Login

कल्की भाग ३ अंतिम भाग

ही एक रहस्य कथा आहे
कल्की

भाग:३


काही वेळाने इन्स्पेक्टर नाईकने रमाच्या कॉलेजमधील प्रिन्सिपलना फोन लावला.

" मॅडम, मी इन्स्पेक्टर नाईक बोलतोय. तुमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा खून झाला आहे. हे तुम्हाला माहित असेलच." नाईक.

" हो सर. ऐकले आहे मी." प्रिन्सिपल.

" आता यावेळी तुम्ही कुठे आहात?" नाईक.

" मी परत कॉलेजमध्ये आले आहे." प्रिन्सिपल.

" मॅडम, आम्हाला तुमची जराशी मदत हवी आहे. तुमच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कल्की नावाच्या एका विद्यार्थ्याने ही हत्या केली आहे, असा आम्हाला संशय आहे. जरा कल्कीबद्दल अधिक माहिती देऊ शकता का तुम्ही?" नाईकने विनंती केली.

" नाव काय म्हणालात? कल्की ना?" प्रिन्सिपल.

"हो. कल्की " नाईक

" एक मिनिट. बघते हं." प्रिन्सिपलने आपल्या लॅपटॉपवर कल्कीचे नाव टाकून शोधायला सुरुवात केली.

" आय ॲम सॉरी इन्स्पेक्टर नाईक. कल्की नावाचा आमच्या कॉलेजमध्ये एकपण विद्यार्थी नाही." खूप वेळ शोधल्यानंतर प्रिन्सिपल म्हणाल्या.

" कदाचित रमाला त्याने आपले खरे नाव सांगितले नसणार. इट्स ओके. थॅन्क्यू व्हेरी मच मॅडम." नाईक

नाईकने फोन ठेवला आणि तेव्हाच त्याला कॉन्स्टेबलचा फोन आला.

" सर, आम्ही निशांतला अरेस्ट केले आहे." कॉन्स्टेबल

" ओके. व्हेरी गुड. कल्कीची मात्र अजून काही माहिती मिळालेली नाही. मी येतो पोलिस स्टेशनवर." नाईक.

*******

निशांत डोके खाली घालून बसला होता. रमा पण तिथेच होती.

"जास्त हिरोगिरी करायची हौस ना तुला. आता नाईक सर तुझ्यातली मस्ती कशी जिरवतात ते बघ." कॉन्स्टेबल.

तेव्हाच नाईक पोलिस स्टेशनवर पोहचला. आत आल्याबरोबरच त्याने निशांतच्या कॉलरला पकडले.

"काय? कसला खेळ खेळत होता? मुलींची छेड काढण्यासाठी कॉलेजमध्ये जाता का तुम्ही?" नाईकने आपले दात ओठ दाबत विचारले.

" सर, माझ्या डोळ्यांसमोर मित्राचा खून झाला आहे." निशांतने एका दमात सांगितले.

"माहीत आहे आम्हाला. कुठल्या दिशेने गेला आहे तो? त्याच्याबद्दल काही माहिती आहे का?" नाईकने विचारले.

" कोण? " निशांत.

" कोण म्हणजे? कल्की. महेशचा खून केल्यानंतर कुठल्या दिशेने धावला तो?" नाईक जवळजवळ ओरडले.

"कोण कल्की? महेशला कल्की बिल्कीने नाही. या रमाने मारले आहे." निशांत रमाकडे बोट दाखवत म्हणाला.

" खोटं बोलत आहे हा..." असे म्हणत रमा निशांतच्या अंगावर धावून गेली.

दुसऱ्याच क्षणी तिचे हावभाव बदलले. शांत स्वभावाच्या रमाने अचानक रौद्ररुप धारण केले.

"नालायका, त्याला रमाने नाही. मी मारले आहे. या कल्कीने त्याचा वध केला आहे. तू माझ्या हातातून निसटला. नाहीतर तुझी पण तिच गत झाली असती." रमा डोळे वटारुन म्हणाली.

रमाचे शब्द ऐकून नाईक बुचकळ्यात पडले. दोन कॉन्स्टेबलनी येऊन हिंसक बनलेल्या रमाला पकडून ठेवले.

********

चार दिवसांनी नाईक रमावर उपचार करणाऱ्या मनोचिकीत्सक डॉ.पणजीकरला जाऊन भेटले.

" डॉक्टर, रमाला नेमके काय झाले आहे?" नाईकने प्रश्न केला.

"तुम्हाला सांगायचे झाल्यास रमाला एक वेगळाच रोग झाला आहे. हा एक मानसिक रोग आहे. या रोगाला 'स्किजोफ्रेनिया' असे म्हणतात. ज्यात व्यक्तीला असे ऐकायला येते, पाहायला येते, किंवा जाणवते, जे प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. रमाने पण आपल्या मनात एक अशीच काल्पनिक व्यक्ती तयार केली आहे. जी अस्तित्वातच नाही." पणजीकर.

" मी समजलो नाही डॉक्टर. " नाईक अचंबित झाले.

"सांगतो. रमा ही एक खूपच शांत स्वभावाची मुलगी. हळवी. लहानपणापासून ओव्हर प्रोटेक्टेड. माशी सुध्दा मारायला घाबरणारी. सोशिक. तिच्यात समाजाविरुद्ध लढण्याची शक्ती नाही, त्यामुळे ती सर्वांच्या चेष्टेचा, मस्करीचा विषय बनली गेली आणि याच कारणाने तिने स्वतःला एकटेपणाच्या पिंजऱ्यात कैद करुन ठेवले. तिला कोणी मित्रमैत्रीणी नव्हत्या. काही दिवसापूर्वीच तिचा एकमेव आधार, तिचे वडील वारले. याचा तिच्या मनावर खूप परिणाम झाला. या समाजात आता आपले कसे होणार याच पेचात असतानाच, तिच्या मनाने एक काल्पनिक व्यक्ती जन्माला घातली. कल्की. ज्याच्या कथा ती आजीकडून लहानपणापासून ऐकत होती. तिच्या मनातल्या या कल्कीला तिने आपल्या मनाप्रमाणे रुप दिले. रमा स्वभावाने शांत, तर कल्की तिच्या अगदी विरुद्ध. निडर, धाडसी आणि मर्दानी. समोर येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला तोंड देणारा." पणजीकर.

" म्हणजे? कल्की ही एक रमाने तयार केलेली काल्पनिक व्यक्ती आहे?" नाईक.

"हो. तिच्या मनाने तयार केलेली व्यक्ती. जी तिच्याशिवाय कोणालाच दिसत नाही. पण तिला एकदम जिवंत भासते. कल्की तिला दिसतो, तिच्याकडे बोलतो. तिला पाहिजे तेव्हा मदत करायला येतो. सांगायचे झाल्यास जेव्हा जेव्हा रमा अडचणीत असते, तेव्हा तेव्हा कल्की येतो. जे काम रमा करु शकत नाही, ते काम कल्की करतो." पणजीकर.

" पण डॉक्टर, स्त्री अशी पुरुषासारखी असू शकते?" नाईक.

"का नाही? शेवटी आपले शरीर आपल्या मनाच्या ताब्यात असते. आपल्या मनाला हवे तसेच आपले शरीर वागते, काम करते. उदाहरण द्यायचे झाल्यास आपले शरीर म्हणजे एक गाडी आणि मन म्हणजे त्या गाडीचा ड्रायव्हर.आता गाडी कशी चालवायची हे त्या मनाच्याच हातात असते." पणजीकर.

" रमाला कल्की ही एक काल्पनिक व्यक्ती आहे, हे माहित आहे का?"

" नाही. हा खून सुद्धा कल्कीने नाही, तर तिने स्वतः केला आहे. हे पण तिला माहित नाही." पणजीकर.

" ओह... म्हणजे आता या खूनाची शिक्षा कोणाला द्यायची? रमाला?" नाईक.

"नाही. कायदा तशी परवानगी देत नाही. रमा मानसिक दृष्टीने अनफिट आहे, हे 'मेडीकल सायन्स' सिद्ध करते. म्हणजे कायदा तिला शिक्षा देऊ शकत नाही." पणजीकर.

" आता पुढे काय डॉक्टर?" नाईक

" आता आम्हाला रमाच्या मनात असलेल्या कल्कीला काढून टाकले पाहिजे." पणजीकर.

******

जवळ जवळ तीन महिन्यांनी रमा बरी झाली. तिच्यावर उपचार करताना तिच्यातल्या कल्कीने पणजीकरला खूप त्रास दिला, पण अनुभवाच्या जोरावर कल्कीला तिच्या मनातून पुसण्यात पणजीकरला यश आले. रमा परत तिचे मूळ जीवन जगू लागली.

*******
निशांत आपल्या फ्लॅटवर होता. अकस्मात त्याच्या दाराची बेल वाजली. त्याने दार उघडले.

" ओह! रमा? आज स्वतः माझ्या कडे आलीस? चल, त्या दिवशी अर्धवट राहिलेले काम पूर्ण करुया."

"अर्धवट राहिलेले कामच तर पूर्ण करायला आलो आहे मी, पण मी रमा नव्हे.अथासौ युग-सन्ध्यायां, दस्यु-प्रायेषु राजसु, जनिता विष्णु-यशसो, नाम्ना कल्किर्जगत्पतिः"

आपल्या खिशातून रक्ताचे सुके डाग असलेला सुरा कल्कीने बाहेर काढला.


*****समाप्त*****
0

🎭 Series Post

View all