Login

कळते पण वळत नाही

कळते पण वळत नाही
चॅम्पियन ट्रॉफी 2025
लघुकथा
शीर्षक -कळते पण वळत नाही.

" वहिनी ए वहिनी लवकर ये."
शनाया आपल्या वहिनीला जोर जोरात आवाज देत होती.

" काय झालं वन्स, तुम्ही का ओरडत आहात?" श्रेया हातातील काम अर्धवट सोडून धावतच अंगणात आली.

" वहिनी, हे बघ आपल्या अंगणातील झाडावर भारद्वाज पक्षी बसला आहे. नमस्कार कर त्याला."

" आई नेहमी म्हणते, सकाळी सकाळी भारद्वाज पक्षी दिसला की, शुभ असतं. " शनाया आपल्या वहिनीला म्हणाली.

" बरं बाबा ठीक आहे. "

श्रेयाने त्या पक्ष्याला नमस्कार केला.

" जाऊ मी आता, बरीच कामं पडली आहेत." श्रेया म्हणाली.

हो, जा आता.

शिवम व शनाया दोघे बहिणभावंड. आई क्षमा व वडील शरदराव यांची ही दोन गोंडस मुलं.


क्षमा एक गृहिणी. शरदरावांची वडिलोपार्जित शेती होती. त्यात ते सतत मेहनत घेऊन चांगले उत्पन्न घ्यायचे. या दाम्पत्याला लग्नानंतर बरेच वर्ष मूल बाळ नव्हतं. सारखी सारखी नातेवाईकांकडून विचारणा, सततचे टोमणे या गोष्टीचा क्षमाच्या मनावर हळूहळू विपरीत परिणाम व्हायला लागला होता. ती सतत विचारात राहायची.

क्षमाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी परिचितांच्या सांगण्यावरून त्यांनी एक मूल दत्तक घेतले. दोघांनीही आवडीने त्याचे नाव शिवम ठेवले. शिवम आल्यापासून मात्र क्षमाच्या तब्येतीवर अनुकूल परिणाम दिसू लागला. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. बाळाला अगदी कुठे ठेवू नि कुठे नको असे तिला व्हायचे. ती शिवमला जराही नजरेआड होऊ द्यायची नाही. जरा कोणी आले, बाळाचे कौतुक केले तर ती लगेच बाळावरून मीठमोहऱ्या ओवाळून टाकायची. अर्थात हे सर्व ती अति काळजीपोटी, प्रेमापोटी करायची.

दिवसामागून दिवस जात होते. शिवम आता शाळेत जाऊ लागला. एक दिवस अचानक क्षमाला होणाऱ्या बाळाची चाहूल लागली. तिने ही गोष्ट शरदला सांगितली. दोघांनाही खूप आनंद झाला. हा शिवमचाच पायगुण असे क्षमा म्हणाली.

"हो क्षमा. काहीही असो, पण आता आपल्या घरात नव्याने पाळणा हलणार ही गोष्ट निश्चितच सुखावह आहे." शरदराव म्हणाले.

नऊ महिने पूर्ण झाले. क्षमाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. क्षमा आणि शरदने आवडीने तिचे नाव शनाया ठेवले. शिवमला खेळायला सोबत मिळाली होती. दोघा बहीण भावांच्या वयामध्ये बरेच अंतर होते. शनाया सहा वर्षाची झाली. तिला शाळेत टाकण्यात आले. दोघेही मुलं अभ्यासात खूप हुशार होती.

शिवम आणि शनाया दोघे बहिण भाऊ अगदी प्रेमाने राहत. शिवम शनायाची खूप काळजी घ्यायचा. शिवमचे शिक्षण पूर्ण झाले व त्याला चांगली नोकरी सुद्धा मिळाली. आता क्षमा व शरदला शिवमच्या लग्नाची घाई झाली होती. लवकरच एक चांगले स्थळ चालून आले आणि विज्ञानाची पदवीधर असलेल्या श्रेया नावाच्या मुलीशी शिवमचे लग्न पार पडले. शनायाला आता आणखी एक मैत्रीण मिळाली होती. श्रेया आपल्या छोट्या नंणंदेला खूप जीव लावायची. सतत तिच्या अवतीभवती राहायची. त्यामुळे क्षमाची काळजी दूर झाली. कारण शिवम प्रमाणेच शनायालाही ती खूप जपायची. शाळेव्यतिरिक्त कुठेही तिला जाऊ द्यायची नाही. आता मात्र श्रेया तिची काळजी घेत होती. अगदी बहिणीप्रमाणे त्या दोघी राहायच्या. शाळेतून घरी येताना तिला खाऊपिऊ घालून शनाया व श्रेया गप्पा मारायच्या.

"वहिनी एक गोष्ट सांगू का तुला?
आईला सांगू नको. " शनाया म्हणाली.

"वहिनी, मी शाळेत गेली, जराही कुठे बाहेर गेली की, आल्यावर आई माझी दृष्ट काढते. शिवमचीही दृष्ट काढते. अगदी लहानपणापासून म्हणजे मला समजते तेव्हापासून."

शनायाच्या बोलण्याचे श्रेयाला हसू आले. शनाया तुम्ही सुंदर आहात, कोणाची नजर लागू नये हा त्यामागचा हेतू. हसत हसत श्रेयाने शनायाचा गालगुच्चा घेत तिला समजावले.

" नाही गं वहिनी, शेजारच्या बाया कुजबुजत असतात, क्षमा खूप अंधश्रद्धाळू आहे म्हणून. मुलांना कुठे जाऊ देत नाही. त्यांना अति जपत असते ती. वगैरे वगैरे. "

"अहो वन्स, तुम्ही लोकांचे बोलणे मनावर घेऊ नका. तुमची सतत काळजी असते आईला. म्हणून त्या करतात तसे. कोणी जर त्याला अंधश्रद्धा म्हणत असेल,तर मी नाही मानणार ही गोष्ट."

"दृष्ट काढणे, मीठ मोहऱ्या ओवाळून टाकणे म्हणजे आपल्या आईचे आपल्यावर किती प्रेम आहे, आपली आईला किती काळजी आहे अशी मुलांची भावना बनते आणि मुलं जर त्यामुळे सुखावत असतील तर मीठ मोहऱ्यांनी दृष्ट काढणे गैर नाही. ही अंधश्रद्धा असेलही तरी त्यामुळे नुकसान नाही ना."

" मग वहिनी, अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय गं?"

"अहो वन्स, अंधश्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवणे. जी गोष्ट डोळ्यांनी दिसत नाही, तरी आपण त्या गोष्टीवर जर विश्वास ठेवत असू तर ती अंधश्रद्धा. म्हणून श्रद्धा असावी पण डोळस, अंध नको. डोळस श्रद्धा म्हणजे आपण जर मंदिरात गेलो तिथे आपण देवाला नमस्कार केला, तर ही झाली देवाप्रति श्रद्धा. डोळस श्रद्धा.

अंधश्रद्धेचा विषय निघताच कुतूहलाने क्षमा सुद्धा त्या दोघींच्या जवळ येऊन बसली.

श्रेया म्हणाली,
"आई, तुम्ही खूप साध्या भोळ्या आहात. तुमच्या सांगण्यावरून तुम्हाला बरेच वर्ष मूल झालं नाही. तुम्हाला नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागले. त्यामुळे तुम्ही अगदी निराश झाला होता. वैफल्यग्रस्त झाला होता. आता मूल न होणे हे तुमच्या हातात होतं का? बऱ्याच जणींना काही वर्ष वाटही पहावी लागते.

"हो सुनबाई, बरोबर आहे तुझे." क्षमा म्हणाली.

"आई, म्हणून तुम्ही आपल्या मुलांना खूप जपायच्या. त्यामुळे लोकं तुम्हाला नावं ठेवत की, ही बाई अंधश्रद्धाळू आहे म्हणून."

"होय गं श्रेया, म्हणून तर अंधश्रद्धा हा शब्द ऐकल्या बरोबर मी तुमच्यामध्ये येऊन बसली." क्षमा म्हणाली.

"अगं त्याही वेळी आम्हाला बऱ्याच लोकांनी गंडे दोरे, बुवाबाजी याबद्दल सल्ला दिला होता.

"अहो आई. हीच अंधश्रद्धा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजसुद्धा अशाच विषयावर समाज प्रबोधन करत. आई, याशिवाय अनेक शकुन अपशकुन आहेत. मांजर आडवी जाणे, कुत्र्याचे बेसूर स्वरात केकाटने, किलकिला पक्षी घरावरून ओरडत जाणे. हे सर्व अपशकुन अंधश्रद्धेतून जन्माला आले आहेत. तुम्ही चांगल्या कामासाठी निघालात हे मांजरीला कळतं का? ती बिचारी आपल्या भक्ष्यासाठी इकडून तिकडे फिरत असते. कधी कधी कुत्र्याच्या पोटात दुखत असेल, त्याला काही व्याधी झाली असेल कारण तो ही एक जीव आहे, म्हणून तो ओरडतो बिचारा. पक्षांचा विणीचा हंगाम ( प्रजनन काळ) असतो. अशावेळी ती घरटी बांधतात. असेच एखाद्या घराच्या आसपास त्या पक्षाचे घरटे असेल तिथून तो ओरडत जाणारच नां. ती एकप्रकारे पक्षांची भाषा असते.

"आई, तुमचा जन्मपत्रिकेवर विश्वास आहे का ?"
श्रेयाने विचारले.

"आई, बरेच जण आजही जन्म पत्रिका पाहून लग्न जुळवतात. माझ्या आई वडिलांचा तर जन्म पत्रिकेवर मुळीच विश्वास नाही. माझ्या आई-बाबांनी माझी जन्म पत्रिका सुद्धा काढली नाही. अहो आई, नुकतीच भारताने अंतराळ क्षेत्रात गरुडझेप घेऊन चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करून दाखवले आणि जगात दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश म्हणून नावलौकिक मिळवला, त्या ठिकाणी तिरंगा फडकवून देशाचे नाव उज्वल केले, मात्र आजही लग्नाचा विषय आला की, पत्रिका बघितली जाते. ३६ गुण मिळतात कां ? हे पाहिले जाते. कशाला? तर उगाच पुढे त्रास नको म्हणून. खरंतर वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी जोडीदाराचा परस्परांवर विश्वास, प्रेम आणि जुळवून घेण्याची तयारी हवी. तिथे कुंडलीतील ग्रह तारे काय करणार ? यासाठी खरोखरंच आत्मपरीक्षण गरजेचे आहे. त्यापेक्षा मुला मुलींवर योग्य ते संस्कार करा. त्यांना मोठ्यांचा आदर करायला शिकवा. संसार म्हटला की, तडजोड आलीच हे तिच्या मनावर बिंबवा.

आई, आज विविध कारणांमुळे लग्न जुळणे कठीण होऊन बसले आहे. त्यात हजारो मुलामुलींची लग्न तर ग्रहदशेमुळे जमत नाही. विशेष म्हणजे पत्रिका बघून, सर्व लग्नविधी यथासांग पार पाडूनही काही दिवसातच प्रकरणे घटस्फोटापर्यंत जातात. ही शोकांतिका आहे.
" कळते पण वळत नाही " अशी समाजाची स्थिती आहे.

"श्रेया, आम्ही आमच्या मुलांची जन्मपत्रिका काढली नाही आणि तुझ्या आई-वडिलांनाही तुझी जन्मपत्रिका मागितली नाही. तरीसुद्धा तुमचे किती छान सुत जुळले. आम्हाला अगदी नक्षत्रासारखी सून मिळाली." शरदराव आत येत म्हणाले.

" बाबा तुम्ही ? कधी आलात?"

"श्रेया, तुझ्या सर्व गोष्टी ऐकल्या मी. किती छान समजावून सांगितले तू . अगं क्षमा, आता तू तुझ्या सुनेची ही दृष्ट काढ बरं." शरदरावांचे बोलणे ऐकून ती म्हणाली,
"काय हो बाबा, तुमचंही काहीतरीच." श्रेया सोबत सर्वजण हसू लागले.
समाप्त
सौ. रेखा देशमुख
0