Login

Kanamagun Ali Ani Tikhat Zali Part 2

Jalad Lekhan Kanamagun Ali Ani Tikhat Zali Part - 2
"कानामागून आली आणि तिखट झाली" - भाग २
​मागील भागात आपण पाहिले की, मेधाने भांडण नको, वाद टाळावा हे धोरण ठरवले. कामापुरते काम, इतकेच काय ते बोलणे आणि घरातील कामेसुद्धा ती मंदाताईंना विचारूनच निमूटपणे करायची.
​तरीही त्या वाकड्यात शिरून बोलायला लागल्याच. दरम्यान, चैतन्यचा जन्म झाला. त्याच्या बाललीला, संगोपन, शाळा, अभ्यास यात मेधाचा दिवस सरून जाई.
​कधी कधी काही कारणास्तव मंदाताईंना एखादे काम पडले की, त्या लगेच त्याचा बाऊ करत, 'मला सगळं करावं लागतं, अजूनही संसारातून माझी सुटका नाही,' असे म्हणायच्या.
​मेधाचा दिवस भल्या पहाटे सुरू व्हायचा. सकाळी महेशचा डबा, सगळ्यांचा चहा-नाष्टा, चैतन्यची शाळा, त्याची तयारी आणि घरातील इतर कामे. ती शक्यतो मंदाताईंवर अवलंबून राहायची नाही. पण यावर मंदाताई लगेच म्हणत, "सगळे तीच करते. मला घरात किंमतच नाही." त्या घरात कामाला आलेल्या बाईलाही सगळे सांगत बसायच्या, "ती स्वयंपाक करते, भांडी-फरशी करते... आता माझं काय काम?"
​मुकुंदरावांचा उपदेश:
मुकुंदराव खूपदा मंदाताईंना समजावून सांगायचे, "अगं, मान्य आहे, तुला त्रास झाला असेल म्हणून तू तिच्यावर कशाला वचपा काढतेस? पण खरे सांगू, आपली सून त्या मानाने खूप चांगली आहे. ती तुला मान देते, आराम करायला सांगते.
​"तु यावर उपाय म्हणून एखादा छंद जोपास. आजवर मी नाही दिली तुला परवानगी, पण आता देतो. कर तुला हवं ते, नको संसारात गुंतू. त्यांचा संसार आहे, जसा करायचा आहे तसा करू दे. तू विरक्ती घे, समाधान लाभेल."
​मंदाताईंच्या मनाचे खेळ:
पण मंदाताईंना वाटायचे, 'मेधाच मुकुंदरावांचे माझ्याविरुद्ध कान भरते आहे. महेश पण माझ्याशी जास्त बोलत नाही, त्याला हीच कारणीभूत आहे. चैतन्य पण 'आबा आबा' करतो, त्याला आजी दिसत नाही.' त्यांचे एकच पालूपद असायचे: "कानामागून आली आणि तिखट झाली आहे."
​त्यांच्या मनात सतत विचार येई: 'आतापर्यंत मी सगळ्यांचे सगळे केले, मी म्हणूनच हा संसार उभा केला. मला मनासारखे कधी वागता आले नाही. सून आल्यावर तरी होईल वाटले, पण इथेही तीच तऱ्हा.'
​पण हे सगळे मंदाताईंच्या मनाचे खेळ होते. 'रिकामं डोकं सैतानाचे घर,' त्याप्रमाणे. त्यांचा सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि मनात चाललेल्या वादळाचा हा कचरा होता. 'माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही,' हा त्यांचा गैरसमज होता. याचा परिणाम व्हायचा तोच होत होता: त्यांच्या आयुष्यात एकटेपणा आणि खिन्नता वाढत चालली होती.
​पुढील भागात:
मुकुंदरावांच्या समजावून सांगण्याचा मंदाताईंच्या वागण्यात काही परिणाम होईल का? की या वादळाचा सुवर्णमध्य म्हणजे सगळे विभक्त होतील?
​सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पुढील भागात.
​क्रमशः
0

🎭 Series Post

View all