Login

कल्पित दुनिया

कल्पनेतील चंद्र अन् चांदण्याची दुनिया



कवितेचे नाव:- कल्पित दुनिया

कवितेचा विषय:- दोन ध्रुवांवर दोघे आपण

जिल्हास्तरीय कविता स्पर्धा फेरी २

चंद्राच्या कल्पित दुनियेत
स्वप्नरथावर स्वार होऊया..
चांदण्या राती निरव शांततेत
लुकलुकत्या ताऱ्यांना पाहूया..

मी होईल शुक्राची चांदणी,
तू चंद्र होशील का रे?
पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात
तू मजला साथ देशील का रे?

अमावस्येच्या गर्द काळोखात
आसमंताला स्वाधीन होऊया..
तू लपताच कृष्ण ढगात
लपंडावाचा खेळ मांडूया..

मी होईल तुझी रोहिणी,
तू माझा होशील का रे?
काळचक्री बदलत्या चंद्रकलेत
तू माझा साथीदार म्हणवशील का रे?

लख्ख शीतल प्रकाशात
एकांतात गुजगोष्टी करूया,
अनंत अवकाशी अंतराळात
कल्पनेच्या तारांगणातून बाहेर पडूया..

दोन ध्रुवांवर दोघे आपण दिसताच
तू मला दुरून पाहशील का रे?
मी होईन आठवणींची उल्कापात
निखळताना मला सावरशील का रे?

जिल्हा पालघर
©®नमिता धिरज तांडेल.