काळजी

Mother ...always Live For Child...age Doesn't Matter.

"आम्ही मजेत आहोत,

तुम्ही काळजी घ्या " असं

जेव्हा जेव्हा ती म्हणते, तेव्हा

आपण किती बेफिकीरपणे 

काळजी या शब्दाला दुर्लक्षित 

करतोय याची होते जाणीव....पुसटशी.


पण नेणीवेचं काय...?

हातावर किती रेषा उरल्यात तिच्या

तळभागी किती घट्टे लपवलेले तिच्या

पायाची भेग मलमानं भरत नाही,

तिच्या ठसठसीला बामही पुरत नाही,

आई होते तेंव्हापासून तिची ती उरत नाही.


करुन पाहिला प्रयत्न तिला आधार द्यायचा

तेव्हा आलं लक्षात आपणच आहोत अधु.

शक्य नाही समजावणं तिला तिची बात खरी

म्हणाली, "निघायच्या वयात बंधनं नको लादू."


जग म्हणतंय ,म्हणूदेत आईला सोडलं वाऱ्यावर

काजवा तळपू शकतो का रवी इथे असल्यावर..?

मीही आता घेतो काळजी तिच्या समाधानासाठी

नव्वदीतही जीव तिचा ...केवळ माझ्यासाठी...


©® सदासन