Login

कंगोरे भावनांचे

Different shades of human emotions..

विषय - कौटुंबीक कथामालिका

शीर्षक - कंगोरे भावनांचे

भाग - 1 

"आई निघते गं मी"

"संध्याकाळी लवकर ये"

"का बरं?"

"अगं रात्री सांगितले होते ना मी तुला ?"

"काय सांगितले होते?" 

"तुला बघायला मुलाकडचे येणार आहेत. म्हणून लवकर ये !"

"अगं आई काय घाई आहे. आणि तू तर रात्री म्हणाली होतीस की, आता बघणे सुरु करु. आणि लगेच आता सांगतेस की, 'येणार आहेत मुलाकडचे बघायला.' हे काय चालवलस !"

तणतणत प्रियदर्शिनी म्हणाली. 

"हे बघ प्रियदर्शिनी तुझ्यापाठीमागे अजुन तीन बहीणी आहेत. लक्षात असू दे. मला तोरा दाखवायचा नाही. एवढेच असेल तर बाबांना नाही म्हणून सांग. माझ्या समोर नाटक नको करुस. आणि हो नाही गेलीस एक दिवस काॅलेज मध्ये तर बिघडणार नाही काही. थांबून जा नाहीतर."

"नको, महत्वाच्या असायनमेंट आहेत. मॅडम सोबत बोलायचे आहे. बरं येते मी लवकर."

वरमून प्रियु म्हणाली.

तिला माहित होते, आईसोबत ती हुज्जत घालू शकत होती. पण बाबांना "नाही" म्हणू शकणार नव्हती.

का कोण जाणे प्रचंड घाबरायची ती बाबांना.

त्यांच्या विरुद्ध बोलायची तिची हिम्मतच नव्हती.

सॅण्डल पायात अडकवून ती घराबाहेर पडली.

चालता चालता तिचे शेजारच्या बिल्डींग मधल्या गॅलरीकडे लक्ष गेले.

तो नेहमी सारखा तिथेच उभा होता.

हातात पेपर घेऊन. 

'आला मोठ्ठा पेपर वाचणारा...'ती गालातल्या गालात हसली.

आज कमाल झाली. तो ही हसला आणि इकडे तिकडे बघत त्याने "टाटा" केले.

लाजून हसत तिने मान वळवली आणि स्टाॅप कडे झपाट्याने निघाली गर्दीतून वाट काढतं.

बसस्टाॅप वर तिला तिची मैत्रिण मोना दिसली.

"हाय मोना, कधी पोहोचलीस?"

"अगं दहा मिनीटे झाले. तू अजून पाच मिनीटे लेट झाली असती तर, ही बघ बस सुटली असती."

येणार्‍या बस कडे बोट दाखवून हसतच मोना म्हणाली.

दोघी लगेच बस मध्ये चढल्यात, "मोना चल ना वर बसू."

प्रियदर्शिनी मोनाचा हात पकडून डबल डेकर बस मध्ये, 

वर बसली.

दोघींनाही वर बसायला जाम आवडायचे.

बसमध्ये बसून येणार्‍या जाणार्‍या गर्दीला, 

लोकांच्या लगबगीला निहारणे त्यांचा छंदच होता.

कधी कधी त्यांच्यावर कमेंट करुन त्या दोघीही पोटधरुन हसायच्या. पण आपसातच...दुसर्‍यांपर्यंत हे पोहोचत नसे.

पण आज प्रियदर्शिनीचं कशातच मन लागत नव्हतं.

तिला अजुन शिकायचे होते. पीजी करायचे होते. नोकरी करायची होती. काहीतरी बनून मग लग्न करावे ही तिची इच्छा होती. पण हे सगळं ती घरात कुणाच जवळ बोलू शकत नव्हती. किंबहुना तिला कुणी समजुन घेईल असे वाटत नव्हते. 

तिला गुपचुप बघून मोनाने विचारलेच, "काही प्राॅब्लेम प्रियु? आई बाबा काही म्हणाले का ? रागावलेत...काय झालं सांग ना !"

"अगं श्वास तर घे, काही नाही झाले. उगाच मन उदास झाले. काही कळत नाहीये...बरं वाटत नाहीये मला, 

मी आज लवकर घरी जाते." प्रियु.

"मग कशाला आलीस, थांबायच होतं घरीच. तसेही एवढ्यात रेग्युलर क्लासेस होत नाहीयेत, आणि आलेत सर, मॅम, तरी अॅन्युअल फंक्शन च्या तयारी साठी ते आॅडीटोरीयम मध्येच असतात जास्तीत जास्त. मग कशाला दगदग केलीस?" 

मोना म्हणाली.

"काॅलेज मध्ये आलं की कसं मुक्त आकाशात विहार करतोय असं वाटत गं, घरच्यांनसारखे सदानकदा उपदेशाचे डोज पाजणारे नसतात. आपण काहीतरी आहोत ही भावना असते गं मनात." ती कुठेतरी हरवून हे सगळं बोलत होती.

"हे बघ मला ते काही माहित नाही. तू आताच त्या खिडकीतून बघितले का ? तो लाल शर्ट घालून असलेला माणूस, हिरवी साडी घातलेल्या बाईच्या बॅकसाईडला हात लावून पळाला...ते बघितले का ?हा..हा..हा..हसावं की रडावं कळत नाही. आईच्या पोटातून जन्मला. बायको असेल बहिण असेल. तरीही असे चाळे....काय आनंद मिळवला असेल ह्या हरामखोराने....अजून कोणत्या शिव्या द्यायच्या त्याला ते बोल...हा..हा..हा..!" मोना म्हणाली.

"असू देत जाऊ दे..कधी अक्कल येईलअश्या लोकांना देव जाणो. चल उतरुया, पुढचा स्टाॅप आपला."

मोना, प्रियुला हाताने पकडून उठवत म्हणाली.

दोघी खाली आल्या, बस स्लो होताच दोघीही उडी मारुन चालत्या बस मधुन उतरल्या आणि तश्याच आपल्या काॅलेजकडे झपाझप पावले टाकीत निघाल्या.

"ए तो बघं घार्‍या, काय लेका कुठं होतास एवढे दिवस ? बत्तीस तोफेची तुला सलामीच देते थांब !" काॅलेजपुढे अभिनवला उभे बघून मोना म्हणाली. 

खुप दिवसानंतर तो आज उगवला होता.

"हे चिमण्या कारं कस काय राव..काय म्हणतं तुझं म्हातारं ? 

आयला त्यादिवशी काय झोडपलं ह्याच्या आईनं ह्याला...काय सांगू मोन्या तुला...हा..हा..हा..!" विराट चिन्मयच्या{चिमण्या} पाठीवर थाप मारुन मोन्या म्हणजेच मोनाला सांगत होता.

"मोठा दादा बनून फिरतो इथे. घरी शेपूट घालून असतो...हा..हा..हा" विराट खळखळून हसत चिन्मयला गदगदून हलवत म्हणाला.

"आरं लेका, आयला काय म्हणू राव..तोंड उघडला की ती चप्पल हाणते राव..तेही थोबाडात !" त्याचा आईच्या आठवणीने त्याचा उतरलेला चेहरा बघून प्रियदर्शिनी मोठ्यांने हसली...हा..हा..हा !

"चला ह्या निमीत्ताने का होईना, आपल्या प्रियु ने तोंड तर उघडला ना रावं...!"

मोना अभ्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

"ए ती बघ गीतांजली एक्सप्रेस येत आहे ! जरा नीट उभं रावा.."

काॅलर शर्ट ठीक करत विनीत म्हणाला.

तसे सगळे अगदी साळसूदाचा आव चेहर्‍यावर आणून, हसून सरांकडे बघून,"गुडमाॅर्नींग सर" एकासुरात म्हणाले.

सरांनी त्यांना एक स्माईल देत, "वेरी गुडमाॅर्नींग" म्हणून पुढे निघून गेलेत. हे होते बापट सर, चालण्यात त्यांना कुणीच हरवू शकत नव्हते. 

००००

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा

संगीता अनंत थोरात

27/07/22

🎭 Series Post

View all