कांदा लसूण मिरची मसाला
उन्हाळा सुरू होताच लगबग होते ती मिरची मसाला करण्यासाठी. बायका अगदी आठवडाभर आधीपासून तयारी करायला सुरुवात करतात. मिरची चांगली लाल भडक आणि तिखट जाळ असायला हवी म्हणून अनेक ठिकाणी पाहणी करून येतात. जेणेकरून आपला मिरची मसाला छान व्हावा. लसूण तेल लावून उन्हाला ठेवतात जेणेकरून त्याची सालं लगेच निघतात. ही सगळी पूर्वतयारी दोन दिवस आधीच चालू करतात म्हणजे डंकावर दळायला जाताना घाई गडबड होत नाही आणि काही राहून जात नाही. चला तर मग आता वळूया आपल्या रेसिपीकडे,
साहित्य - लवंगी मिरची दीड किलो, पावकिलो काश्मिरी मिरची, पावकीलो बेडगी मिरची, पांढरा कांदा एक किलो, लसूण अर्धा किलो,
आलं पाव किलो, खोबरं एक किलो, धने अर्धा किलो, जीरे पाव किलो, तीळ पाव किलो.
खडे मसाले लवंग ३० ग्रॅम, मिरे ३० ग्रॅम. बाकी तेजपान, दालचिनी, चक्रफुल, जावीत्री, मायपत्री, मेथी, मोठे वेलदोडे, हिरवी वेलची, नाकेश्वरी, शहाजीरे, दगड फुल, खसखस, मोहोरी, त्रिफळा, बडीशेप, सुंठ, हळकुंड हे सगळे प्रत्येकी २० ग्रॅम घ्यायचे. एक मोठा वेलदोडा. एक मोठा हिंगाचा खडा. तेल अर्धा किलो. मोठं मीठ एक किलो.
कृती - मिरच्या आणल्या बरोबर दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या. जास्त दिवस ऊन द्यायचं नाही, नाहीतर मिरची पांढरी होते. खोबरं बारीक किसून घ्यायचं आणि गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं. धने, जिरे, तीळ, खसखस हे सुद्धा एक एक करून कोरडेच भाजून घ्यायचे. सगळे खडे मसाले दोन चमचे तेलात मंद आचेवर तळून घ्यायचे. तेल संपेल तसे घालत राहायचे, एकदम जास्तीचे तेल टाकून तळायचं नाही. हिंग, हळद, सुंठ, वेलदोडा फोडून घ्यायचा आणि मग एक एक तळायचे. हळद शेवटी तळायला घ्यायची. कांदा मोठा किंवा बारीक चिरून घ्यायचा आणि तेलात चांगला भाजून घ्यायचा. अगदी काळपट चॉकलेटी रंग येईपर्यत तेलात परतवून घ्यायचा जेणेकरून त्यातले सगळे पाणी संपून जाईल. कांदा परतवत असताना तेल जरा जास्त घालायचे आणि थोडं मोठं मीठ घालायचं म्हणजे लगेच परतवून होतो. तरी साधारण २० ते ३० मिनिट लागतात.
लसूण सोलून घ्यायचा आणि आले साल काढून बारीक तुकडे करून घ्यायचे. आता कांदा आलं लसूण मिक्सरवर मोठं मीठ घालून फिरवून घ्यायचं किंवा मग तसेच घेऊन गेलात तरी चालते. हे तीनही जिन्नस एका डब्यात नेले तरी चालतात.
आता बाकी सर्व साहित्य डब्यात भरून डंकावर दळायला घेऊन जायचं. दळताना सर्व साहित्य व्यवस्थित सर्व बारीक करायला सांगायचे. सर्व मसाले एकसारखे एकसोबत दळून घ्यायचे म्हणजे मसाला छान मिळून येतो आणि भाजीला पण चांगली चव येते. मसाला चांगला बारीक दळला म्हणजे भाजी छान मिळून येते आणि चव वाढते. आणखी एक, खडे मसाले तळताना गॅस अगदी बारीक असायला हवा म्हणजे मसाले चांगले खरपूस तळून होतात जळत नाही आणि मसाल्याचा स्वाद वाढतो.
किचन तुमचे आणि रेसिपी माझी. तुम्ही नक्की करून बघा आमचा हा कांदा लसूण मिरची मसाला. आवडल्यास लाईक आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा