Login

कंगोरे भावनांचे - १५

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 14.....अर्जुनची आई हात जोडून शोभना समोर उभी राहीली. 

"मी माझ्या मुलाच्या वतीने तुमची माफी मागते. बालीश आहे होऽऽतो. लहान समजून माफ करा. रागाच्या भरात तो काही बाही बोलला. त्याचे बाबा समजावतील त्याला. तुमची मुलगी खरा सोना आहे. हा म्हणतोय तसे काही नाही."

मग प्रियु कडे वळून म्हणाली."प्रियु आता आई सोबत जा. पण, काही दिवसाने परत ये बाळ! ही आई तुझी वाट बघणार आहे. मला विसरु नकोस. हे घर तुझं आहे. अर्जुनचं तुझ्यावर प्रेम आहे. पण त्याला व्यक्त करता येत नाही." आपल्या मुलाच्या वागण्यावर ती पांघरुण घालायचा प्रयत्न करत होती.

सुरेश समोरही ती हात जोडून उभी राहीली.....

भाग - 15

पण आता शोभना काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

लगेच तिथून ते बाहेर पडलेत.

रस्त्यात कुणीच काही बोलले नाही. घरी गेल्यावर तीनही मुली प्रियुला बघून आनंदल्या पण सगळ्यांचे चेहरे उतरलेले बघून त्या चुप राहील्या. त्यारात्री कुणीच काही बोलले नाही.

दुसरा दिवस स्मशान शांततेत उजाडला. आज संजु घरीच थांबली. लहाण्या दोघींना शाळेत पाठवले. सकाळी शंभू मामाचा फोन आला. तो सुरेशला रात्रीच्या घटने बद्दल बोलत होता. तुम्ही आपल्या पायावर का धोंडा पाडून घेत आहात. मी माझ्या परिचयाचे म्हणून प्रियुचे स्थळ त्यांना सुचवले. आता ते मला काय म्हणतील? मलाच दोष देतील. तुला अजून तीन मुली आहेत. समाजात माहित झाल्यास त्यांचे लग्न कसे व्हायचे? बोलून त्याने फोन ठेवला. शंभूच्या बोलण्याने सुरेश खिन्न झाला. काल खरे तर तिकडे जायलाच नको होतं. काय र्दुबुद्धी सुचली. प्रियुलापण असे रागाने आणायलाच नको होतं. शोभना फारच चुकीचं वागली काल. आता काय होईल पुढे? काळजीने न जेवताच सुरेश आॅफीसमध्ये गेला.

घरात तिघीच होत्या आता. आईने संजुला इशारा केला. तिच्याशी बोल म्हणून. संजुने आपले काम केले. प्रियुला बोलते केले. अगं तो माझ्याशी मोकळेपणाने बोलत नाही किंबहूना दोनचार शब्दच बोलतो. तेही मी काही बोलले तर. कुठेच फिरायला नेत नाही. एकदा बाहेर गेले तर मला सोडून पुढेच पळत होता. बरोबर चालत सुद्धा नव्हता. दूर उभा राहून बघायचा...मग माळ्याचा किस्सा, ट्रेन मध्ये त्या मुलाने, ही तुमची बर्थ काय तेवढे विचारले आणि मी उत्तर दिले. अधून मधून लक्ष गेलं त्याच्याकडे. पण मला माहितच नव्हतं अर्जुन माझी जासूसी करत होता ते. मी बोअर होत होते, कारण घरात काम काहीच नाही. मग कधी टेरेसवर कधी इकडे तिकडे बघत उभी असते. त्यालाच हा असा म्हणतोय. म्हणजे बघ हा कसा? हा लपून मला बघतो, लक्ष ठेवतो माझ्यावर. सासूबाई खूप चांगली आहे. माझी काळजी घेते. बाकीच्यांचा प्राॅब्लेम नाही. पण हा बाबांच्या फारच आहारी गेला आहे. आमच्या मध्येही काही बोलले तरी तो त्यांना सांगतो. त्यांना विचारल्या शिवाय काहीच करत नाही. एकंदरीत त्याला स्वतःचे मत नाहीये. तिने उटीचा पण प्रसंग सांगितला. सोबतच हे पण सांगितले,"त्याचा आणि माझा अजिबात संबंध नाहीये. तो माझ्या जवळ सुद्धा येत नाही. जे काही बोलायचे ते लांबूनच...!"

सगळ बाहेर उभे राहून ऐकत असलेली आई अचानक आत येऊन प्रियुला म्हणाली,"म्हणजे तुमचे पतीपत्नीचे संबंध नाहीत का..?" प्रियुने खाली मान घालत नाही म्हंटले.

"म्हणजे हा छक्का तर नाही? आयला शंभूमामा काय ओळखीतली सोयरीक आणली रे. मामाची....ह्याच्या तर लहान पणा पासून ओळखीचे लोकं होते ना हे..! आयला मी आधीच म्हणत होते. काहीतरी गडबड आहे. मला कुणी सीरीयसली घेतच नाही...."संजु बोलायला लागली.

आईला धक्क्यावर धक्के मिळत होते. सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिला आठवत होत्या. आणि मग तिची खात्री पटली. नक्कीच पाणी कुठं तरी मुरतय. काही तरी गडबड आहे. पण ह्या मुलाची हालचाल वगैरे तर "तशी" नाहीये. शंका नाही घेता येत. मग कसा काय तीन महीने तो प्रियुच्या जवळ आला नाही.

प्रियुने काहीतरी आठवून आईला पर्समधून कागद काढून दाखवला. ह्या काही औषधी आहेत. मी मागेच लिहून ठेवल्या होत्या. त्यावर फक्त डाॅक्टरांचे नाव व नंबर आहे. क्लिनीकचा अॅड्रेस नाहीये. ह्या काही टॅब्लेट आणि अजून काही आहेत. मी एक दोनदा त्याला ह्या घेताना बघितले आहे.

आई म्हणाली, आपण बाबांना सांगितले तर ते आपल्यालाच रागावतील. ह्या गोळ्या कशाच्या ते माहित व्हायला पाहीजे.

संजु लगेच म्हणाली,"माझ्या मैत्रिणीला विचारते. तिची मोठी बहीण डाॅक्टर आहे." तिने फोनवरुन विचारपूस केली. औषधांचे नाव सांगितले. डाॅक्टरांचे नाव सांगितले आणि एका कागदावर काही तरी लिहून घेतले.

संजु खुप मोठ्ठा शोध लावल्यागत आईला म्हणाली.

मी सगळी माहिती काढली. आता मैत्रिणीच्या बहीणी सोबतच बोलले. ह्या औषधी"मानसोपचाराच्या" आहेत.

आणि हे डाॅक्टर मानसोपचार तज्ञ आहेत.

आणि हा त्यांचा पत्ता आहे.

कुर्ला स्टेशनच्या जवळपास क्लिनीक आहे त्यांच.

तिने वेळही सांगितली आहे.

विजयी मुद्रेने संजु म्हणाली.

आई डोक्याला हात लावून बसली. प्रियुची नजर शुन्यात हरवली. त्यानंतर कुणीच काही बोलले नाही.

बाबा घरी आल्यावर आपल्याच कोषात गुरफटून गेले.

त्यांनी सगळं खापर मनोमनी शोभनाच्या डोक्यावर फोडले.

आणि तिच्याशी बोलणे बंद केले.

रात्रभर्‍यात शोभनाने विचार पक्का केला. आता माघार घ्यायची नाही. नक्की काय आहे त्याचा शोध घ्यायचा. आधी डाॅक्टरांना भेटूया. मग बाकी बघू. तिला आता मुली समोर नवर्‍याचीही पर्वा नव्हती.

दुसर्‍या दिवशी सुरेश आॅफीसमध्ये गेल्यावर तयारी करुन तिघीही डाॅक्टरांकडे गेल्या. सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. पण ते माहिती द्यायला तयार नव्हते. शेवटी शोभनाने आपल्या मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे. मला मदत करा अशी याचना केल्यावर त्यांनी अर्जुनची फाईल काढली.

लहानपणा पासून काही विचित्र घटना त्याच्या समोर घडल्यात. त्याचा धसका घेऊन तो आपल्याच कोषात राहीला. आईपेक्षा जास्त, त्याचा वडीलांशी खुप संपर्क होता. त्यांच्या सोबत त्याला सुरक्षित वाटायचे. तरुण झाला तसा तो बाहेर जायला घाबरु लागला. कसा बसा काॅलेज करत होता. तसा तो अभ्यासात हुशार होता. पण एकही मित्र त्याने बनवला नाही.

एकदा तब्येत बिघडल्यावर बाबांनी त्याला डाॅक्टरकडे नेले.

आणि तिथून त्याची ट्रिटमेंट सुरु झाली. मध्ये तो नोकरीला पण लागला. पण त्याला घरी यायचीच घाई असायची. आणि कुणावरही तो विश्वास ठेवत नव्हता. ही त्याची मानसीक स्थिती होती. मी ह्याचे लग्न आताच नका करु, असे त्याच्या बाबांना बोललो होतो. पण तरीही त्यांनी केलेच लग्नं.

डाॅक्टरांनी इत्तमभूत माहिती दिली.

सोबत आश्वासन दिले,"वेळ पडल्यास मदत करतील."

क्रमशः

संगीता अनंत थोरात

07/08/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all