Login

कमावती भाग-१

कमावती आणि भेदभाव!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: कमावती भाग-१

"कोणतेच काम तुला लवकर करायचं नसतं का ?" रागावून सासुबाई म्हणाल्या.

भरलेल्या डोळ्यांनी विजया आपला स्वयंपाक घरात निघून गेली.

" त्यांना बाहेर काय काम करतात हे माहीतच नसल्यासारखे वागतात. त्यामुळे त्यांना त्याचं गांभीर्य नसते." असे म्हणून मनिषा तिथून आपल्या ऑफिसला निघून गेली.

विजया ही मोठी सून होती, तर मनिषा लहान सून होती.

विजयाच्या नवऱ्याने आधीच तिला कमावती बायको नको म्हणून सांगितले होते, त्यामुळे विजयाने नोकरी सोडली होती.

प्रतिभाताईंनी आपल्या दोन्ही मुलांची लग्न एकाच मंडपात केली होती. त्यांच्या लहान मुलाचे मनिषावर प्रेम असल्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांची लग्न एकत्रच केली होती.

त्यांच्या लग्नाला दोन महिने सुद्धा झाले नव्हते,
प्रतिभाताईंनी आपल्या छोट्या सुनेकडची बाजू प्रत्येक वेळेस धरली होती.

किती काम केले, तरी सुद्धा त्यांच्यासाठी ते कमीच होते. तसेच आपली छोटी सून कमावणारी आहे तर आपली मोठी सून घरात आहे, तर तिने सर्व कामे करावेत, हाच त्यांचा विचार नेहमी असायचा.

' आज काही सुद्धा झाले तरी याबाबत बोलणारच आहे.' कसेतरी विजयाने स्वतःला सांगून मनाशीच निर्धार केला.

तिचा नवरा दोन दिवसांसाठी ऑफिसच्या कामाने बाहेरगावी गेलेला होता. आज रात्री तो येणार, त्यामुळे तिने त्याच्या आवडीचे जेवण बनवलेले होते.

" हे काय ताई, ही भाजी मला आवडत नाही. तुम्हाला माहीत आहे, तरी सुद्धा तुम्ही हे बनवलेत. तुम्ही सकाळचा राग आता काढत आहात ना?" मनिषा रात्री जेवताना बोलली.

त्यावर विजयाने एकदा आपला नवऱ्याकडे बघितले आणि पुन्हा शांत बसले.

" इथून पुढे सगळ्यांचा विचार करत जा." आपल्या लाडक्या सुनेच्या आवडती भाजी बनवली नाही, म्हणून म्हणाली.

सर्व काम आवरून ती झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये निघून गेली, पण आपल्या बायकोचा पडलेला चेहरा पाहून नरेश म्हणजेच विजयाचा नवऱ्याला वाईट वाटले.

" आज खूप थकली असशील ना?"  विजयाच्या नवऱ्याने विचारले.

ती काहीच बोलली नव्हती.

तिने शांत राहून त्यावर काहीच प्रतिसाद दिला नव्हता, त्यानंतर खोलीतली लाईट बंद करून ती त्याच्यापासून अंतर ठेवून पलंगावर झोपली.

सारखी होणारी भांडणं टाळण्यासाठी त्याच गप्प राहणे, त्याला स्वतःलाच मान्य नव्हते. त्यात त्याने तिला सांगितल्यावर ती नोकरी सोडलेली होती, परंतु वारंवार आपल्या आईकडून छोट्या भावाच्या बायकोकडून होणाऱ्या अपमान यामुळे दुखावली जात होती.

एकदा त्याने आपल्या भावाला समजावण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु तो काही आपल्या बायकोला शब्दाच्या बाहेर नाही असेच त्याला समजले होते.

जंगलामध्ये सरळ असणारी झाडे,हीच जास्त प्रमाणात कापली जातात. कारण ओबडधोबड ज्या झाडांचा आकार असतो, त्यावर जास्त मेहनत करावी लागते. हे माहीत असल्यामुळे सरळ झाडांनाच जास्त पसंती असते. असेच सरळमार्गी माणसांच्या बाबतीत सुद्धा होते. जे सरळ मार्गाने जातात आणि दुसऱ्यांना दुखावत नाहीत अशाच लोकांना गृहीत धरून त्यांना दुखावले जाते. तसेच त्याच व्यक्तीकडून जास्तीत जास्त काम करून घेतले जाते.

थोड्या वेळाने हुंदक्यांचा आवाज नरेशच्या कानावर पडला. त्याने झटकन उठून आधी खोली मधली लाईट लावली आणि त्याने खोलीमध्ये जशी लाईट लावली हे तिला समजले तसे तिने पांघरून डोक्यापर्यंत ओढून घेतले.

" विजया, मला माहितीये तुला त्रास होतोय, पण तू रडू नकोस." तो म्हणाला.

" रडू नको तर काय करू?  सतत माझा अपमान केला जातो. यासाठी मी लग्न केलं आहे का? तुम्हाला नोकरी करणारी बायको नको होती. ते पण मी ऐकलं आणि माझी चांगली नोकरी सोडली, परंतु तुमच्या लहान भावाची बायको माझा सतत अपमान करत असते आणि त्यात तुमची आई, ती सुद्धा काहीच बोलत नाही आणि उलट माझी चुकी कशी आहे हेच सांगत असते.

माझ्या घरामध्ये मोठ्या माणसांना उलटे बोलण्याचे संस्कार नाहीत, परंतु त्याचा आता गैरफायदा घेतला जातो. असेच मला वाटत आहे, तसेच आपल्या थोरल्या जावेला सुद्धा आदराने बोलावे, हे तर मनिषाला समजतच नाही. तुम्ही सुद्धा कोणी काही तिला बोलत नाही. का?  तर फक्त ती कमावती आहे, म्हणून?  तुम्हीच मला बोलला होतात ना, की माझा पगार पुरेसा आहे. त्यामुळे तुला नोकरी करायची गरज नाही. भाऊजींचा पगार कमी आहे, म्हणून ते दोघेजण कमावत आहेत. मग सांगा यात माझा दोष काय आहे?" रडतच आपली व्यथा विजया आपल्या नवऱ्यासमोर मांडत होती.

क्रमशः

आता काय करेल नरेश आता काय करेल नरेश पुढे काय करेल की गप्प बसेल?

©विद्या कुंभार.

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all