Login

Kanamagun Ali Ani Tikhat Zali Part - 1

Jalad Lekhan Kanamagun Ali Ani Tikhat Zali
"कानामागून आली आणि तिखट झाली" भाग - १
​"मी आहे म्हणून तुझा संसार झाला रे पांडुरंगा! आता मी थकले. सांभाळ रे आता!"
​आई, म्हणजेच मंदाताई, तावातावाने बोलत पांडुरंगाच्या चरणी मंजिरीसहित तुळस अर्पण करत होत्या.
​स्वयंपाकघरात मेथीच्या भाजीला लसणाची खमंग फोडणी बसली होती. एका गॅस शेगडीवर कुकर चढला होता. पोळपाटावर कणकेचा गोळा त्रिकोणी आकार घेऊन, आतमध्ये तेल-पिठाचे 'टॉनिक' पिऊन, आता गोलाकार पोळी बनत होता. हे सगळे रोजच्या सवयीने मेधाचे हात बरोबर चालवत होते, पण तिचे कान मात्र सासूबाईंच्या देवपूजेकडे होते.
​‘काय म्हणायचं यांना! रोज तीच पूजा, रोज तेच पांडुरंगाला आळवणे. देवाच्या चरणीही स्वतःच्या पदरी श्रेय पाडून घेण्याचा किती हा अट्टाहास!’ मेधा मनात म्हणाली, ‘देवा पांडुरंगा, माफ कर रे आणि आता तरी त्यांना सुधारण्याची बुद्धी दे!’
​असे मनात म्हणत मेधाने गॅसवरची टम्म फुगलेली पोळी खाली उतरवली आणि कुकरचा गॅस बंद केला.
​"सुनबाई, मेथीच्या भाजीचा वास बाहेरपर्यंत येतो आहे आणि खरपूस भाजलेल्या पोळीचा वासदेखील! बरं का! आता शांत बसू देणार नाही रसनेला. स्वाद घेण्याची नितांत गरज आहे!" सासरेबुवा म्हणजेच मुकुंदराव घरात शिरत मेधाला म्हणाले.
​"बाबा, या लगेचच हातपाय धुवून, गरमागरम वाढते तुम्हाला. सगळे तयार आहे, फक्त ताकाला रवी फिरवणे बाकी आहे. आईंची पूजा पण झाली आहे."
​"खरंच, तुझ्या हाताचा उरक आणि कामाची पद्धत वाखाणण्याजोगी आहे बरं का! सगळे कसे जिथल्या तिथे, वेळच्या वेळी. म्हणूनच घरात अन्नपूर्णा, लक्ष्मी, सरस्वतीचा वास आहे!" बाबा पुढे म्हणाले.
​"अहो बाबा, सरस्वतीवरून आठवलं. आज चिन्मयची कसली तरी जनरल नॉलेजची परीक्षा आहे. मी काल त्याला म्हणाले, ‘बस आबांच्या बरोबर थोडी तयारी करून घे!’ पण पठ्ठ्या मला म्हणाला, ‘आई, मी आबांचाच नातू आहे!’ मला पुढे बोलूच दिले नाही या पठ्ठ्याने!"
​या दोघांचा चाललेला सुसंवाद सासूबाईंच्या कानावर पडत होता. हातात जपमाळ होती, पण कान मात्र या दोघांवर. त्यांच्या मनात खळबळ. ‘माझं कुठेही नाव नाही. माझ्यावाचून यांचे काही आडत नाही. इतके दिवस मीच संसार केला, तोही हिच्यापेक्षा जास्त निगुतीने. पण ही 'कानामागून आली आणि तिखट झाली.' बोलत नाही काही, पण न बोलून शहाणी.’
​"असो, पांडुरंगा, तूच पाहतोस सगळे," असे म्हणत जपाची माळ डबीत ठेवून त्या बाहेर आल्या.
​मुकुंदराव ताट पाणी घेत होते. "मंदा, येतेस ना तू पण जेवायला? सुनबाईंनी मेथीची भाजी केली आहे, लसणाची फोडणी घालून, तुझ्यासारखीच!"
​"हो, येते ना! मला कधी माझ्या मर्जीप्रमाणे भाजी करायला मिळाली? तुम्ही नाहीतर सासूबाई सांगायच्यात, आज कोणती भाजी करायची, कशी करायची, काय स्वयंपाक करायचा. हे सगळे तुमच्या मर्जीवर अवलंबून होतं हो चिन्मयचे आजोबा!" मंदाताई म्हणाल्या.
​"अगं, कशाला मागचे उकरतेस? छान पूजा केली आहेस. जेवण तयार आहे. मस्त आस्वाद घे. कशाला तो पाढा!"
​"हो, तेही तुम्ही सांगाल तसेच. काय बोलायचं, कधी बोलायचे? अजूनही माझ्या हातात सत्ता नाही." मंदाबाईंचा आतला आवाज हळूहळू बाहेर पडत होता. "आजकाल तर सगळे त्यांच्याच मर्जीनं, काय स्वयंपाक करायचा, काय नाष्टा करायचा, घरी करायचा की बाहेरून मागवायचं. सगळं मस्त चाललंय हो! चालू द्या, चालू द्या. घ्या जेवून तुम्ही. मला काही एवढा गरम-थंडचा सोस नाही."
​मेधाला आजकाल हे सगळे रोजचेच झाले होते. सासूबाईंना काम होत नव्हते, म्हणून ती त्यांना आराम मिळावा यासाठी धडपड करायची, पण त्याचा त्या वेगळा अर्थ काढायच्या. तसे सगळे त्यांच्या पद्धतीनेच व्हायचे. पण त्यांना काही विचारायला गेले की, "तुमचे तुम्ही ठरवा" किंवा "सासऱ्यांना विचारा" असे उत्तर मिळायचे.
​पहिले-पहिले मेधा विचारायची, "आई, कणिक किती मळू? आई, भाजी कोणती करू? नाष्ट्याला काय करू?" कारण आज्जीसासूबाईंनी तिला सांगितले होते, "मेधा, सगळे कसे विचारून करत जा! रोजचेच असले तरीही, समोरच्याला मान दिल्याचं समाधान मिळतं गं!" मेधाने ती पद्धत चालू ठेवली होती.
​तशी मेधा मनाची प्रेमळ होती. ती घरातील सर्वांना जीव लावायची. कॉलेज जीवनात कथा-कादंबरीच्या मायाळू जगात वाढलेली ती, कथेतील स्वप्नाळू जग सत्यात उतरवत होती. पती महेश खूप सुस्वभावी होता; तो तिला समजून घ्यायचा.
​नव्या नवलाईचे दिवस होते. तिला छान तयार होऊन ऑफिसमधून महेश आल्यावर फिरायला जावेसे वाटायचे. म्हणून ती सगळे आवरून छान तयार होऊन बसायची. पण मुद्दाम सासूबाई महेश घरी यायच्या वेळी काहीतरी काम काढून करत बसायच्या. नाईलाजाने तिलाही त्या कामाला हातभार लावायला लागायचा. त्या दाखवायच्या की, त्याच घरातील सगळे काम करतात. मेधाला त्यांच्या या दिखाऊपणाचे आश्चर्य वाटायचे.
​मग ती महेशला सांगायला जायची, तर महेश लगेच म्हणायचा, "ही काय कटकट! तुला आई शिवाय दुसरा विषय नाही का?" मग दोघांत भांडण. याचा फायदा मंदाताई उचलायच्या. ‘दिवसभर माझा लेक बाहेर असतो. आल्यावर त्याच्या डोक्याला ही कटकट करते.’ एकंदरीत ‘मी किती चांगली आणि मेधा किती वाईट’ हाच त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न असायचा.
​एकंदरीत घरातील वातावरण गढूळ व्हायला लागले. पुढे मेधाने सोडून दिले आणि 'जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान' हे धोरण अवलंबिले.
​मेधा पुढे कशी वागायला लागली? मंदाताईंच्या स्वभाव असा कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात... क्रमशः
0

🎭 Series Post

View all