ईरा चॅम्पियन ट्रॉफी:-२०२५
लघुकथा लेखन स्पर्धा
शीर्षक:- कानाला खडा
"ऐक ना सोना, उद्या संध्याकाळी राकेशच्या घरी पार्टी आहे. आपल्या दोघांनाही त्याने आमंत्रित केले आहे. तू तयार राहा, उद्या जाऊ या आपणं." ऑफिसमधून आल्या आल्या मोहितने आनंदाने ही बातमी सोनलच्या कानावर घातली.
पार्टीच्या नावाने सोनलचा चेहरा आधी तर आनंदाने उजळून गेला. नंतर मात्र ती हिरमुसली.
पडका चेहरा करत म्हणाला,"तुम्ही जाऊन या."
"अगं, तू नीट ऐकलं नाहीस का? आपल्याला दोघांना बोलावलं आहे म्हटलं मी. मी एकटा जाऊन काय करू तिथे? सगळे मित्र आपापल्या बायकांना घेऊन येतील मग मी एकटा गेलो की सगळे मिळून माझी शाळा घेतील आणि खेचतील ते वेगळेच. नाना प्रश्न विचारून भंडावून टाकतील मला." तो थोडा उदास चेहरा करून म्हणाला.
"सांगा काही तरी कारण पण मी नाही येणार." ती तिच्या निर्णयावर ठाम होतं म्हणाली.
"अगं, पण का ?" त्याने वैतागत विचारले.
"पार्टीत जायचं म्हणजे छानसा ड्रेस नको का? माझ्याकडे तर पार्टीत घालून जाण्यासारखं एकही चांगला ड्रेस नाही." ती नाराजीने म्हणाली.
"हथ्थीच्या ! बस्स इतकंच होय. अगं मागच्या वर्षी तुझा वाढदिवसाला घेतला ना तो ड्रेस घाल. तो आकाशी रंगाचा ड्रेस तुझ्या अंगावर खूपच खुलून दिसतो." तो पटकन सोल्यूशन काढल्याचा आनंदाने म्हणाला.
"हा, मी विसरलेच होते. तो चांगला आहे, ओ; पण त्यावर साजेसा असा दागिना नाही ना माझ्याकडे? " ती तोंड बारीक करून म्हणाली.
"आहेत ना एक दोन दागिने त्यापैकीच एक घाल ना एखादा दागिना." तो पायातले साॅक्स काढून बूटात ठेवत म्हणाला.
"अहो ते सूट होत नाहीत त्या ड्रेसवर. त्यापेक्षा असं करूया का ? " तिने उत्साहाने विचारले.
"ए बाई, नवीन दागिना घेऊ असे मात्र म्हणू नकोस. आधीच तू मागच्या माहिन्यात एक साडी म्हणून दोन साड्या घेतल्यास. आता एक दागिना म्हणून दोन घेशील. त्यापेक्षा आहे तेच घाल. असंही गावीही आईबाबांना पैसे पाठवावे लागतात. दर महिन्याला बचत करावं म्हणतोय पण सगळा महिन्याचा खर्च बघता बाकी काहीच शिल्लक राहत नाही." तो थोडा चिडतच म्हणाला.
"तुमचं ना हे नेहमीचेच रडगाणे असते. मी काही मागितले की तुमचं हेच पुराण चालू असतं. राहिलं त्या साडीच तर एकावर एक फ्री होतं ते. आणि बचत म्हणता ना तर ते तुम्ही महिन्याला थोडे फार करून ठेवताच की. हुं" तिनेही चिडतच त्याला प्रत्युत्तर दिले.
"त्या बचतीबद्दल नको बोलूस काही. ते मला बाईक घ्यायची आहे म्हणून थोडं थोडं पैसे जमा करतोय. रोज रोज बसचा प्रवास, ती धावपळ नको वाटतं मला. आणि मॅडम ती साडी तीन हजाराची होती. म्हणून फ्री मध्ये दुसरी साडी मिळाली. ते जाऊ दे. पटकन जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे." तिच्या बोलण्यावर तो शांतपणे म्हणाला.
आता आल्या आल्या पुन्हा वाद नको म्हणून काही न बोलता उदास होतं जेवायला तिने त्याला वाढले.
मोहित एक क्लर्क म्हणून काम करत होता. तर सोनल गृहिणी. मध्यमवर्गीय कुटुंब. त्याचे आईवडील गावी राहत होते. नोकरी निमित्त मोहित आणि सोनल शहरात भाड्याच्या घरात राहत होते. तिला उंची कपडे आणि दागदागिन्यांचे खूप आकर्षण होते. कोणाकडे एखादा दागिना पाहिला की आपल्याकडेही तसाच दागिना असावा असे तिला नेहमी वाटायचे. मोहितही तिच्या ह्या अपेक्षा त्याच्या पगारातून पूर्ण करू शकत नव्हता. कधी कधी तो तिला त्यातूनही मार्ग काढून घेऊन द्यायचा. पण तिच्या मागण्या काय कमी होत नव्हत्या.
आता तिला पार्टीत तर जायचे होते पण दागिन्याचा ती विचार करू लागली. तसं ती ही मोहितच्या नकळत काही बचत करत होती. जेव्हा गरज पडली तरच ती खर्च करायची. खूप वेळा ती तिच्या आवडीला मुरड घालते असे तिला वाटायचे.
मोहित ऑफिसला गेल्यावर काम झाल्यावर ती निवांत बसून पार्टी बद्दल विचार करत होती.
'आपल्या बचतीतून तर नवीन नेकलेस येणार नाही. मग काय करायचे?' ती बचतीचे पैसे मोजून मनात म्हणाली.
तेवढ्यात तिची मैत्रिण विशाखाचा काॅल आला. तिने फोन उचलून कानाला लावत म्हणाली,"हॅलो विशू , बोल काय म्हणतेस? "
"काही नाही गं असंच फोन केला, तुझी आठवण आली म्हणून. पण काय गं? तुझा आवाज असा का येतोय? बरं नाही का तुला?" तिच्या आवाज नेहमीसारखा आनंदी न आल्याने तिने विचारले.
"काही नाही गं असंच फोन केला, तुझी आठवण आली म्हणून. पण काय गं? तुझा आवाज असा का येतोय? बरं नाही का तुला?" तिच्या आवाज नेहमीसारखा आनंदी न आल्याने तिने विचारले.
"मी बरी आहे गं. पण.." सोनल बोलता बोलता थांबली.
"पण काय? काही प्राॅब्लेम आहे का? भावजींशी भांडलीस की काय?" ती तिला चिडवत म्हणाली.
"नाही गं, आमचं भांडण वगैरे नाही झालं." ती म्हणाली.
"मग काय? सांग ना मला काय प्रॉब्लेम असेल तर मी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेन." विशाखा तिला दिलासा देत म्हणाली
सोनलने पार्टीबद्दल सगळे सांगितले तेव्हा विशाखा तिला हसत म्हणाली,"बस, इतकंच ना. अगं मग माझ्याकडे आहेत की दागिने त्यातलाच तुला आवडेल ते एक तू घाल. नंतर मला परत कर."
तिच्या बोलण्याने खूश होऊन काही विचार न करता तिने होकार दिला.
विशाखा बऱ्यापैकी श्रीमंत घरातील होती. तिच्याकडे बरेचसे दागिने होते.
सोनल लगेच तिच्या घरी जाऊन तिच्या आवडीचा सुंदर असा एक खड्यांचा नेकलेस घेऊन ती घरी आली.
पार्टीच्या दिवशी ती मस्तपैकी तयार झाली. त्या नेकलेसमुळे तिचे सौंदर्य आणखी वाढलं.
"वाह! खूप सुंदर दिसतेय गं तू, सोना." मोहित तिला आरश्यात पाहत पाठीमागून मिठीत घेत हसत म्हणाला.
तिने लाजून नजर खाली केली. त्याची नजर तिच्या गळ्यातील नेकलेसकडे गेले.
"हा नेकलेस केव्हा आणलेस तू?" तो थोडा गंभीर चेहरा करत म्हणाला.
"घाबरू नका, विकत नाही आणला, विशाखाचा आहे हा. नंतर सांगते बाकी, आता चला जाऊ या पार्टीला, नाही तर उशीर होईल." ती त्याला जास्त काही न सांगताच पार्टीला जाण्यासाठी घाई करत म्हणाली.
"अगं पण हे खूप महाग वाटते. व्यवस्थित सांभाळ ते." तो तिला काळजीने म्हणाला.
तिने होकारार्थी मान डोलावली.
दोघे पार्टीत गेले. तिच्या सौंदर्याची सर्वांनी खूप स्तुती केली. त्यामुळे ती खूप भारावून गेली. मोहितही सुखावला. त्या नेकलेसने हे घडत आहे असे तिला वाटले. पार्टी एंजॉय करून ते दोघे उशीर झाल्याने टॅक्सीने घरी आले.
वाटेत ती पार्टीविषयी भरभरून बोलत होती. तो हसत हुंकार भरत होता.
घरी आल्यावर तो कपडे बदलून फ्रेश होवून आला. तर ती आरशासमोर स्तब्ध उभी होती.
"काय गं तू अजून कपडे बदलले नाहीस?" तो तिला म्हणाला.
"अहो.." तिचा रडवलेला आवाज कानी पडला.
काल झाले म्हणून त्याने विचारल्यावर तिने जे सांगितले त्यामुळे तोही घाबरून काळजीने म्हणाला,"तू नीट पाहिलेस का? तुला आठवते का पार्टीतून निघताना तुझ्या गळ्यात होते का?"
"हो, मला चांगलेच आठवते. मी तेव्हा गळ्याला हात लावून पण पाहिला होता." तिचे डोळे पाण्याने भरले, हुंदका देत ती म्हणाली.
त्याने डोक्याला हात लावला. थोडा वेळ शांत राहून विचार करत बसला. नंतर तिला ड्रेसमध्ये अडकले का पाहायला सांगितले. तिने ड्रेस बदलून पूर्ण ड्रेस चेक करून बघितले पण सापडले नाही.
"काळजी करू नको, एखाद्या वेळेस त्या टॅक्सीमध्ये पडले असेल. त्या टॅक्सीवाल्याचा नंबर आहे माझ्याकडे मी त्याला विचारतो, तिथे बघून येतो." सध्या तिला ओरडण्यापेक्षा ते नेकलेस शोधणे जास्त गरजेचे होते म्हणून तो शांततेने हाताळत म्हणाला.
त्याने त्या टॅक्सीवाल्याला फोन करून विचारले. नंतर तो स्वतःही तिथे जाऊन शोधून आला. पार्टीच्या ठिकाणी, त्या रस्त्याने त्याने सर्व ठिकाणी शोधले पण त्याच्या हाती निराशाच आली.
हताश होऊन तो घरी आला. इकडे सोनलचे रडून रडून हाल बेहाल झाले होते.
"मी उगीच तो नेकलेस उसन आणला. आता काय करायचे?" ती त्याला बिलगून म्हणाली.
"शांत हो, सोना. आता रडून काय होणार आहे? तू कोणताही विचार न करता तो नेकलेस घेऊन आलीस. जाऊ दे तो परत करावा लागेल. काही माहिती का तो किती किमतीचा होता, कोठून आणला तो? " त्याला खरं तर तिचा खूप राग आलेला पण आता रागवून काहीच उपयोग नव्हता. तो राग आवरत म्हणाला.
त्याचे बोलणे निमूटपणे ऐकत तिने नकारार्थी मान डोलावली.
"तिला सांग त्याची कडी तुटली , दुरुस्तीला दिले. तोपर्यंत तिच्याकडून मुदत मागून घेऊन त्याबद्दल विचारून घे." तो अस्वस्थपणे केसात हात फिरवत म्हणाला.
त्याने सांगितले तसे तिने केले.
विशाखाने जेव्हा सांगितले की तो नेकलेस तिला कोणीतरी भेट दिले होते त्यामुळे त्याची किंमत आणि तो कोठून आणला ते तिलाही माहिती नाही. तरीही ते विचारून सांगते म्हणाली. तेव्हा पुन्हा मोहितला चिडायला झाले.
या घटनेमुळे मात्र सोनलने हाय खाल्ली. जर जास्त किमतीचे असेल तर आपण कसे परत करणार या विचाराने तिचे मन चिंतेने ग्रासून गेले.
आपल्यामुळे मोहितलाही त्रास होतोय याचही तिला वाईट वाटले.
सुदैवाने जेव्हा तिला कळले की तो नेकलेस फार किमतीचा नव्हता. तो कोठे मिळतो हे विशाखाने नंतर माहिती घेऊन सांगितल्यावर दोघे मिळून तसाच दुसरा नेकलेस घेऊन आले आणि तो विशाखाला परत केला.
परत करून आल्यावर मोहित तिला समजावत म्हणाला,"आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानावे. अंथरूण पाहून पाय पसरावे, सोना. दैव चांगले म्हणून सगळं निभावून घेतलं. इथून पुढे असे काही करू नकोस."
"हो ओ, इथून पुढे कानाला खडा लावते. असे कोणाची वस्तू घेणार नाही. घेतली होती त्याचा परिणाम काय झाला याचा धडा या घटनेमुळे मिळाला. तुम्ही म्हणता तसे आहे त्यात समाधान मानले पाहिजे." ती त्याला बिलगत म्हणाली.
समाप्त -
जे आहे त्यात समाधान मानावे नाही तर कानाला खडा लावण्याची वेळ येते.
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील पात्र, स्थान व घटना यांचा वास्तवाशी जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. असे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा