विषय - कौटुंबीक कथामालिका
शीर्षक - कंगोरे भावनांचे
भाग - 8......आईबाबांना अश्रू आवरले जात नव्हते. आज आई मात्र धाय मोकलून रडत होती. जणू आता पर्यंत ती जेवढीही तिला रागावली असेल त्या सर्वांबद्दलचा तिला पश्चाताप होऊन ती अश्रू वाटे बाहेर काढत होती. ह्याच दिवसा साठी मी माझी माया हात राखून वापरत होती. जणू ती स्वतःलाच समजावत होती. प्रियु सकट संजू शिना टिना सगळेच रडत होते......
भाग - 9
त्यांना बघून हळूच अर्जुन बाबांना म्हणाला,
"नाहीतर इथेच ठेवा प्रियुला, खुप रडतायत सगळे."
त्याच्या भोळ्या बोलण्यावर आई बाबा हसलेत.
"चला निघूया आता. व्याही निरोप द्या आता."
प्रियु डबडबलेल्या डोळ्यांनी सगळ्यांना हात हलवून निरोप देत, कार मध्ये बसून सासरी निघाली.
सासरी सासूबाईंनी खुप छान तिचे स्वागत केले. घरभर पाहूणे होते. घर म्हणजे छोटेखानी बंगलाच होता त्यांचा पालघरला. समोर मोठे अंगण, विविध फुलझाडं छान रांगेत कंम्पाऊंडला लागून असलेले, लक्ष वेधून घेत होते. आजुबाजूला छोटे खानी टुमदार बंगले होते. एकंदरीत निसर्गरम्य परिसर होता.
कुठेतर माणसांनी गजबजलेल्या मानखुर्द मध्ये रहाणे. आणि कुठे हे शिस्तीत असलेले बंगले. दूरवरुन दिसत असलेला विर्स्तीर्ण समुद्र, तीरावर असलेले नारळाचे झाडं, प्रत्येक बंगल्या समोर, इतर झाडांसोबत नारळाचे झाड होतेच. आणि मी आता इथे राहणार...प्रियु सुखावलीच.
रिसेप्शन दुसर्या दिवशी होते. प्रियुच्या घरचे सगळेच आलेत. प्रियुला तर कित्येक दिवसानंतर भेटल्यासारखे वाटले घरच्यांना. पुन्हा एकदा आनंदात हा सोहळा पार पडला. बाबांनी शंभूची गळा भेट घेत इतके चांगले स्थळ सुचवले म्हणून आभार मानले. घेणदेण आधीच झालेले होते. आईबाबा भरल्या डोळ्याने प्रियुचं घर बघत होते. तिचं सासर बघून समाधानाने ते तिथून परतले. जाताना प्रियुला आठदहा दिवसाने घ्यायला येतो म्हणून बाबा व्याह्यांशी बोलले. तर ते म्हणाले,"एवढे काही नियम पाळायची गरज नाहीये. आम्हीच जमल्यास तिला सोडायला येऊ. नाहीतरी तिकडे काही ना काही काम असतचं अर्जुनचं." आता तोही प्रश्न सुटला होता. निश्चिंतपणे ते प्रियु कडून निघाले. गाडीत बसल्यावर कधी नव्हे ते बाबा प्रियुच्या सासर विषयी भरभरुन बोलले.
सगळं आटोपल्यावर,
एकदोन दिवसात हळूहळू पाहूणे पांगले. सासूबाई प्रियुला किचन मध्ये फटकू देत नव्हती. तिला काय हवं नको ते सगळं बघत होती. तुला काहीही हवे असल्यास बस, तू मला सांगायचे. असे वारंवार म्हणत होती. नणंद तर तिला सोडायलाच तयार नव्हती. वहिनी वहिनी करत वेगवेगळ्या विषयांवर तिच्याशी बोलत होती. दोन्ही दीर तिच्याशी अधून मधून येऊन बोलत असतं. सासरेही विचारपूस करत असतं. मात्र अर्जुन....मूक श्रोता बनून सगळ्यांकडे बघायचा. त्यात प्रियु पण आली. त्याला आपल्याकडे बघताना बघून, प्रियुला लाज वाटायची. काय हा पण नां! नुसता नजरेनेच मला घायाळ करतोय. कसा सज्जन पणाचा आव आणून वावरत होता. आणि आता बघा कसा संधी भेटल्यावर बघत बसतो. टकामका..! आणि मनोमन ती पुढील कल्पना करुन शहारुन जात होती.
तिने मनापासून नवर्याचा स्वीकार केला होता. म्हणून, खुप कल्पना त्याला घेऊन, तिच्या मनात घोळत होत्या. कधी एकदा हनीमूनला त्याच्या सोबत जाते, असे तिला झाले होते.
अशातच लग्नानंतरचे आठ दिवस गेलेत. एक रुटीन झाले होते. सकाळी उठून नणंद, सासू तिला फिरायला घेऊन जायच्या. चहा सुद्धा त्याच करायच्या. दोन तीन दिवस प्रियुला बरे वाटले नंतर तिने आग्रहाने मी सकाळी निदान चहा तरी करते म्हणून ती जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यानंतर नाश्ता स्वयंपाक, सासूबाईचं करायच्या, सोबत मदतनीस असायची. धुणभांडी करायलाही वेगळी बाई होती. माळी येऊन फुलझाडांची निगा राखायचा. तसे त्या घरात प्रियुला घरकाम काहीच नव्हते. अर्जुन सकाळीच आॅफीस मध्ये जायचा. रात्री थकलेला परत यायचा. थोडावेळ खाली बसला की, वरच्या त्याच्या बेडरुम मध्ये जाऊन झोपायचा. नणंदेचे काॅलेज सुरु झाले होते. त्यामुळे ती बाहेर जायला लागली. एक दीर शेगावी शिकत होता तर एक नाशिकला नोकरी करत होता. तेही परत गेले. सासरे व्हेटरनरी काॅलेजमध्ये शिकवत होते. सुट्टी संपल्यावर तेही जाॅईन झाले. आता प्रियुला घरी करमेनासे झाले. काॅलेजची आठवण यायला लागली. तिचा अभ्यास बुडत होता. तिची सासू सतत तिच्यावर लक्ष ठेऊन असायची. तिचा चेहरा उदास दिसला की, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायची. घरच्या काॅलेजच्या गमती जमती विचारायची.
पण आता प्रियुचे मन कशातच रमत नव्हते.
तिला अर्जुन कळतच नव्हता...काय माणूस आहे, कसा माणूस आहे हा...? आताच लग्न झाले. आणि अजूनही हा वेगळा झोपतो. एकटा झोपतो...?मला का नाही बोलवत हा..?
पण बोलणार कशी, विचारणार कुणाला?
शालीनता आणि लाजेने मर्यादा आखून ठेवलेल्या होत्या.
बरे, घरच्या लोकांना काही वाटत नाही का? हा प्रश्नच होता.
एक दिवस सहजच तिने जवळपास सासू नसताना, अर्जुनला म्हंटले,"आपण हनीमूनला कुठे जाणार आहोत?"
"काय...हनीमूनला? आई ए आईऽऽइकडे ये जरा. हिला हनीमूनला जायचे आहे. कधी जाणार ते सांग तिला." आणि तो तरातरा चालत वर बेडरुम मध्ये गेला.
प्रियुला शाॅकच बसला. ती चपापून सासू कडे बघू लागली.
"अगं, ते ना आमच्या गुरुंनी सांगितले आहे, आताच मुलांना कुठे बाहेर पाठवू नका. म्हणून, योग्य वेळ बघून तुम्ही हनीमूनला जा बरं!" आई हसतच म्हणाली.
आत्ता कुठे प्रियुला दिलासा मिळाला. सासूने कारण सांगितल्यावर. 'अच्छा बच्चू, म्हणूनच माझ्या पासून दूर दूर आहेस. कोई बात नही. ये दिन भी निकल जायेंगे.'मनाला समजावत ती निश्चिंत झाली.
आज प्रियुला घरच्यांची खुप आठवण येत होती.
तिला लॅन्डलाईन दिसली. अरे, चला घरी फोन करते.
तिने फोन उचलला तर लाईन डेड होती.
ओहो, हा तर बंद आहे.
तिला फोन उचलताना बघून सासूबाई म्हणाल्या,
"कुणाला फोन करायचा होता?"
"आईला..."
"अगं लग्नाच्या तेव्हढ्यातच काय झाले माहित नाही. तेव्हापासूनच लाईन बंद आहे. थांब आज संध्याकाळी अर्जुनच्या बाबांना सांगते कम्प्लेंट करायला."
"आठवण येत असेल ना आईची? बरं, तू मला आई म्हणत जा. आणि ह्यांना बाबा. आम्हीही तुझे आईवडीलच आहोत नां,
आज ह्यांच्याशी बोलते. तुला घरीपण जायचे आहे नां, आता घरी जाऊनच बोल मनसोक्त आईवडीलांशी."
मनोमन प्रियु हरखून गेली.
क्रमशः
संगीता अनंत थोरात
03/08/22
टीम - अमरावती
ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
०००००
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा