कल्की - एक अनावृत रहस्य(भाग २)

भगवान कल्की यांच्या प्रकटीकरणाचे रहस्य
*** ६ दिवसांपूर्वी***


“ आई,काय हे? सकाळी सकाळी एवढा कसला धूर?”

“ अरे निरंजन, देवाची आरती केली म्हणून धूप लावलाय.”

“ अगं पण मला सहन होत नाही हा धूर! किती स्ट्राँग सुवास आहे याचा..”

“ अरे हे धुपन, आरतीचे मंत्रोच्चार घरातील वातावरण पवित्र ठेवतात.”

“ अगं आई ,हे तू दादाला सांगतेय? एका पौराणिक संशोधकाला? या क्षेत्रात असूनही आजवर या दिव्य गोष्टी त्याला कधी पटल्या का?”

“ जाऊ दे नेहा,कधी ना कधी नक्की पटतील त्याला या गोष्टी !अगं देव पाठीशी होता म्हणून तर आजवर त्याने अनेक संकटं समर्थपणे पेलली.लोकांचा रोष,समाजाचा तिरस्कार, प्रसार माध्यमांच्या अवाजवी चर्चा आणि काय काय..सत्याचा तसेच न्यायाचा शंख वाजवण्याची ताकद फक्त माझ्या निरंजनमध्ये आहे.त्याचे बाकीचे कलिग तर पळपुटे आहेत.”

“ वाह म्हणजे माझी मेहनत काहीच नव्हती,सगळं देवानेच केलं?” निरंजन

“ तसं नाही रे,तुझ्या ज्ञानाला जोड होती ती(छातीवर हात ठेवत,नमस्कार करत)माझ्या परमेश्वराची!”

“ आई,तशीही तू नेहमी पोथी-पुराण वाचत असतेच; मग हे चिरंजीवी कोण आहेत गं?” निरंजन

“ आ.. आज चक्क तू आईला हा प्रश्न विचारतोय?यावरही काही संशोधन करायचे आहे की काय?”नेहा

“अगं नेहा,मी जस्ट विचारलं.आमच्या मित्रांपैकी एकाने मला एक पुस्तक वाचण्यासाठी म्हणून भेट दिलंय,’चिरंजीवी’ नावाचं. आता एवढं कोण वाचत बसेल? म्हणून म्हंटलं आईला माहित असेलच..”

“ जिज्ञासेपोटी का होईना विचारलेस ते महत्वाचे! मग ऐक,नेहा तू सुद्धा ऐक..

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान्श्च विभीषण:।
कृप: परशुरामश्च सप्तैतै चिरजीविन:॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जितः||”

“ बापरे! हा तर संस्कृत श्लोक आहे?”निरंजन

(उपहासाने हसत)“ तुझ्या इंग्लिश मेडीयममध्ये संस्कृत नव्हतं हो ना ?” नेहा

“ अगं मी मराठीत सांगते या श्लोकाचा अर्थ! ऐका,
या मंत्राप्रमाणे आठ चिरंजीव आहेत.मी सगळंच डिटेल सांगते तुम्हाला.ठीक आहे?”

“ हो चालेल..” निरंजन

“चिरंजीव म्हणजे अमर.त्यांची नावे सांगते ( बोटांवर मोजत) महाबली राजा,व्यास,विभीषण,परशुराम,मार्कंडेय ऋषी,अश्वत्थामा
,महाबली हनुमान आणि कृपाचार्य.”

“ हो,झाले बरोबर आठ..”नेहा

“ आता हे जे आठ अमर आहेत ना त्यांना अस्थ चिरंजीव म्हंटले जाते.ते एका सत्ययुगातून दुसऱ्या सत्ययुगात प्रवेश करतात,ही प्रक्रिया अर्थात निरंतर आहे.त्यामुळे,ते अजूनही पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.”

“कसं शक्य आहे हे आई?” निरंजन

“ जसं तुमच्या सायन्समध्ये शक्य असतं ना अगदी तसंच..”

( मान नकारार्थी डोलवत)“आई ,तू मला काही जिंकू देणार नाहीस..”निरंजन

“ आता बघा,यात मी एक बदल सांगते. महाबली राजा,व्यास,विभीषण,परशुराम,अश्वत्थामा
,महाबली हनुमान आणि कृपाचार्य यांच्यामध्ये आठवे चिरंजीवी म्हणुन मार्कंडेय ऋषींना स्थान आहे. या सर्व चिरंजीवींच्या केवळ स्मरणाने दुर्धर व्याधी दूर होते तसेच संकटांचा नायनाट होतो,हा या श्लोकाचा अर्थ आहे.”

“ ते सगळं ठीक आहे पण मला हे सारे कोण आहेत ते जरा सांगशील का?”निरंजन

“ हो सांगते.”

“ ए पण जरा थोडक्यात सांग हं आई.”निरंजन

“ बरं.वेद व्यास हे एक तपस्वी ऋषी होते.त्यांनी ऋग्वेद,सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद लिहिले. लंकेमध्ये हनुमानाने सीतेला रामाचा संदेश दिला होता.तेव्हा सीतेने हनुमानाला अमर राहण्याचा वर दिला होता. महाभारतात कृपाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु होते. आपल्या तपस्येच्या बळावर त्यांनी अमरत्व प्राप्त केले. महाबली राजाने वामनदेव या भगवान विष्णूंच्या अवताराला आपले सर्वस्व दान केले होते. रावणाचा लहान भाऊ विभीषण यांना रामाच्या भक्तीमुळे अमरत्व प्राप्त झाले होते. भगवान विष्णूंचा अवतार असलेले परशुराम यांना देखील अमरत्व प्राप्त झालेले आहे. द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा यांना भगवान श्रीकृष्ण यांनी भळभळती जखम घेऊन, दुःखी अवस्थेत सृष्टीचा अंत होईपर्यंत भटकत राहण्याचा शाप दिला होता. मार्कंडेय ऋषी यांनी महामृत्युंजय मंत्राची रचना केली व घोर तपस्येने भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून अमर राहण्याचा वर मागितला.”

“ बापरे!असे आहे होय.कमाल आहे
आई,तू एवढी आस्तिक आहेस मग मी नास्तिक कसा?”निरंजन

“ बेटा,मनुष्य नास्तिक नसतोच मुळी.त्याच्या अंतरंगात सातही तीर्थ समाविष्ट असतात,त्यामुळे त्याच्यात देवाचा अंश असतोच.फरक एवढाच काही जण अंतरंगातील ईश्वराला जाणतात आणि काही जण जाणत नाहीत.”

“ आई,तू खरंच छान समजावून सांगतेस पण एक सांगू तुझा मुलगा पौरोहित्य वगैरे करणारा हवा होता, पौराणिक संशोधक तर मुळीच नाही.”नेहा

“ माझा मुलगा जसा असेल तसा मला आवडतो. येणारा काळ प्रत्येक माणसाला योग्य समज देतोच..”

“ आणि आई, मी नाही आवडत तुला?” नेहा

“ हो गं राणी,तू ही आवडतेस..”आई

आईने निरंजन आणि नेहाला जवळ घेत प्रेमाने गोंजारले.

चिरंजीवी आणि भगवान कल्की यांचा काय संबंध?निरंजन या अद्भुत लढ्याचा मुख्य दुवा होता का?

क्रमशः