Login

कामाचं मोल (भाग ४) अंतिम

कथा आवडल्यास नक्की कंमेंट करा.....
"पैका पैका म्हंजे समदं न्हवं साहेब.... घरातल्या बाया म्हंजे खरी लक्षुमी..... कामं होत जात राहत्यात.... पर मानुस गेल्यापरिस पुन्यांदा नाय गावत.... पैशाचं मोल आन् माणसाची किंमत याच्यात लई अंतर हाय बगा..... मला माजा हिशोब द्या.... हे मी चालल्ये...." म्हणत मंजुळा तिचा झोळा उचलून मुख्य दरवाजाकडून निघून गेली.....
हा सगळा सगळा प्रकार आई आणि शताब्दी आतून ऐकत होत्या.... मंजुळा त्या दोघींच्या मनातल्या प्रत्येक भावनेला शब्दांनी मूर्त रूप देत होती..... थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही.....
पण हे सगळं ऐकून अश्विन सुन्न झाला.... यापूर्वी कधीच, कुणीच, त्याच्याशी अशा प्रकारे आणि एवढ्या चढ्या आवाजात बोललं नव्हतं, नव्हे... कानउघडणी केली नव्हती.... पाच मिनिटं कानातून वारं गेल्यासारखं तो जागेवरच उभा होता.... आज त्याला अतिगरजेची कानउघाडणीवजा आयुष्यभराची समज मिळाली होती.... कुणीतरी कानात जळता निखारा कोंबावा,डोळ्यात जळजळीत अंजन घालावं त्याप्रमाणे त्याला काहीसं जाणवत होतं.... याआधी या विषयावर, इतक्या परखडपणे त्याच्यासमोर कुणीच बोललं नव्हतं.....
डोक्यातली विचारांची भिरभिर जरा कमी झाल्यावर तो गुपचूप येऊन स्वतःच्या खोलीत कामाच्या खुर्चीवर येऊन विचार करत बसला..... जेवणाची वेळ उलटून गेलेली.....
जेवणाचं ताट घेऊन आई हळूच शेजारी येऊन बसली.... शताब्दी आत होतीच...
"बाळ आशू.... मंजुळाचं बोलणं मनावर घेऊ नकोस.. ती आहेच बोलण्याला फटकळ.... तू तरी काय तिच्या नादाला लागत बसलास.. शब्दाने शब्द वाढतो,आणि काय म्हणून उगाच वाद घालावा..... घरात शांती नांदावी म्हणून कधीकधी काही गोष्टींना स्वाहा करावं लागतं, काही राग गिळून पचवावे लागतात..... उगाच तुझी चिडचिड झाली ना.... मी उद्यापासून करीत जाईन हो तिच्याकडून राहिलेली कामं.... काही लागलं सवरलं तर मला सांग..."
अश्विन आता थंड डोक्याने विचार करू लागला..... घरात शांती नांदावी म्हणून आजवर आईने किती गोष्टींना स्वाहा करावं लागलं असेल....? किती राग गिळला असेल..... आणि असं असूनही कधी माझ्याप्रति कुठल्याच कर्तव्यात कुचराई केली नाही..... कधी जाणवू सुद्धा दिलं नाही..... तशीच शताब्दी.... तिच्याही माहेरी तिच्या हाती चहा,पाणी,जेवण देणाऱ्या व्यक्ती असतीलच की...तिलाही तिथे माझ्यासारखे ऐशोआराम मिळाला असेलच की.... पण ती ते सर्व सोडून माझ्यासाठी, माझ्या हाताखाली कामाचा गाडा ओढत राहिली.....
या दोघी किती ग्रेट आहेत.... पैसे देऊनही झालेल्या चुकांबद्दल ऐकून न घेणाऱ्या मंजुळेच्या तुलनेत आई आणि बायको कशा एवढे दिवस माझी कटू बोलणी सहन करत गेल्या असतील....?
आता मात्र अश्विनला रडू फुटायला लागलं..... तो चेहरा लपवू लागला तेच मागून शताब्दीचा आवाज आला.....
"आशू..... तुला जाणीव झाली हे महत्त्वाचं.... मंजुळाच्या शब्दांचा राग डोक्यात ठेऊन उलट अर्थ न घेता तू सकारात्मक पणे विचार केलास, यात सर्वकाही आलं..... माझा पाय बरा झाला,की मी तुझ्याकडून सगळं वसूल करून घेईन बरं....."
तिच्या शब्दांनी वातावरण हलकं झालं..... कावेरीबाईंनी
मायेने पहिला घास अश्विनला भरवला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला.....
अश्विनच्या तोंडून ,नव्हे मनातून शब्द बाहेर पडले....
"सॉरी.... आता पुनःश्च नाही...."
0

🎭 Series Post

View all