Login

कामाचं मोल (भाग १)

कथा आवडल्यास कंमेंट नक्की करा.....
आज अश्विन तावतावनंच बेडरूममध्ये आला.... त्याच्या चेहऱ्यावर राग,चिडचिड,अस्वस्थता आणि असहायता,सगळे भाव एकत्रितच उमटले होते.....
"अरे,आलास तू....?" शताब्दीने बेडवरून बसल्या बसल्या विचारलं....
पण तिच्या प्रश्नाला उत्तर न देता अश्विन स्वतःच्याच लहरीत आणि विचारांत मग्न होता.... आतल्या आत त्याचा जळफळाट सुरू होता....
"आशू...? काय रे.... काय झालं.....?" शताब्दीने पुन्हा शांतपणे त्याला भानावर आणत विचारलं....
"तुला माहित असेलंच ना आजचा प्रकार....? मी पुन्हा काय सांगू....?"
शताब्दीच्या चेहऱ्यावर भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह पाहून अश्विन आणि वैतागला.....
"अगं या सुंदरा बाईंना पैसे मोजूनपण काम नीट करता येत नाही का.....? वरणात मीठ कमी होतं.... कमी काय,नव्हतंच मुळी.... तशीच ती मंजुळा..... कधी डब्याला साबणाचे ठसे तर इस्त्री केलेल्या शर्टला दोन घड्या जास्त.... शंभर वेळा सांगूनही रुमाल मोजे जागेवर ठेवत नाही.... दोन महिने होत आले आता दोघींनाही कामावर ठेऊन....."
'अस्सं झालं होय..... अरे देवा..... हा माणूस आभाळ कोसळल्यासारखा गडगडतोय.... काय करावं याचं....?' स्वतःशीच म्हणत शताब्दीने मनातल्या मनात कप्पाळावर हात मारून घेतला.....
"अरे असूदे अश्विन.... होतं कधीतरी.... त्या पण घाईत असतात.... त्यांनाही त्यांच्या घरची कामं आटोपून आणि पुढे दुसऱ्या घरी कामांना जायचं असतं.... आईंच्या,माझ्या हातून नाही का कधीतरी असं झालं.....?"
"तेच तर ना..... तुमच्याकडून झालं तर मी तुम्हांला दोघींना जाब विचारू शकतो, विचारतो.... पण माझे हात अडकलेत ना..... मी नाही त्यांना बोलू शकत,त्याचा फायदा घेताहेत...."
'अच्छा....... म्हणजे त्यांच्या ह्या क्षुल्लक चुकीमुळे तू आम्हांला दोघींना धारेवर धरतोस, तसं त्यांना नाही बोलू शकत म्हणून आतल्या आत त्रास होतोय तर.....' हेही पुन्हा स्वगतच....
पायाचं हाड मोडल्याने सहा महिन्यांचा सक्तीचा आराम घ्यायला डॉक्टर काळेंनी सांगितलं होतं.... आणि आताशा पंचाहत्तरी गाठलेल्या कावेरीबाईंना उभ्यानं स्वयंपाक आणि धुणीभांडी करणं अशक्य होतं.... म्हणून स्वयंपाकासाठी अगदी जवळच्या ओळखीतल्या सुंदराबाई आणि धुणीभांडी फरशी पुसणं आणि घरातली इतर कामं करण्यासाठी मंजुळा,काही काळासाठी कामावर घेतल्या होत्या.....
शताब्दीला समजून चुकलं की या चिडचिडीचं नक्की काय कारण आहे ते..... पण ती शांत होती....
अश्विन तसाच पाय आपटत बाहेर गेला,आणि शताब्दीच्या डोळ्यासमोर लग्नानंतरच्या दोन वर्षांचा चित्रपट हळूच सरकला.....
अश्विन एक खूप चांगला मुलगा,सद्गुणी नवरा,आणि ऑफिसमध्ये एक उत्तम सहकारी होता.... सर्वांची मनं राखण्यासाठी प्रयत्न,मोठ्यांचा आदर, कुणाला काय आवडतं त्याचं ध्यान ठेवून सर्वांसाठी सर्व करायचा.... पण का कुणास ठाऊक त्याची एकच सवय शताब्दीला खटकत होती.... ती म्हणजे तो घरच्या कामांना,घरात राहणाऱ्या व्यक्तींना बिनकामी समजायचा.... 'घरी काय कामं असतात एवढी.... मी नोकरी करून पैसे कमावतो.... तुम्ही घरात बसून काय करता....?'
असे काहीसे त्याचे विचार होते.
एकाच कंपनीत रुजू झाल्यानंतर,समान बुद्धिमत्तेच्या शताब्दी आणि अश्विनला एकापाठोपाठ एक तीन प्रोजेक्ट पार्टनरशिप मध्ये पूर्ण करायचे होते... प्रोजेक्टची पार्टनरशिप निभावताना,कधी मनाच्या गाठी बांधल्या गेल्या आणि आयुष्यभराची पार्टनर शिप सुरू झाली हे त्यांचं त्यांनाच ठाऊक.... लग्नानंतर सासूसोबतच्या पहिल्यावहिल्या गुजगोष्टींत शताब्दीला त्यांनी कल्पना दिली होतीच....
"शताब्दी.... अगं एकुलता एक मुलगा म्हणून लहानपणापासूनच मी अश्विनचे जरा जास्त लाड करत गेले..... त्याला सगळं अप टू डेट,जागच्या जागी लागतं म्हणून प्रत्येक वस्तू हातात देत,आणि दिमतीला प्रत्येक वेळी मी मुकाट्यानं उभी राहत गेले,म्हणून घरात काही काम नसतंच मुळी,मी रिकामीच असते असं वाटत गेलं त्याला.... त्याला सगळे संस्कार मी दिले,पण माझ्या अति प्रेमापोटी मी त्याला घरच्या कामांची आणि घरात राहणाऱ्या व्यक्तींविषयी सहानुभूती शिकवू शकले नाही गं.... मला माहितीये त्याचा तुला,आज ना उद्या,जास्त ना थोडा पण त्रास होणार आहे.... मी त्याला आता तुझ्या स्वाधीन करते.... तूच तुझ्या पध्दतीने प्रयत्न करून बघ त्याच्यात बदल घडवून आणण्याचा...."
असं म्हणून कावेरीबाईंनी आधीच स्वतःची हार मान्य केली होती..... पण शताब्दीने विचार केला,मनुष्यस्वभावच तो..... एकाएकी थोडीच बदलणार..... अश्विनला बदलायला थोडा वेळ देऊया,समजवून, पटवून देण्याचा प्रयत्न करूया म्हणून शताब्दीने सर्वतोपरी प्रयत्न केले.... पण उपयोग शून्य.....


0

🎭 Series Post

View all