Login

कंगोरे भावनांचे - १४

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 13.....दोघेही लगेच निघाले. दुपारी प्रियुकडे पोहोचले.

त्यांना अचानक आलेले बघून सासूबाई चपापल्याच. कसनुसे हसून त्यांच स्वागत केलं. प्रियुला बोलावले. प्रियु आईबाबांना बघून हरखून गेली. आईच्या तर गळ्यातच पडली.

सगळ्यांची तिने चौकशी केली. तो पर्यंत सासूने चहापाणी आणले. आणि लगेच स्वयंपाक करायला वळली. तसे बाबांनी त्यांना थांबवून घेतले. "बसा मला काही बोलायचे आहे तुमच्याशी. काल फोन वरुन शोभना तुम्हाला जे काही बोलली, त्याबद्दल मी..."

भाग - 14

"अहो व्याही असे काय करता, शोभना ताई मला काहीच बोलल्या नाहीत. उलट माझ्या कडून चूक झाली. मी त्यांनी जेव्हापण फोन केला, प्रियुला सांगायला विसरले आणि मग त्यांचे तिच्याशी बोलणे झाले नाही. मग सहाजीकच आहे ना, कुठल्याही आईच्या मनात शंका कुशंका येतीलच. त्या चांगल्याच बोलल्यात माझ्याशी. तुम्ही आता काहीच बोलू नका ह्याबाबत. जेवण तयारच आहे. थोडं वाढीव काहीतरी बनवते मग जेऊयात आपण सोबत. आणि हो, आले तसे थांबा दोन दिवस." प्रियुच्या सासूबाई म्हणाल्या. आणि किचन मध्ये गेल्या.

"जा बेटा ताईंना मदत कर." बाबांनी प्रियुला किचन मध्ये पाठवले. "बघ मी म्हणत होतो. खुप चांगले लोकं आहेत ही. आपल डोकं जास्त लावत नको जाऊस. त्यांना त्यांच जगू दे. सासरी कसे रहावे लागते कळू दे. ह्या नंतर अशी बेअदबी केलीस, तर माझ्याशी गाठ आहे." जवळ जवळ त्यांनी बायकोला धमकीच दिली होती.

ह्यांचे जेवण आटोपले. थोड्या वेळातच अर्जुन आणि बाबा आलेत. अर्जुन चेहर्‍यावरुनच अशांत दिसत होता. त्याच्या

बाबांनी फाॅर्म्यालिटी पाळत सुरेश सोबत बोलले. आणि नमस्कारा व्यतिरिक्त शोभनाशी बोलणे टाळले. अर्जुन अजिबात बोलत नव्हता. त्याच्याकडे बघून प्रियुचे बाबा बोलले,"मघा फोनवर अर्धवट बोलणे झाले. म्हणून आलो इथवर. त्यानिमीत्ताने तुम्हा सर्वांची भेट झाली. ताईंनी छान स्वागत केले. जेवणही झाले. तुमच्या भेटी साठी थांबलोत. निघतो आता. आणि हो, जे झाले त्याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो." हात जोडून बाबा म्हणाले.

"तुम्ही का दिलगीरी व्यक्त करता? चुक तर ह्या बाईंनी केली ना?

त्या तर गुपचुप बसल्या आहेत. तसेही तुम्ही तर प्रियुची चौकशी करायला आलात. तिला भेटून झाले मग का थांबणार तुम्ही आता. झाली ना ह्यांची इच्छा पुर्ण. हे बघा प्रियुची आई, ती माझी बायको आहे. आता तुमचा तिच्यावर हक्क नाही. मला वाटेल तसे तिने वागायला पाहीजे. तुम्ही तिला काही शिकवले नाही. संस्कार दिले नाही. त्या माळ्याच्या पोराला निहारत असते ती. रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍यांना बघत असते. कुणाशीही चालता चालता बोलते. आम्ही उटीला गेलो. तिकडे रेल्वेतल्या एका मुला सोबत बोलत होती. हसत होती. नक्कीच तो तिच्या आधीच्या ओळखीतला होता. तिच्या मागे आला होता. मला तर वाटतं हिनेच बोलावले असेल त्याला..."

तो बोलायचे थांबतच नव्हता. उठून इकडे तिकडे येरझारा घालत एक सारखा बोलत होता. त्याची आई केविलवाणे कधी त्याच्याकडे तर कधी प्रियुच्या माहेरच्यांकडे बघत होती. अर्जुनच्या बाबांनी तोंड घट्ट बंद करुन घेतले होते. जणू ते त्याच्या आरोपाचे समर्थन करत होते.

सुरेश, शोभना करंट लागल्यागत त्याच्या कडे बघत होते. हा काय बोलतोय त्यांना कळेना. प्रियुला त्याच्या स्वभावाची आयडीया होती. तरीसुद्धा तिला वाटले नव्हते हा आईबाबांसमोर असे काही बोलेल.

शेवटी न राहवून शोभना त्याला म्हणाली." हे काय आरोप करताय तुम्ही? माझी प्रियु अजिबात अशी नाहीये. खुप आज्ञाधारी आणि सभ्य मुलगी आहे ती. तिने लग्नाआधी जर असे काही केले नाही. तर तुमच्या सारखा पुरुष तिच्या जीवनात असल्यावर ती कसे, असे वागेल? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझी प्रियु छान मुलगी आहे."

ठाम पणे शोभना म्हणाली. प्रियुला काय बोलावे कळेना. 

बाबांसमोर तिचा नवरा तिच्याच बाबतीत उलट सुलट बोलत होता. खोटे आरोप करुन थयथयाट करत होता. स्वतःचा खोट्या सभ्य, संस्कारीत जीवनाचा बुरखा फाडत होता.

"तुम्ही तिच्याच बाजूने बोलणार मला माहीत आहे. मला तुम्हा दोघांवर भरोसा नाही. मी प्रियुला तुमच्याकडे पाठवणार नाही आणि काॅलेज मध्ये पण पाठवणार नाही. ही घरातच अशी दुसर्‍या मुलांना बघते काॅलेज मध्ये गेल्यावर काय करेल?

प्रियु परिक्षा देणार नाही. मी सांगून ठेवतो." तो हातवारे करत शोभनाला म्हणाला.

आता मात्र शोभना चिडली."मग तुम्ही आधी बोलले तिला शिकवण्या बद्दल, ते खोटे बोलले ना ? तेव्हाच आम्हाला सांगायला पाहीजे होते. निदान तिला डिग्री तरी घेऊ द्यायची."

"बापरे ही बाई आपल्याला खोटारडी बोलत आहे. बाबा बघा ह्या काय म्हणतात. आता तर प्रियुला अजिबात शिकवणार नाही." अर्जुनच्या तिथल्या तिथे फेर्‍या मारणे वाढले होते. प्रचंड अस्वस्थ झाला तो. घाईघाईने जवळच्या ब्रीफकेस मधून दोन तीन गोळ्या काढून त्याने पाण्या सोबत पोटात ढकलल्या. 

आईबाबा हे बघून अवाक् झाले. कशाच्या गोळ्या खाल्या ह्याने ?

परिस्थिती सुरेशने हाताळण्याचा प्रयत्न केला. पण फोल ठरला. पुन्हा एकदा शोभनाच्या संस्कारावर आले. तसे शोभना भडकलीच,"माझ्या मुलीला मी इथे ठेवत नाही. चल प्रियु माझ्यासोबत." तिने प्रियुला बॅग भरायला सांगितली. 

प्रियुही पडत्या फळाची आज्ञा मानत बेडरुम मध्ये गेली. स्वतःचे कपडे, दागिने, कागदपत्र, पुस्तकं सगळच मोठ्या बॅगेत कोंबलं आणि बाहेर आली. 

तिला बघताच येरझारा घालणारा अर्जुन थबकून म्हणाला,"बघा कशी उताविळ झाली प्रियु, चांगली मुलगी घर सोडून जायला तयार झाली असती का? मी म्हणतो ते बरोबर आहे. ते मुलं हिचीच वाट बघत आहेत बाहेर. पण मी तुला घरा बाहेर जाऊ देणार नाही." त्याने दार बंद केले आणि दोन्ही हात पसरवून दारात उभा राहीला.

सगळी परिस्थिती पाहू जाता. सुरेशला काय बोलावे कळतच नव्हतं. कुणाला अडवावे? अर्जुन असा का वागतोय? शोभनाला कसा आवरु? कोणाच्या बाजूने बोलू? 

तो कनफ्यूज झाला. 

इकडे आईने हात जोडून अर्जुनच्या बाबांना, त्याला आवरायची विनंती केली. मग बाबांनी अर्जुनला जवळ घेत त्याला शांत करत ते वरच्या बेडरुम मध्ये घेऊन गेले.

अर्जुनची आई हात जोडून शोभना समोर उभी राहीली. 

"मी माझ्या मुलाच्या वतीने तुमची माफी मागते. बालीश आहे होऽऽतो. लहान समजून माफ करा. रागाच्या भरात तो काही बाही बोलला. त्याचे बाबा समजावतील त्याला. तुमची मुलगी खरा सोना आहे. हा म्हणतोय तसे काही नाही."

मग प्रियु कडे वळून म्हणाली."प्रियु आता आई सोबत जा. पण, काही दिवसाने परत ये बाळ! ही आई तुझी वाट बघणार आहे. मला विसरु नकोस. हे घर तुझं आहे. अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे. पण त्याला व्यक्त करता येत नाही." आपल्या मुलाच्या वागण्यावर ती पांघरुण घालायचा प्रयत्न करत होती.

सुरेश समोरही ती हात जोडून उभी राहीली.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

06/08/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all