Login

कामाचं मोल (भाग ३)

कथा आवडल्यास नक्की कंमेंट करा.....
"खळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्...."
ही नक्कीच मंजुळा असणार....
आणि शताब्दीने कपाळावर हात मारला....
शांत होता होता निखाऱ्यावर कुणीतरी फुंकर मारावी,आणि पुन्हा ज्वाळा भडकाव्यात असं काहीसं काम मंजुळाच्या मग फोडण्याने केलं....
"आज मी काय ते निकाल लावूनच येतो" म्हणत अश्विन तणतणत बाहेर गेला...
"तू काय तुझ्या घरून या सगळ्या वस्तू आणल्यात का कशाही वापरायला...?" अतिशय चढ्या आवाजात अश्विन मंजुळावर ओरडला..."
"आवं हातातनं सटकला आनी पडला कप...." मंजुळा नेहमीच्या सुरात...
"नाही मी पाहायला लागलोय,तुम्हा कामवाल्यांना फार नखरे आलेत.... एक काम धड नाही आणि वर तोंड करून बोलतेस.... पैसे घेता कामाचे तर तशी कामं पण करा की.... साबणाचे डाग,खराब इस्त्री केलेला शर्ट,वस्तू जागेवर नसतात,ही अशी तुमची कामं.... आणि हे बघ... माझ्याकडे माझ्या घरी काम करायचं असेल तर कामं नीट झाली पाहिजेत...." आता अश्विनला जोर चढलेला...
"सायेब,चुकून पडला,मुद्दाम नाय पाडला म्यी...." अजूनही मंजुळा नेहमीच्या आवाजाच्या पट्टीत होती... पण अश्विन माघार घेऊ इच्छित नव्हता.....
"मुद्दाम कुणीच काही करत नाही,समजलं का..... इथून पुढे चूक झालेली मी खपवून घेणार नाही.... नाहीतर हिशोब करून पुढच्या दिवसापासून दुसरीकडे काम शोधायचं.... अडाणी,गरीब म्हणून जरा दया दाखवायला लागलो की डोक्यावर बसायला लागतात....." अश्विन जणूकाही राग आलेल्या नागसारखा फुत्कार करत होता .....
पण हे ऐकून आता मात्र मंजुळाची सटकली.... तीने काचा जमा करत असलेला झाडू हातातून खाली टाकला आणि पदर खोचून अश्विन समोर येऊन उभी राहिली....
"सायेब.... पैसं दयेता म्हंजे काय मेहेरबानी नाय करीत तुम्ही.... कामं करतो म्हून पैसं द्यावा लागत्यात तुम्हासनी..... आणि येवडं बोलनं तर म्या माझ्या नवऱ्याचं बी ऐकून घेत नाय..... "
"ए.... माझ्याशी आधी तर नीट बोलायचं ..... मी कोण आहे,माझं शिक्षण काय माहितीये का तुला....? बोलताना तोंड सांभाळून,लिमिट मध्ये बोल...." अश्विन आतून घाबरलेला,पण माघार घ्यायला तयार नव्हता.....
"माहित्ये साहेब,कोण हायत तुमी त्ये..... तुमी चार बुकं शिकल्यात,पर म्या बी जगाचे अनुभव घेतल्येत.... तुम्हासनी वाटत असंल तुमच्याशी नीट बोलायचं,तर तुमी बी नीट बोला अदुगर..... तुमच्या येवडा किटकीट मालक कोण मिळाला न्हाय बगा मला...... कापडं जाग्यावर नाई म्हून माज्या नावानं वरडता, तुमी काडलेली कापडं जाग्यावर ठिवता का....? साबन ऱ्हायला, इस्त्री चांगली झाली नाय म्हून बोलता, ही कामं घरात दुसऱ्या कोनी केली नाई तर तुमी सवताच्या हातानं करता का....?
कधी ताट उचलून ठुलंय का जागचं उचलून..... कधी अंघुळी वरून आल्यावर टॉवल टाकलाय का दोरीवं...?" मंजुळाने जाब विचारला.....
"तू आता माझ्या चुका मलाच दाखवायला लागलीस..... एवढी मजल गेली तुझी...... तू बाई आहेस म्हणून धक्काबुक्की करत नाही..... चालती हो माझ्या घरातून.... या घरात माझ्या आई आणि बायकोने कधी मला उलटून उत्तर दिलं नाही..... आणि तू फाडफाड बोलतेय..... मी हे सहन करू शकत नाही..... तुझा हिशोब कर आणि चालती हो इथून....."
"मी जात्ये साहेब..... पण येवडं ध्यानात ठेवा, तुमच्यासारखे साहेब या सोसायटीत पन्नास भेटतीन.... कामवाली बाई तुमी शोदत येता..... आणि घरच्या बायकसनी तुमी कसं आणि काय बोलता, त्ये म्या बगीतलंय.....च्या,पानी समदं हातात येतंय तुमच्या.... घरातल्या बाया रिकाम्याचं बसलेल्या आसतात आसं वाटतं तुमाला..... आन् आमच्याकडून बी तीच आपेक्षा....त्यादिवशी दार उघडाया दोन मिनिटं उशीर झाला म्हून किती बोललासा त्या माऊलीसनी..... काम करता, पैसं मिळविता म्हंजे काय आईपरिस म्होटं झालात व्हय तुमी.... मला तुम्हासनी बोलायचा दावा नाय पण म्या कामावं लागले तवापसनं बघाय लागले.... विनाकारण त्या ताईसनी आन् सवताच्या आईसनी बोल लावता तुमी.... त्या तुमची कामं करत्यात,तुम्हासनी समदं हातात मिळतंय म्हंजी त्या तुमच्या हाताखालच्या कामवाल्या नव्हत.... त्यासनी बी जीव हाय.... त्यासनी बी आराम करावं वाटतो.... पैसे फेकला तर कामवाली मिळती वो.... पर आईची छाया आन् बायकोपरिस माया मिळत नाय..... माझा पाणउतारा केला,पण त्यासनी बोलत जाऊ नगा.... तुमच्या कामाचं मोल तुम्हासनी मिळतं, पर बायकांच्या कामाचं मोल लावणारा अजून कोण जनमला नाय बगा... तुम्हासनी दुसरी कामवाली मिळंन, पर आई आन् बायको जे काय तुमच्यासाती मनापासून करत्यात,तसं समदं करणारी कोण भेटणार नाय..... आमच्या मागं सतराशे साट कामं, काळज्या..... आमी चुकतो,बोलनी खातो,परत तिथंच जातो,नायंच जमलं तर काम सोडून दयेतो.... पर घरातल्या बाया तसाच गाडा वडत राहत्यात..... आमच्यासारख्या कामवाल्या बाया पैसं घेऊन कामाचं मोल लावत्यात, पर तुमच्या आईनं तुमच्यासाठी आजपातूर किती केलं याचा हिशोब कसा लावताल साहेब.... तुम्हासनी सगळं हातात मिळतं.... हुकूम पडल्यागत सगळी कामं पटापटा होत्यात.... पर बायकोचं काय..... तिला उठून समदं करावंच लागतंय....." मंजुळा कावेरीबाई आणि शताब्दीच्या परिस्थितीला आठवून मनातला राग शब्दातून व्यक्त करत होती..... आताशा तिचा सूर भावना आणि करुणेने दाटला होता.....

0

🎭 Series Post

View all