विषय - कौटुंबीक कथामालिका
शीर्षक - कंगोरे भावनांचे
भाग - 5.......मुलाच्या भावाने रवीने बाहेरुन पेढे आणले. सगळ्यांचे तोंड गोड करण्यात आले. सगळे आनंदात होते. आईबाबांचा उत्साह तर पाहण्यालायक होता. एवढ्या झटपट लग्नं जुळल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावरुन ओसंडून वाहत होता.
मग ठरले, दोन दिवसानंतर येत्या रविवारी टिका लावू. साखरपुड्याची खरेदी करु आणि मग त्यापुढल्या रविवारी साखरपुडा...! सगळ्यांचे एकमत झाले. आनंदाने गळाभेट झाली. जेवणाचा फार आग्रह बाबांनी पाहुण्यांना केला. पण रविवारी जेवण करु तुमच्याकडे, असे ठरवून पाहूण्यांनी निरोप घेतला.....आता पुढे,
भाग - 6
बाबा पाहुण्यांना सोडायला बाहेर पर्यंत गेले. आजी, आई, सुलू आता बेडरुम मध्ये गप्पा करत बसल्या. एकच विषय चघळत होता. "मुलगा - नाव होत, अर्जुन"
इकडे दुःखी चेहरा करुन बसलेल्या प्रियुकडे बघत बेडरुम मध्ये आलेली संजु म्हणाली,"काय ह्या आईबाबांचे मला कळतच नाही काही. स्वतः एज्युकेटेड लोकं ही..आणि विचार बघा ह्यांचे कसे. म्हणे लागोपाठ चार मुली आहेत. मग, ह्यांना आपण सांगितले का जन्म द्या आम्हाला म्हणून...नव्हत जन्माला घालायचं. आणि आता जन्म दिलाच आहे तर, माणुसकीने वागा ना आमच्याशी. आज शिक्षणाच्या मध्येच तुझं लग्न करुन देत आहेत. तुझ्या नंतर असाच एखादा मुलगा बघून, माझंही लग्नं लावून देतील. ते काही नाही तू नाही म्हण त्यांना. अशी तोंड पाडून बसू नकोस. बोल त्यांच्याशी...." प्रियुला खांद्याला पकडून मोठ्यांने संजू म्हणाली.
"कस गं बोलू ? तू बघितलस ना, कसे चुप करतात मला. बाबांच्या समोर तर त..त..फ..फ..होतं माझं आणि आई तर जसे काही अंगावर यायलाच उभी असते. आता मारेन की मग, असा अवतार असतो तिचा. कधीच म्हणून ती प्रेमाने माझ्याशी बोलत नाही..."
"अगं प्रियु ती फक्त शिना, टिना सोबतच हळूवार आवाजात बोलते. पण मला त्यात तिच आईचं प्रेम दिसतच नाही. आणि ती तुझ्या सोबत दरडावून बोलते. तुझ्या नाही तर माझ्या अंगावर मारक्या म्हशी सारखी येते...." इति. संजू
"बाई बाई पोरी काय बोलतेस गं तू, मारकी म्हैस म्हणतेस माझ्या मुलीला? इथे मुंबईत बघितलीस का म्हैस कशी दिसते ती? गोरी गोमटी सुंदर आहे माझी मुलगी. तुमची आई असून अश्या बोलता तिच्या माघारी तिला...तुमचं करता करता तिच्या नाकी नऊ येतात. म्हणून चिडत असावी तुमच्यावर. तुमच्या बापाला तिची पर्वा नाही...मग, मुली काय डोंम्बलाची पर्वा करणार तिची..."आजीने डोळ्यांना पदर लावला.
प्रसंग भलती कडे वळला होता. संजुला वाटले आता आपली काही खैर नाही. ही आज्जीतर आई सोबत बसली होती. इकडे कधी आली? आणि नको ते ऐकले.
"अगं आज्जी अशी काय करतेस, माझी आई आहे ती...मी गंमत करत होते. असचं गं...ये ये बस. बघ तुझी मोठी लाडकी नात गुपचुप बसली आहे. ती म्हणते,"मुलाने रात्रभर इकडे थांबायला पाहीजे होते..." आज्जीला डोळा मारत संजु म्हणाली. तसे तिघीपण हसायला लागल्या.
आईच्या माहेरचे पाहुणे रविवार पर्यंत म्हणजे अजून दोन दिवस थांबणार होते. बहूतेक रविवारी रात्रीच ते गावी निघणार होते आणि मग पुढल्या रविवारी साखरपुड्याला पुन्हा येणार होते.
बाबांनी मनातल्या मनात पुर्ण तयारी करुन ठेवली होती. रजिस्टर मध्ये त्यांनी कधी काय करायचे, खर्च, खरेदी..सगळं सगळं लिहून ठेवले. आणि मग निवांत झोपले.
आई झोपायला आली तेव्हा बाबा गाढ झोपलेले होते. आईचे लक्ष रजिस्टर मध्ये गेले. 'अरे देवा सगळं प्लानिंग झाल पण !
मी आपली किचनच सावरत आहे. किती काळजी ह्या माणसाला मुलीची...बाई बाई माझा नवरा...' म्हणत ती प्रेमाने नवर्याला निहारु लागली.
शोभनाच्या बसण्याने झोपेत असलेल्या सुरेशला जाग आली. ये इकडे...म्हणत त्यांनी तिला आपल्या कवेत घेतले.
निस्सीम आनंदाने शोभना मोहरली. 'मला वाटतं तेवढा नवरा कठोर नक्कीच नाही. त्याचा स्पर्श मला त्याच्या प्रेमाची ग्वाही देतं...' आणि समाधानाने ती सुरेशला समर्पित झाली.
मुलींच्या खोलीत, संजूची धुसफुस चालली होती. ती हळू आवाजात प्रियुला "उठाव" करायचा सल्ला देत होती.
"हे बघ सगळे म्हणतात मुलाकडचे चांगले आहेत. तुला माहित आहे का, मुलाच्या आजोबांनी तुला प्लेट आणायला किचन मध्ये का पाठवले..."
"का..?" प्रियु.
"अगं साडी सांभाळत तू वाकडी तिकडी चालत पोह्यांचा ट्रे घेऊन गेली होती ना...तुझ्या पायामध्ये काही फाॅल्ट तर नाही नां, हे चेक करायसाठी म्हणून...तुला आत पाठवले, मी ह्या बद्दल मावशीला विचारले होते. मावशीने सांगितले. हे जर असा विचार करत असतील तर चांगले लोकं आहेत का हे...आणि ते काय तुला पोहे खा, म्हणत होते..निरखत होते, मुलगा तर फारच बाबा भक्त दिसला. तुला काही विचारायला पण तयार नाही. असं कुठ काही असतं का..?उद्या तू बोल आई सोबत. वेळ पडल्यास बाबांशीही बोल." संजु म्हणाली.
"हो बोलावेच लागेल मला..."प्रियु नंतर कधी झोपेच्या आधीन गेली ते तिलाच कळले नाही.
सकाळी मावशीने प्रियुला हलवून उठवले. "प्रियु मला वाटत जावयांनी स्वप्नात पार धुमाकूळ घातला होता..हो नां !"
स्वतः खळखळून हसली ती.
"म्हणूनच तर दहा वाजता तुला मी उठवले..."
ती पुन्हा हसू लागली.
अरे बापरे दहा...दचकून उठली प्रियु,"अगं माझं काॅलेज...लेट झाले मी..."
"ते असू दे आज, जाऊ नकोस. मघा मोनाचा फोन आला होता. तुझी तब्येत विचारत होती. तिने सांगितले तू नाही गेली काॅलेजमध्ये तरी चालेल म्हणून..." आई बेडरुम मध्ये येत म्हणाली.
'आयला ह्या मोन्याची मानगुटीच मोडते आता भेटल्यावर. काय गरज पडली होती तिला घरी फोन करायची. बसा आता बोअर होत घरी....'ती मनातून चरफडली.
आई, मावशीचा उत्साह ओसंडून वाहत होता. बाबांनी म्हंटले आज मार्केट मध्ये जाऊन खरेदी करा. आई जवळ त्यांनी पैसे दिलेत. आईतर भलतीच आनंदून गेली. कामं आटोपून सगळ्या बाहेर पडल्या आणि आपसूकच तिचे लक्ष समोरच्या गॅलरी कडे गेले. 'अरे हा आज कुठे गेला. दिसत नाहीये...पुन्हा मन म्हणाले, अगं तूच तर आज वेळ चुकवली नां ! '
प्रियुला आतून कुठे तरी तुटल्या सारखे झाले.
तिचं मन उदास झालं. असं का होतय मला.
रडावं वाटत होतं तिला...
का नाही आज हा आपली वाट बघत उभा...?
खिन्न नजरेने तिने गॅलरीतून नजर रस्त्याकडे वळवली. समोरच्या किराणा दुकानाच्या बाहेरच्या बेंचवर ओळखीचा चेहरा दिसला...आणि तिचे डोळे चमकले. 'अरे तोच तर आहे. ओहो...मन अगदी फुलपाखरु झाले.' तो हलकेच हसला. प्रियु तर आज मावशीच्या हाताशी खेळत मग खळाळून हसली. 'अरे कुणी जोक मारला का तुला हसायला...' असे म्हणत मावशी पण तिच्या हसण्यात सामील झाली.
क्रमशः
संगीता अनंत थोरात
31/07/22
टीम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
०००००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा