावर उडत होते. मधोमध बेड आणि त्यावर सिलिंग फॅन होता. त्याच फॅनला एक मृतदेह लटकलेला, जो खाली काढण्यासाठी वर्दीतील दोन इसम खटाटोप करत होते.

      "एनी हिंट? काही सुगावा मिळालाय का राणे?"

      "येस सर... ही चिठ्ठी इथेच बेडवर पडलेली."

       "बॉडी पोस्टमार्टेमला घ्या."

        "ओके सर."

"शर्माजी लवकरच कळेल यामागचं कारण. तोपर्यंत बॉडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवायची आहे. नेमकी हत्या आहे की आत्महत्या हे सिद्ध झाल्याशिवाय आम्ही पुढची प्रोसेस करू शकणार नाही. चोवीस तासांच्या आत बॉडी परत मिळेल. काळजी घ्या." काखेतली टोपी डोक्यावर चढवत तो इसम गर्दीत वाट काढत नाहीसा झाला.

इकडे माघारी मात्र एकच हंबरडा फुटलेला.
      "रूहीऽऽऽऽ"

-------------------------------------------------

(फ्लॅशबॅक)


      "आय हाय... आज तर कहरच केलास तू रूही. काय फाडू दिसत आहेस, बोले तो एकदम झकास!" जिया, रूहीची कॉलेज फ्रेंड रुहीने नुकतेच अपलोड केलेले इंस्टाग्रामवरचे फोटो बघत म्हणाली.

      "हम्म... सुंदर तर मी आधीपासूनच आहे; पण म्हटलं चला नवीन ट्रेण्ड आहे इंस्टाचा, करूया ट्राय." रुहीने केस उडवले.
     
      "काही असो... पण हा घिबली फोटो एकदम कमाल आहे हा!"

कॉलेजमध्ये सगळ्यांनीच तिचं तोंडभरून कौतुक केलं.

रूही शर्मा... एका नामवंत बिजनेसमनची एकुलती एक मुलगी. लाडात, ऐश्वर्यात वाढलेली आणि थोडी बिघडलेलीही. असो... वयच हे, बिघडणार सावरणार... तर अशी चंचल रूही! उंच, रेखीव बांधा, गौर वर्ण, चाफेकळी नाक, बोलक्या बाहुलीप्रमाणे डोळे, शॉर्ट हेअरकट, ॲटीट्युड बाळगणारी रूही थर्ड इयरला होती आणि एक सोशल मीडियाची फेमस इन्फ्ल्युएन्सर देखील... मिलियन्सच्या वर तिचे फॉलोअर्स होते. इतक्या कमी वयात ती यशस्वी झालेली. त्याचा थोडासा गर्वही तिला होताच म्हणा; पण नेहमी सर्वांशी हसत खेळत राहणारी व पटकन विश्वास ठेवणारी, सोशल अकाउंटवर सतत ॲक्टिव्ह असणारी, भरभरून फोटो अपलोड करणारी रूही सगळ्यांची क्रश होती. घरचे सगळे उच्चशिक्षित. आपापल्या कामात बिझी राहणारे तिचे मॉम, डॅड आणि घरचे नोकर चाकर सोडता घर तसे रिकामेच... असो!

            "मिस्टर शर्मा... काय लाड चालू आहेत लेकीचे? किती मोकळी सोडलीय तिला? या तुमच्या अती लाडामुळे ती माझं जराही ऐकत नाही. सोशल मीडियाची इतकी लत लागलीय तिला की मॉम कुठेय? डॅड कुठे आहेत? काहीच माहीत नसतं तिला... हल्ली तर तिच बोलणं देखील कमी झालंय. सतत मोबाईल हाती असतो, जे मला अजिबात आवडत नाही." शालिनी, रूहीची मॉम तिच्या बाबांना सुनावत होती.

       "रिलॅक्स डियर शालिनी... शी इज इंटेलिजंट! आजची तरुणाई आहे ही... एकविसाव्या शतकातील पिढी... तिला तिची लाईफ एंजॉय करू देत. ती आपला विश्वास तोडणार नाही. सो चील!" रूहीचे डॅड म्हणाले. तेआधुनिक आणि स्वतंत्र विचाराचे होते. त्यांनी मुलगी आहे म्हणून तिच्यावर कोणतंही बंधन लादलं नव्हतं.

        "घ्या... शंभर वर्षं आयुष्य आहे तुमच्या लेकीला! आल्या मॅडम..." रूहीचं नुकतंच कॉलेज सुटलं होतं.

         "आज कुठून दिवस उगवला? इट्स मिरॅकल ऑर व्हॉट?" आनंदी चेहऱ्याने ती आत आली. आज कितीतरी दिवसांनी तिला तिचे आईबाबा एकत्र दिसले होते. नाहीतर असा योगायोग क्वचितच घडायचा.

      "डॅड... तुम्हाला माहितीय, मी सकाळीच घिबली स्टाईल फोटो टाकलाय तर त्याला इतके लाईक्स मिळालेत ना..." एखाद्या लहान मुलीनं तिच्या बाबांशी लाडिक बोलावं, अगदी त्याच उत्साहात रूही बोलत होती.

      "एकाच ट्रेण्डवर अडकून पडू नको. सतत नवीन ट्राय करत रहा."

      "येस डॅड... जेमिनीचं नवीन फीचर आलंय. 'ए आय' ट्रेंडिंगवर आहे अँड आय एम शुअर इट वर्क्स बेटर दॅन पास्ट ट्रेंड्स... ओके, मी फ्रेश होते. बाय डॅड... बाय मॉम."

        "बेस्ट लक प्रिन्सेस."

जिन्याच्या पायऱ्या चढतच तिने तिच्या बाबांना फ्लायिंग किस दिला.

शालिनी मात्र दोघांना आळीपाळीने रागातच बघत होती.

"एक दिवस हे तुमच्याच अंगलट येणार आहे मिस्टर शर्मा."

"मी आहे निस्तरायला."

यावर शालिनी एक लूक देऊन आत निघून गेली. बड्या बड्या कंपन्यांचा मालक मात्र तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून गालात हसत होता. पैसा सगळं काही व्यवस्थित करू शकतो, हा केवळ भ्रमच नाही का?

घिबलीप्रमाणेच रूहीच्या जेमिनी ट्रेण्डला देखील लाईक्स, व्ह्यूजचा पाऊस पडला होता; पण आज कॉलेजमधून घरी आली तेव्हा ती खूप अपसेट होती.

"डॅडऽऽऽ" तिने आवाज दिला; पण प्रत्युत्तर आलं नाही.

"छोटी मालकीण, साहेब अजून घरी आले नाहीत. मोठ्या मालकीण पण मीटिंगमध्ये गेल्या आहेत." एक नोकर येऊन सांगून गेला.

तशी पाय आपटतच ती बेडरूममध्ये गेली. कारणच तसं होतं. आज दुपारपासून तिची सगळी अकाऊंट हॅक झाली होती. ज्याने ती पुरती गोंधळली होती. हातातला फोन टेबलवर ठेवत ती बाथरूमकडे वळली, तोच तिचा फोन वायब्रेट झाला. परत फोनकडे वळत तिने उचलून पाहिला तर जेमिनी, मेटाकडून नोटिफिकेशन आलं होतं. ते तिने उघडून पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली...


"हॅलो रूही? व्हॉट हॅपन्ड? काय आहे हे? कसल्या क्लिप्स आहेत? विश्वास बसत नाही ती तूच आहेस." तिने आलेला फोन उचलला होता तशी जिया पलीकडून ओरडत होती; पण आता गर्भगळीत झालेल्या रूहीचं लक्षच नव्हतं. तिच्या अकाऊंटवर बरेच अश्लील व्हिडिओ पडले होते, ज्यात ती स्वतः दिसत होती. हे कसं झालं, कोणी केलं याची तिला जराही कल्पना नव्हती. डोकं गच्च पकडून ती रडू लागली. मुलगी कशीही असली तरी तिला स्वतःच्या इज्जतीचा असा पंचनामा झालेला कधीच आवडणार नाही. शेवटी तिला क्लिक झालं की जेमिनी आणि मेटाकडून आलेले व्हिडिओ चक्क त्यांनीच बनवलेत. लागलीच तिने फोन ओपन करून व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न केला; पण सतत काहीतरी एरर येत राहिलं. सरतेशेवटी वैतागून तिने मोबाईल फोडून टाकला. होत्याचं नव्हतं झालं होतं... तिचं आयुष्य क्षणात उद्ध्वस्त झालं होतं.

रडत रडत तिने नोटपॅड आणि पेन घेतला अन् लिहिलं,
"आय एम रिअली सॉरी मॉम डॅड..."

तिच्याकडे पर्याय नव्हता. जगाला तिला तोंड द्यायचं नव्हतं. राग आणि भीतीपोटी तिने पंख्याला गळफास घेतला होता. कदाचित तिचा निर्णय चुकीचा होता; पण स्वतःचे वैयक्तिक फोटो जेमिनीवर टाकणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी हा एक इशारा होता...


(वर्तमान)

"रूहीऽऽऽ" शालिनी वेड्यासारखी रडत होती.

"सांगितलं होतं ना मी मिस्टर शर्मा... नको वेड लावू तिला! काय मिळवलंस?"

तिला काय उत्तर देणार होते मिस्टर शर्मा. चूक तर सगळ्यांचीच होती; पण भोगावं लागलं रूहीला.


इन्स्पेक्टर साठेंनी चिठ्ठी उघडली.

‘मला माहीत नव्हतं... नव्हतंच माहीत मला की, माझ्या फोटोंचा असा गैरवापर केला जाईल. मला माहीत आहे मी चुकीची नाही; पण मला हे पाऊल उचलावं लागणार आहे. ट्रेंड्सच्या ओघात वाहवत जाणाऱ्या या तरुणाईला समज देण्यासाठी मला हे करावं लागलं. होप, माझा हा निर्णय वाया जाणार नाही. हे 'एआय' नाही हा कलियुगी राक्षस आहे... जो भविष्यात न जाणो किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल. आय एम रिअली सॉरी मॉम डॅड... मी ज्या अनाथ आश्रमाला दान करायचे तिथून कोणीतरी अडॉप्ट कराल. त्यांनाही आईबाबांची गरज आहे. ही माझी इच्छा समजा...

जो कोणी ही केस हाती घेईल त्यांना एवढंच सांगेन हे जिवंत माणसाचं काम नाही. त्यामुळे यात कोणाचा दोष नाही. जर तुम्हाला वाटतच असेल तर 'ए आय' बंद करण्याचा प्रयत्न करावा हीच अपेक्षा...
रूही....’

ही चिठ्ठी वाचून इन्स्पेक्टर साठेंना देखील अश्रू अनावर झालेले.

समाप्त!  
© प्रणाली निलेश चंदनशिवे.


  
0