Login

कंगोरे भावनांचे - ७

Myriad shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 6 .....समोरच्या किराणा दुकानाच्या बाहेरच्या बेंचवर ओळखीचा चेहरा दिसला...आणि तिचे डोळे चमकले. 'अरे तोच तर आहे. ओहो...मन अगदी फुलपाखरु झाले.' तो हलकेच हसला. प्रियु तर आज मावशीच्या हाताशी खेळत मग खळाळून हसली. 'अरे कुणी जोक मारला का तुला हसायला...' असे म्हणत मावशी पण तिच्या हसण्यात सामील झाली......

भाग - 7

बस मध्ये बसताना गर्दीतून तिला, फिरुन त्याला बघावेसे वाटले. अगदी मागेच तिच्या तो उभा होता. प्रियु लाजून बस मध्ये चढली. एक वेगळाच ग्लो करत होता तिचा चेहरा. ''आमच्या जावयाने फारच जादू केली वाटत..नाही का प्रियु..?'' मावशी तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली.

आज बस मध्ये बसायला जागा नव्हती. गर्दी वाढली होती. तो, आई आणि मावशीच्या अगदी जवळ उभा होता.

आता मात्र प्रियु भानावर आली. 'हा चुकून आई समोर काही बोलला तर...मी हे काय करत आहे. का त्याला आमंत्रण देत आहे. नाही, मला आता सावराव लागेल. नाहीतर गोंधळ व्हायचा...तसेही आमच्यात "तसे" काही नाते नव्हतेच मुळी' तिच्या नजरे समोर आई बाबांचा चेहरा आला.

मग तिने ठरवले आता ह्याच्या कडे बघायचे नाही. आता माझं लग्न काही थांबणार नाहीये. करावेच लागेल मला. मग ह्याला आशा का दाखवू ! जाऊ दे विसरते सगळं....

नंतर तिने त्याच्याकडे अजिबात बघितले नाही. पण तिला जाणवत होते. तो आजूबाजूलाच होता तिच्या.

खरेदी झाली. प्रियु आपल्या मतावर ठाम राहीली. तिने नंतर वळून त्याच्याकडे बघितलेच नाही.

दुसरा दिवसही घरात गडबडीत गेला. रविवार उगवला. आई मावशी पहाटेच उठल्यात. मुलींनाही कामात मदत करण्याबाबत आधीच सांगितले असल्यामुळे सगळ्या लवकरच उठल्यात संजु सोडून...नंतर आईने तिला रागवतच उठवले. पुरणपोळीचा बेत होता. ताट भरेल एवढे जिन्नस आई मावशीने बनवले. थोड्या वेळातच पाहूणे आलेत. टिळा लावायचा विधी झाला. नंतर जेवण आटोपून सगळे गप्पा करत बसलेत. थोड्या वेळाने शंभूमामा म्हणाले,

"आपण असे करुया सगळे जण कपडे घ्यायला न जाता ह्या दोघांना अंगठी आणि त्यांच्या आवडीचे कपडे आणायला पाठवू या. काय म्हणतो सुरेश...?"

"हो हो चालेल ना ! पाठवुया दोघांना"

डोकं हलवत बाबा म्हणाले.

"नाही नाही दोघेच कशाला? तुम्ही मोठे आहात. मला तुमच्या आवडीचे कपडे चालतील. तुम्हाला हवे तसे तुमच्या आवडीने घ्या. आपण सगळेच जावुया कपडे अंगठी घ्यायला."

घाईघाईने अर्जुन म्हणाला.

'अरे देवा, हा म्हणजे ना..काय म्हणावं ह्याला."भुसनळ्या" गेलो असतो की दोघे. जरा काॅलेजविषयी बोलले असते नां! ह्याचेही मत कळले असते माझ्या शिक्षणाविषयी... पण ह्याला तर माझ्याशी बोलायची गरजच वाटत नाहीये.'

चरफडत प्रियु पुस्तक उघडून बसली. लगेच मावशी हसत तिला म्हणाली,"बस झालीत तुझी नाटक. आता कुठे तुझं पुस्तकात लक्ष लागणार आहे."

मग दोन्ही आईबाबा अर्जुन आणि प्रियु मिळून कपडे, अंगठी घ्यायला गेलेत. अर्जुनने बाबांना सांगितले तुम्हाला हवी तशी डिझाईन घ्या मला चालेल. त्याप्रमाणे खरेदी झाली.

प्रियु अधून मधून अर्जुन कडे बघायचा प्रयत्न करत होती. पण तो तर अगदीच साळसूदा सारखा आईबाबांच्या मागे उभा होता. तिच्याकडे अजिबात लक्ष नव्हते त्याचे. किंबहुना तिच्याकडे बघणे टाळत होता तो.

घरी आल्यावर चहापाणी झाले. मुलाकडचे परत गेले. आणि आईने आजी, मावशीला म्हंटले,"माझा विश्वास बसत नाहीये, आजच्या जमान्यात असे मुलं असतात? किती मर्यादा राखणारा मुलगा आहे. आईवडीलांना जपत होता. सगळ्यांच ऐकत होता. नाहीतर आपल्याकडे बघा...मोठीचे प्रश्न संपत नाही, दुसरी सारखी हुज्जत घालायलाच जन्माला आली. तुला सांगते आई या संजूने नुसता वैताग आणलाय मला. प्रियुला काही ना काही माझ्या विरुद्ध सारखी "शिकवत" असते. मी काय ह्यांची वैरी आहे का? मुली चांगल्या सुखी कुटूंबात जाव्यात. सुरक्षित हातात असाव्यात. असेच वाटेल ना मला! तुम्ही दोघी जरा संजूला समजवा. तिच्या बाबांनी तिचं बोलण ऐकलं तर काय करतील माहित नाही." आईला गहिवरुन आले होते. आज्जी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली,"अगं लहान आहेत मुली. जसजश्या मोठ्या होतील कळेल त्यांना सगळं. तू चिंता नको करु शोभना, सुलू आणि मी माझ्या पद्धतीने दोघींनाही समजवून सांगू. तू बस निश्चिंत होऊन साखरपुड्याची तयारी कर !"

"अगं तुम्ही दोघी पण थांबाना इथे तेवढीच मला मदत होईल."शोभना म्हणाली.

"नाही गं बाई एवढे दिवस, नको नको आम्ही येतोच शनिवारी रात्री पर्यंत, मग लग्नासाठी तसेही काही दिवस आधी येऊच की!" आजी म्हणाली. तेव्हढ्यात मामा आत आला, "चला निघूया आता, म्हणून घाई करु लागला." थोड्या वेळातच सगळे गावी निघाले.

सोमवारी प्रियुला काॅलेजमध्ये जायचे होते. पण आईने तिला कणकण वाटतय म्हणून तू घर सांभाळ म्हंटले. नाईलाजाने प्रियुला पुढचे दोन दिवस घरी राहावे लागले.

इकडे येता जाता संजु तिला चिडवत होती.

"झालं, ह्या मुलींना काही अक्कल नसते.

पेरेन्ट्सच्या माघारीच स्वातंत्र्याच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. जेव्हा स्वतःसाठी बोलायची वेळ असते तेव्हा मात्र शेपुट घालून बसतात. गुडीगुडी गर्ल, आईवडीलांचा मान राखणारी मुलगी, तुला तिकडचं घर सांभाळायचं आहे ना ! म्हणूनच हे तुझं प्रात्यक्षिक आहे. जा, त्या किचनमध्ये घूस. धुणीभांडी कर. गेलं तुझ शिक्षण आता आईसारखच खड्ड्यात !"

प्रियुला माहित होतं, संजुला ती आवरु शकत नव्हती. तिने हसून तिच्याकडे दुर्लक्ष केलं. संजुने मग मोर्चा शिना टिना कडे वळवला,"आईच्या खबर्‍यांनो, खबरदार मी बोललेले तुम्ही आईला सांगितले तर. चांगले बुचकळून काढीन, समजले का? जा शाळेची तयारी करा. शाळा नाही बुडवायची. प्रियुच काय बाबा तिला सासरी जायची घाई आहे, निघा लवकर." खेकसत त्यांना म्हणाली. तसे दोघीही घाईघाईने तयारी करु लागल्या.

दोन दिवसानंतर प्रियु काॅलेजसाठी घरुन निघाली. रस्त्यावर आल्यावर अचानक तिला गॅलरी आठवली. 'नाही नाही, मला गॅलरीकडे बघायचे नाही. मला भारी पडेल ते. उगाचच त्याचा गैरसमज अजून वाढवायचा नाही...ओ हो प्रियु, खरेच...हा गैरसमज आहे, तो ही त्याचा...? मग तू कशाचा आनंद घेत होतीस आता पर्यंत...? नाही नाही, ते असच..काही नाही तस...!' तिचं अर्तद्वंद सुरु होत.

ती बस स्टाॅप वर पोहोचली. मोना तिची वाट बघत उभी होती."ओहो मेरी जान, कितने दिनो बाद मिल रहे यार,आणि आयला हे काय, तुझ्या हातावर मेंदी कशी काय? कुठे लग्नाला गेली होती का? तरीच म्हंटले तू एवढे दिवस घरी राहणारी नाहीयेस." तेव्हढ्यात बस आली. दोघीही बस मध्ये चढल्या. "ए चल इथे खालीच बसू, म्हणत प्रियु डबल डेकर बसच्या खालच्या भागात गेली. "हे काय झाले, आज काही वेगळचं..." तिच्या मागे येत हळूच मोना म्हणाली. आज त्यांना बसायला जागा मिळाली नाही.

क्रमशः

संगीता अनंत थोरात

31/07/22

टीम - अमरावती ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

०००

🎭 Series Post

View all