Login

कंगोरे भावनांचे - ४

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग-3 ......संजीवनी म्हणजे तापलेला तवा, सदानकदा गॅसवर असल्या सारखी ! तिला आईवडीलांचे विचार पटायचेच नाहीत. ती बाबांना वचकून असायची पण आईशी, नातेवाईकांशी सतत हुज्जत घालायची न पटणार्‍या गोष्टींसाठी.....

भाग - 4

म्हणून आई तिला जास्त बोलूच द्यायची नाही घरात. आईच्या लेखी, "उद्धट पोर" होती ती. पण संजीवनी खरे तर,"खरे बोलणारी" मुलगी होती आणि तिला चुकीचं सहन व्हायच नाही. मग काय तिलाच,

"फटकळ" म्हणून बोलणे ऐकावे लागायचे.

बाकी लहान दोघी शिना आणि टीना, ह्या मात्र दोघी शहाण्या होत्या. कारण प्रियु आणि संजू कडे आई बाबांचे सगळ्यात जास्त लक्ष असायचे. ओरडा जास्तीत जास्त संजूला मिळायचा. प्रियु बिचारी बोलायला जायची पण आईपुढे तिचं काही चालायचं नाही. वरुन रुबाबदार बाबांचा आईवरचा,"रुबाब" बघितला की लहानग्या शिना टिना घाबरुन जायच्या आणि कशातच काही नसायच्या. आईच्या मागे मागे शेपटीसारखे फिरायचे. ती म्हणेल तसे करायचे. 

खरे तर ह्या दोघींची नावं असे दोन अक्षरी का ठेवलेत..? जेव्हा की मोठ्या दोघींची नावं..लांबसडक आणि काही मिनींग असलेले नावं आहेत...आला ना हा प्रश्न मनात ?

आईच्या मनात डोकावूया...तिसरा टर्न आहे. मेला, नवरा जास्त काही बोलत नाही आधीच. आणि ह्या वेळेस तरी देवा, वंशाला दिवा दे रे बाबा. हात जोडते तुला. त्या वन्सला लागोपाठ दोन मुलं दिलीस. काय तिचा तोरा असतो. मला एकतरी दे रे बाबा !

पण जे "जिन्स" देतील तेच होईल ना ! ह्या ग्रॅज्युएट झालेल्या आईला कोणी समजावयाचे ? जे होणार होते तेच झाले. मुलीने जन्म घेतला. डाॅक्टर, नर्सने तुम्हाला कन्यारत्न झाले म्हणून सांगितले. आईने आवंढा गिळला. उसने हसू ओठांवर आणत शुभेच्छांचा स्वीकार केला. खोल गेलेल्या आवाजात नर्सला विचारले,"माझे पती आहेत ना बाहेर...?"

तिचा विश्वासच नव्हता नवरा बाहेर थांबला असेल म्हणून.

"हो हो, इथेच बसून होते. बघितले त्यांनी मुलीला. मिठाई आणायला गेलेत. आनंदी आहेत. हे काय मला बक्षीस म्हणून शंभर रुपये हातात दिले." नर्सने आनंदाने नोट दाखवली.

आईला हायसे वाटले. चला म्हणजे नाराज नाहीत तर !

बाबा मिठाई घेऊन आलेत. हसतच त्यांनी नर्सला मिठाई दिली. नंतर पुर्ण बाॅक्सच तिच्या हातात ठेवत,"द्या वाटून तुमच्या सहकार्‍यांना" म्हणाले. नर्स बाहेर गेली. बाबांनी हसतच मान वळवली. आईची आणि त्यांची नजरानजर झाली. हसताना फार कमी बघितले होते तिने नवर्‍याला. नेहमी कठोर चेहर्‍याने वावरणारे व्यक्तिमत्व होते ते. 

"ठिक आहेस ना?"

"हो ठिक आहे."

"तुमच मुलींच जेवण वगैरे...कसे करायचे..."

"ते मी बघतो. शेजारच्या विमला वहीणींनकडे मुलींना ठेवलय आणि त्याच आपल्या जेवणाचं बघतील. बरं, तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो....जातो !" म्हणत लगेच ते रुम बाहेर गेले. 

हे...हे काय होतं? काय माणूस आहे ना..अरे बाबा जरा बसायचस ना माझ्या जवळ. तुझे प्रेमाचे बोल ऐकायचेत मला. लेकीला घ्यायचं असतस ना जवळ. इथे काही हवं नको बघायला, नको का कुणी...?

डोळ्यात पाणी आले तिच्या.

आईला{नानी}मागेच पत्र पाठवले होते. पण आईसुद्धा यायला तयार नाही. जावई बोलत नाहीत. त्यांना आम्ही आलेलो आवडत नाही. पहिले दोन बाळंतपण आम्ही केले आमच्या कडे, आता इकडे येशील तर करु...तुझ्या घरी येणार नाही मी रहायला !

आईने स्पष्टपणे उलट टपाली पत्रात मामा करवी लिहून पाठवले होते. मग काय आमचा नाईलाज झाला.

कसेबसे तिने स्वतःला सावरले. नर्सच्या मदतीने बाळाला हवे नको ते बघितले. चवथ्या दिवशी घरी गेल्यावर शेजारच्या एका खानावळ मध्ये सवा महिन्यांन साठी डब्बा दिला लावून दोन्ही वेळचा. आणि घरकामासाठी एक बाई सुद्धा ठेवली. तरीही तिला मोठ्या दोन्ही मुलींसाठी, बाळासाठी आणि नवर्‍याला वाढून द्यायला अंथरुणातून उठावेच लागे. मग तिची चिडचिड व्हायची पण सांगणार कुणाला. का कुणास ठाऊक पुढे कोणत्याच विधीत तिचे मन लागत नव्हते. मग जे सुचेल ते नाव तिने तिसर्‍या मुलीचे ठेवले,"शिना...!"

बरे पण, वंशाच्या दिव्याची वाट अजूनही संपली नव्हती. म्हणून तिने चवथा चांन्स घेतला. व्हायचे तेच झाले. चवथे"कन्यारत्न" जन्मास आले. "टिना" नाव ठेऊन आई मोकळी झाली. त्याआधी डाॅक्टरांनी दोघांनाही समजावले होते. आणि बाळंतपणातच तिचे परिवार नियोजनाचे आॅपरेशन केले.

ह्या वेळेस मात्र आशेने नानीसुद्धा आली होती. 

सोबत मावशीही होती तिचं करायला. 

आता बाबा तर जरा जास्तच शांत झाले होते. चार मुली असूनही बाबा घरात आले की शांतता असायची. ते सतत कामात व्यग्र असायचे. बँकेत ब्रांच मॅनेजर होते. तसे पाहीले तर आर्थीक स्थिती चांगली होती. पण,"चार मुली..." हा विचार करुन पुढच्या तरतुदीसाठी बाबा जरा जास्त व्यस्त झाले.

मुंबईसारख्या ठिकाणी वडीलोपार्जीत छोटे घर होते. आईवडील फार पुर्वीच वारले होते. एक लहान बहीण गुजरातला रहायची. तिथेच स्थायिक झाली होती ती. खरेतर तिचा म्हणजे सुधाचा प्रेमविवाह झाला होता. शेजारी शिकायला आलेल्या गुजराती मुलासोबत सुत जुळून तिने पळून जाऊन लग्न केले होते. तो गुजरातचा, तिला त्याने तिकडेच नेले. आणि दोघेही तिथे त्यांच्या बिझनेस मध्ये रमले. बाबांच्या आईवडीलांना हे लग्न मान्य नव्हते. पण काही वर्षाने दोन मुलं झाल्यावर ती जेव्हा घाबरतच आईवडीलांना भेटायला आली...तेव्हा तिचं वैभव बघून, लेकरं बघून आईवडीलांनी राग विसरुन, तिला जवळ घेतले. 

पण ह्या काही वर्षात, बहिण पळून गेल्यावर ज्या परिस्थितीला आईवडीलांना आणि त्यांना तोंड द्यावे लागले. त्याने बाबा दुःखी झाले. कठोर झाले. कोणत्याही परिस्थितीत ते तटस्थपणे वागू लागले.

म्हणूनच जेव्हा मुलाची वाट बघता बघता, मुलींचा जन्म झाला. बाबा, आधी तर मनातून घाबरले. 

'आपण करु शकू ह्यांचा निट सांभाळ...?'

हा प्रश्न त्यांना कित्येक दिवस भेडसावत होता.

पण नंतर त्यांनी स्वतःला सावरले.

'नाही मी आधी...आतापासूनच, मुलींच्या शिक्षणाची, लग्नाची तरतूद करायला सुरुवात करतो. म्हणजे पुढे गडबड होणार नाही. आणि आता जरा हात आखडूनच खर्च करावा लागेल. जेणे करुन घराची घडी नीट बसेल. तसे, शोभना तर जास्त खर्चीक नाहीये. ती करते व्यवस्थित. पण हातून निसटायला नको ती...आणि डोक्यावरही बसायला नको. 

जरा तिच्यावरही वचक हवाच...! 

सगळं प्लानिंग मनोमनी एकट्यानेच करुन सुरेश बाबा मोकळे झाले.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

31/07/22

टीम - अमरावती

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००००

🎭 Series Post

View all