Login

कंगोरे भावनांचे - १३

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 12......"हे बघ तू थांब जरा, असे तोंड उचलून उठून जाता येत नाही मुलीच्या सासरी. शिवाय बाबांचा प्रश्न आहेच..." आई.

"बाबा...बाबांचाच प्रश्न तू आयुष्यभर सोडवत रहा. अरे आता आमच्या प्रश्नांवर बोलणार की नाहीत ते आणि तू...?"

चिडून संजु म्हणाली. आईने डोळ्याला पदर लावला......

भाग - 13

आईने सायंकाळी बाबांच्या कानावर ही गोष्ट घातली. ते पण हैरान झाले. "पण आता तो तिच्या सासरच्यांचा प्रश्न आहे. आपण त्यात पडायचे नाही. आणि विचारायचे नाही. प्रियुला चांगली वागणूक मिळते ना घरी? मग आता ह्या वर चर्चा नको आणि माझ्या प्रियुला तू फोन करुन तिच्या मनात काही बाही गोष्टी घालू नकोस." त्यांनी स्पष्ट पणे शोभनाला ऐकवले.

शोभनाला डोळ्यां समोर सारखी प्रियु दिसत होती. 

तिला वाढवताना, घरातील नवर्‍याच्या ताणाने ती प्रियुला कधी मोकळेपणाने वावरु देत नव्हती. मोठी मुलगी म्हणून सगळे संस्कार प्रियुला द्यायचे होते. जेणे करुन तिच्या पाठच्यांनाही तसेच वळण लागेल. तिला सगळ्या परिस्थिती मध्ये अॅडजस्ट करायला शिकवले. जणू तिला सासरी जायचे ट्रेनींगच मी लहान पणा पासून देत होती. का मी असे केले? ती आपल्या जन्मदात्यांच्या घरात होती ना...मग मुक्तपणे मी, का नही तिला जगू दिले? आणि आता तिने आपल्या सासरीही एवढ्या बंधनात रहावे? मग माझ्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? कसे वागले मी तिच्या सोबत. आई असूनही वैर्‍यासारखी...! आईचे मन कशातच रमत नव्हते. कधी एकदा प्रियुला भेटते तिला बघते असे झाले होते. कोणत्या परिस्थितीत असेल माझी मुलगी. 

कल्पनेने तिला शहारा येत होता.

आई विवंचनेत होती. कसे भेटता येईल लेकीला, हाच विचार तिच्या मनात घोळत होता. तिला असे विचारमग्न बघून संजु म्हणाली,"अगं फोनवर बोलना तिच्यासोबत. तू आई आहेस. बोलू शकते तिच्या बरोबर. कोण अडवणार तुला? चल नाहीतर आपण दोघी तिला भेटून येऊ...तू बाबांना घाबरत राहीलीस तर...होऊ दे प्रियुचे काय व्हायचे ते."

"अरे थांब ना तू जरा. मला विचार करु दे. मला वाटतं संजु, मी आधी तिच्याशी फोनवर बोलते. हो ना ?" 

"हो कर मग फोन" संजुने लगेच नंबर डायल केला.

पलिकडून नेहमी सारखेच तिच्या सासूबाईंनी फोन उचलला.

प्रारंभीक बोलण झाल्यावर प्रियुला बोलवायला सांगितले.

"अरे, ती आताच बाहेर गेली मुली सोबत. काही खरेदी करायची होती तिला दुकानातून." सासूबाई बोलल्या.

"नेहमी कशी काय ती बाहेर जाते? माझ्याशी बोलणच होत नाहीये गेले काही दिवस झाले. आणि ती काॅलेजला येऊन गेली. तुम्ही आम्हाला सांगितले नाही? ती आली की फोन करायला सांगा तिला." एवढे म्हणून आईने फोन ठेवला.

आज प्रियुचे सासरेबुवा घरीच होते.

काय बोलणे झाले ते सासूने नवर्‍याला सांगितले.

त्यांनी लगेच आई कडे फोन लावला.

"तुमचे असे बोलणे आम्हाला आवडले नाही. ती आता आमची सून आहे. आम्ही निर्णय घेऊ तिच्यासंबंधी. तुमची मुलगी सुखात आहे इथे..."

"अहो पण कुठे आहे ती? बोलत का नाही काही दिवसांपासून आमच्या सोबत? तुम्ही काॅलेजमध्ये आलात तसे घरी भेटायला आले असते तर आम्हालाही आनंदच वाटला असता. बाकी काही नाही." आई बाजू सावरत म्हणाली. पण तिला आता प्रियुच्या सासरच्यांचा भयंकर राग येऊ लागला.

रात्री उशीरा सासरहून फोन आला. प्रियु बाबांशी बोलली. मग आईने फोन घेतला. "का गं कशी आहेस? विसरलीस का आम्हाला? फोनही करत नाहीस. तुझे बाबा घ्यायला येत होते तर जावयांनी नाही म्हंटले आणि आपल्या बाबांसोबत तुला काॅलेज मध्ये पाठवले. त्यांना म्हणावं जरा वेळ काढा बायको साठी. सासरीही या आम्हालाही बरे वाटेल."

आता कुठे शोभनाला हायसे वाटले. 

इकडे प्रियुच्या सासूबाईने नवर्‍याला विहीणीसोबत झालेले बोलणे सांगितलेच होते. सासरे विहीणीशी बोलले, पण त्यांना प्रियुच्या आईने बोललेले अजिबात आवडले नव्हते. पण सासूबाई प्रियुच्या आईची बाजू सावरायचा प्रयत्न करत होती.

नवर्‍याने ह्या बाबत अर्जुनला काही सांगू नये असे तिला वाटत होते. पण त्यांनी ऐकले नाही. 

आणि आपली नाराजी अर्जुन जवळ व्यक्त केली.

अर्जुनलाही प्रियुच्या आईचे बोलणे खटकले आणि विचार करुन करुन त्याला तिचा राग येऊ लागला.

अर्जुनला आईने कितीही समजावले तरी सुद्धा त्याने ऐकले नाही. आणि सकाळी उठल्याबरोबर प्रियुच्या माहेरी फोन लावला. बाबांनी उचलला. कसा काय सकाळीच फोन केला म्हणून विचारले.

"अहो, तुमच्या मिसेसने काल फोन करुन माझ्या आईला बोलल्या. त्यानंतर बाबांनाही उलट बोलल्या. मला हे आवडले नाही. काय चुकलं प्रियुला बाबांसोबत काॅलेज मध्ये पाठवले तर? ही काय पद्धत आहे का बोलण्याची." घाईघाईने श्वास न घेता अर्जुन बाबांना बोलत होता.

"अहो जावई मला ह्यातले काहीच माहित नाही. काय बोलली ही? मी विचारतो तिला. तुम्ही राग मानून घेऊ नका. मी माफी मागतो तुमची. चुकली असेल बोलताना. तिला ना बोलताच येत नाही पाहुण्यांशी. नेहमी घरातच राहते ना, म्हणून. मी तुमच्या आईबाबांशीही बोलतो..." सुरेश बोलत असताना मध्येच अर्जुनने फोन बंद केला.

त्यांनी परत लावून बघितला, 

रिंग जात होती पण अर्जुनने फोन उचलला नाही.

आता मात्र बाबा जाम भडकले. आईला कळून चुकले होते.

आपण केलेल्या फोनचा सुगावा ह्यांना लागला.

बाजूलाच चोरासम उभ्या असलेल्या बायकोवर सुरेशने चांगलेच तोंड सुख घेतले. "माझ्या पश्चात हेच धंदे करतेस का? मी तुला सांगितले होते, फोन नको करु, तिच्या संसारात ढवळाढवळ नको करुस. पण तू आजकाल जास्त शहाणी झालीस. चल तयारी कर. आत्ताच्या आत्ता आपण प्रियुकडे जाऊ. गरज पडली तर त्यांच्या पायावर डोकं ठेवून माफी माग. माझ्या प्रियुचा संसार सुरु होताच तू बिघडवला तर मी काय करेन सांगू शकत नाही."

आई शाॅक मध्ये होती. तिला प्रियुच्या सासर पेक्षाही, आपल्या नवर्‍याचीच फार भीती वाटत होती.

दोघेही लगेच निघाले. दुपारी प्रियुकडे पोहोचले.

त्यांना अचानक आलेले बघून सासूबाई चपापल्याच. कसनुसे हसून त्यांच स्वागत केलं. प्रियुला बोलावले. प्रियु आईबाबांना बघून हरखून गेली. आईच्या तर गळ्यातच पडली.

सगळ्यांची तिने चौकशी केली. तो पर्यंत सासूने चहापाणी आणले. आणि लगेच स्वयंपाक करायला वळली. तसे बाबांनी त्यांना थांबवून घेतले. "बसा मला काही बोलायचे आहे तुमच्याशी. काल फोन वरुन शोभना तुम्हाला जे काही बोलली, त्याबद्दल मी..."

क्रमशः

संगीता अनंत थोरात

06/08/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all