कल्की - एक अनावृत रहस्य(भाग ४ अंतिम)

भगवान कल्की यांच्या प्रकटीकरणाचे रहस्य
असेच काही दिवस गेले.आजूबाजूला पापाचा स्वैराचार वाढतच होता. पेपरमध्ये रोज याच बातम्या येत होत्या.सारे काही इतके अचानक घडत होते की काहीतरी हालचाल करून यावर मार्ग काढणे अगदी अशक्यप्राय झाले होते.सर्व नागरिक हतबल होऊन केवळ देवाचा धावा करत होते पण सर्वांचाच काळ आलेला होता.काली असुर फारच बळावलेला होता . त्यामुळेच त्याचा नायनाट करून हा अंधःकार दूर करण्यासाठी, धर्म प्रस्थापित करण्यासाठी कल्की भगवान प्रगट होणे गरजेचे होते.

*** वर्तमान दिवस***

सचिन तसेच निरंजनच्या शेजारी राहणारे जोशी काका अग्नीहोत्र हवन करण्यासाठी कसेबसे आपला जीव वाचवून त्याच्याकडे पोहोचलेले होते.

अचानक समोर त्याला कल्की अवतारात पाहून सारेच अवाक् झाले.

“ तू कल्की आहेस?” निरंजन

“ हो निरंजन. मीच आहे कल्की.” सचिन

निरंजनची आई तसेच जोशी काका आणि काकू कल्की भगवानच्या दर्शनाने जणू काही हा जन्म भरून पावले होते.त्यामुळे कुठलेही आश्चर्य,चिंता,भीती आता त्यांना सतावत नव्हती.

“ हे भगवान,ही पापी शक्ती पसरवणारा काली असुर कोण आहे?”निरंजनची आई

“ तोही लवकरच कळेल तुम्हाला..”कल्की भगवान

भगवान कल्की यांनी सर्वांना एक चित्रफीत दाखवली.

“ हा काली राक्षस आहे?”निरंजन

“ हो..” कल्की भगवान

“ म्हणजे त्यांनी मला त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून तुमचा शोध घ्यायला सांगितला? वर्मा सरांनी? म्हणजे वर्मा सर काली राक्षस आहेत?”निरंजन

“ हो..”

“एक मिनिट.तुझे गाव तर संभळ…ओह माझ्या लक्षात कसं आलं नाही की कल्की भगवान देखील याच गावात जन्मले म्हणून? तू तुझे हे रहस्य इतके दिवस का लपवले?बरं वर्मा सरांनी असं का करावं? ते तर असे कधीच नव्हते..तू तेव्हाच का रोखलं नाहीस हे सगळं? इतक्या लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत होतास का तू? मला तर अजूनही हे सारं थोतांड वाटत आहे.”निरंजन

“ निरंजन याला कर्मयोग म्हणतात.ज्याच्या हातून जेव्हा जे घडायचे ते,तेव्हा आणि फक्त तेव्हाच घडते.”कल्की भगवान

“अच्छा! मग तुमच्या दोघांमध्ये असणारा मी कोण आहे?”निरंजन

“ तू?(अतिशय सौम्य मुद्रेत हसत)तू आमच्यातील एक महत्वाचा दुवा आहेस. या महायुद्धाचा सारथी म्हंटले तरी चालेल..”कल्की भगवान

“ देवा,आता प्लीज हे सारं थांबवा.बाहेर सर्व जग अस्थाव्यस्त झालेलं आहे.”जोशी काका

“ हो..( डोळे मिटत,शांत होत..)
सदा चिरंजीवी भव|”

“ आता हे काय?”निरंजन रागातच बोलला.

“ निरंजन, काली राक्षस समूळ मिटवायचा असेल तर मला चिरंजीवींना बोलवावे लागणार,त्यांची मदत घ्यावी लागणार…

सदा चिरंजीवी भव|”

आणि काय आश्चर्य! आठही चिरंजीव भगवान कल्की यांच्यासमोर प्रगट झाले आणि एक एक जण स्वतःचा परिचय देऊ लागले.

“ भगवंत,मी परशुराम. महेंद्र पर्वतावर वास्तव्यास असताना आपल्या या युद्धाचा मी सतत मागोवा घेत होतो.आपल्यासाठी तसेच धर्माचे प्रस्थापन करण्यासाठी मी सर्वतोपरी तयार आहे.”

“भगवंत,मी बली. पाताळमधील सुतल लोक येथे मला वास्तव्य देऊन तुम्ही मला जो उपहार दिला होता,त्याचे ऋण फेडण्याची वेळ हीच आहे.मी आपल्यासमोर सर्वार्थाने मदतीसाठी तयार आहे.”

“ भगवंत,मी श्री हनुमान.गंधमाधन पर्वतावर वास्तव्यास असताना तुमच्यातील रामाच्या अंशाचे दर्शन घेण्यासाठी मी आजच्या या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो.भगवान श्रीरामांनी सांगितलेले धर्मपालनाचे वचन मी आजही या लढ्यात तुम्हाला साथ देऊन पूर्ण करणार आहे.”

“ भगवंत,मी विभीषण.महाभारतात माझे अस्तित्व होते त्यावेळी युधिष्ठिर राजाच्या राजसू यज्ञाच्या वेळी माझी भेट सहदेव यांच्याशी झाली होती.माझ्या जीवनाचा, अमरत्वाचा उद्देश धर्माचे मार्गदर्शन आणि कल्की देवाची सहाय्यता हाच आहे.”

“ भगवंत मी अश्वत्थामा. मध्यप्रदेशच्या असिर्गढ किल्यावर भळभळती जखम घेऊन फिरत असताना तुमचे मदतकार्याचे आर्जव कानी पडले आणि आपल्यासमोर प्रगट झालो.”

“ भगवंत,मी कृपाचार्य. महाभारतात मी सेनापती ही भूमिका बजावली होती.आज हीच भूमिका या युद्धात देखील घेत आपणास साथ देऊ इच्छितो.”

“ भगवंत,मी वेद व्यास.चारही वेदांचा लेखक आणि १८ पुराणांचा रचयिता.माझे इथे येण्याचे प्रयोजन म्हणजे आपली गाथा याची देही याची डोळा अनुभवणे! जेणेकरून येणाऱ्या सत्ययूगात मी लोकांना सांगू शकेन की कशा प्रकारे कल्की अवताराने धर्माची स्थापना केली.हे सत्कार्य करण्यासाठी काय काय केले? तसेच त्यांच्या मदतीसाठी कोण कोण आले?”

“ भगवंत,मी मार्कंडेय.माझी आपल्यावरील भक्ती आणि दृढनिश्चय पाहून आपण माझ्यासमोर प्रकट झालात आणि तेव्हा मी यमाचा पराभव केला.तुम्ही मला अनंतकाळचे जीवन दिले. त्या दिवसापासून, मी स्वत: ला शिवाला समर्पित केले आहे,तुमच्यातील अंशाला आपले सर्वस्व बहाल केले आहे.”

एव्हाना आठही चिरंजीव, कल्की भगवान आता एका महाकाय युद्धासाठी सज्ज झाले होते.परस्परांची ओळख,त्यांचा अमरत्वाचा हेतू स्पष्ट झाल्यावर निरंजनच्या घरात महान योद्धांची मांदियाळी नवे युग प्रस्थापित करणार हे दर्शवत होती.

“देवांची अनुभूती होणे हा जणू काही एक पवित्र चमत्कार असतो आणि तो केवळ भाग्यवंतांच्याच प्रारब्धात असतो.भरून पावले हो देवा मी.हे सारे संकट लवकर दूर होऊन विजयी टिळा लावूनच परत या.” निरंजनची आई

निरंजनच्या आईने सर्व देवतांचे यथोचित पूजन केले आणि सारे युद्धासाठी निघाले.

निरंजनच्या आईचा आशीर्वाद या युद्धाच्या वलयात एक वेगळीच अमृतवाणी ठरला.कल्की भगवान,आठ चिरंजीव आणि निरंजनरुपी सारथी मोठ्या शौर्याने काली राक्षसाविरुद्ध अथक, शर्थीची लढत देत अंततः विजयी झाले.

सत्य,धर्म आणि निती या त्रिसूत्रीवर आधारित नूतन युग स्थापिले गेले आणि निरंजनला या नव्या युगाचा अधिपती म्हणून नेमण्यात आले.

कल्की नावाचे अभिलिखित सत्य अगदी रहस्यमयरित्या प्रगट होऊन जणू साऱ्या सृष्टीला वरदान ठरले.

समाप्त..

( प्रस्तुत कथेत पौराणिक संदर्भ खरे असले तरीही कथा पूर्णतः काल्पनिक आहे.कथेचे हक्क पूर्णतः लेखिकेकडे राखीव आहेत.)

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all