Login

कल्की भाग १

ही एक रहस्य कथा आहे.
कल्की

भाग:१

आपल्या तोंडावर अचानक पाणी पडल्याने रमा शुद्धीवर आली. चेहऱ्यावरचे पाणी पुसत तिने डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले.

घनदाट रानातून जाणाऱ्या एक निर्जन रस्त्यावर ती आडवी होती. तिच्या सभोवती खूप पोलिस दिसत होते. दूर काही लोकांनी पण गर्दी केली होती. त्यांना सगळ्यांना पाहून ती जराशी घाबरली.

तिला शुद्धीवर आल्याचे पाहताच एका कॉन्स्टेबलने तिला धावत जाऊन पाणी आणून प्यायला दिले.

"सर, ती शुद्धीवर आली आहे. " कॉन्स्टेबलने इन्स्पेक्टर नाईकला हाक मारली.

नाईक फोनवर बोलत होता. त्याने ताबडतोब फोन बंद केला आणि धावत रमापाशी आला.

कॉन्स्टेबलने आपली डायरी उघडली, पेन हातात घेतला आणि तो इन्स्पेक्टर नाईकच्या प्रश्नांची वाट पाहू लागला.

रमाने पाण्याची बाटली खाली ठेवली.

"आता कसे वाटत आहे? तू ठिक आहेस ना?" नाईकने विचारले.

रमाने होकारार्थी मान हलवली.

"नाव काय तुझे? आणि कुठे राहतेस?" नाईकने तिच्याकडे बघत विचारले.

" मी रमा. रमा राजाध्यक्ष. सत्तरीला राहते." रमाने शांतपणे उत्तर दिले.

"रमा, इथे नेमके काय घडले आहे? आणि त्याची हत्या कोणी केली?" नाईकने एका पांढऱ्या कपड्यात झाकलेल्या मृतदेहाकडे बोट दाखवित म्हटले.

" काय? त्याने महेशला मारले?" रमाने भितीदायक चेहऱ्याने मृतदेहाकडे पाहिले.

"कोणी मारले महेशला? सांग रमा." रमाचे बोलणे ऐकून नाईकने लगेच प्रश्न केला.

" कल्कीने..." रमाने काहीतरी आठवत उत्तर दिले.

" कल्की? कोण कल्की?" नाईकला ते नाव जरा विचित्रच वाटले.

" मला माहित नाही. मी गेल्या दोन दिवसापासूनच ओळखते त्याला, पण साहेब, कल्कीची काहीच चूक नव्हती." रमा आपले डोळे पुसत म्हणाली

"ओके रिलॅक्स, पण तुला तो कसा आणि कुठे भेटला होता? जरा सांगशील का? " नाईक

" हो. नक्कीच इन्स्पेक्टर साहेब." रमाने सर्व काही नाईकला सांगायला सुरुवात केली आणि ते सांगत असताना ती पण आपल्या भूतकाळात शिरली.

***************

रमा रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी होती. पण तिच्यात एक पाऊलही पुढे टाकण्याची हिंमत नव्हती. एका मागून एक सुसाट वेगाने गाड्या धावत होत्या. रस्त्यावरचे मोठमोठे अवजड ट्रक तर तिच्या मनात धडकी भरत होते.
जवळ जवळ ५-६ मिनिटे तरी ती तशीच तिथे उभी होती.

'रस्ता क्रॉस करावा तरी कसा?' हा प्रश्न तिच्यापुढे उभा होता. खरे म्हणजे रस्ता क्रॉस करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. लहानपणापासून आतापर्यंत तिला तिच्या वडिलांनी केव्हाच एकटीला रस्त्यावर फिरायला दिले नव्हते. तिचे वडील तिला तळहातावरच्या फोडासारखे जपत होते.

तिला कॉलेजात सोडायला, परत घरी न्यायला तेच येत होते, पण वीस-पंचवीस दिवसांपूर्वी तिचे वडील एका अपघातात वारले आणि आज प्रथमच ती वडील बरोबर नसताना बाहेर पडली होती.

वडिलांच्या आठवणीने तिच्या डोळ्यात परत अश्रू आले, पण दुसऱ्याच क्षणी तिला तिच्या आजीचे शब्द आठवले.

" रमे, आता तुझे बाबा नाहीत. यापुढे तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आता तुला एकटीलाच सामोरे जावे लागेल. कोणतेही संकट आल्यास श्रीहरीचे नाव घे आणि पुढे जा."

रमाने दीर्घ श्वास घेतला आणि आपले डोळे बंद केले.

"ॐ नमो भगवते वासुदेवाय."

तिने थरथरत पहिले पाऊल टाकले. गाड्यांच्या भितीने तिला स्वतःचे पाऊल खूपच जड भासू लागले, तेव्हाच तिला मागून कोणीतरी हाक मारली.

" एस्क्युज मी! मी मदत करु का तुला? खूप वेळ झाला तू इथेच आहे. चल ये मी तुम्हाला पलीकडे पोहचवतो." असे म्हणत त्याने रमाचा हात धरला आणि रस्ता क्रॉस केला.

रमाच्या जीवात जीव आला.

"थॅंक्यू व्हेरी मच. सांगायचे झाल्यास मला रस्ता क्रॉस करताच येत नाही. माझे बाबा मला इथे सोडायचे." रमाने सरळ सांगून टाकले.

" मग, आज बाबा नाहीत का?"

" नाही. वारलेत ते." हे सांगताना रमाचे डोळे परत भरुन आले.

"ओह! आय ॲम सॉरी..." त्याला वाईट वाटले.

" इट्स ओके. आज तू आला नसतास तर कदाचित मी दिवसभर तिथेच थांबले असते. बाय द वे, मी रमा. तुझे नाव काय?" रमा.

"कल्की."

" कल्की?श्रीहरी विष्णूचा दहावा अवतार?" रमाने जरा आश्चर्यानेच विचारले.

"व्हॉट?" त्याला रमाचे बोलणे समजलेच नाही.

"काही नाही. तू याच कॉलेजमध्ये शिकतोस का?" रमाने आपल्याच वेडेपणावर हसत विचारले.

" हं. तर मैत्री करणार का माझ्याशी?" त्याने आपला हात पुढे करत रमाला विचारले.

" हो. नक्कीच फ्रेंड्स. " रमाने त्याच्या हातावर आपला हात ठेवला.

एक वेगळाच स्पर्श होता तो. त्या हातामध्ये एक उर्जा होती. असा स्पर्श तिने आजपर्यंत कधीही अनुभवला नव्हता. असे वाटत होते, की त्या स्पर्शात एक सकारात्मक दैवी शक्ती आहे.